Maharashtra Politics Live Update : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महायुती भाजपच्या बाहेरच्या नेत्यामुळे तुटली, आमदार निलेश राणेंचा आरोप

Marathi Politics Headlines Updates: आज गुरूवार, दिनांक 20 नोव्हेंबर 2025 रोजीच्या देशासह राज्यातील विविध राजकीय आणि प्रशासकीय घडामोडी जाणून घेऊयात.
Maharashtra Political Live updates
Maharashtra Political Live updatesSarkarnama
Published on
Updated on

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महायुती भाजपच्या बाहेरच्या नेत्यामुळे तुटली, आमदार निलेश राणेंचा आरोप 

सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिवसेना-भाजप महायुती तुटली आहे. यावर शिवसेनेचे आमदार निलेश राणे यांनी जिल्ह्यातील महायुती ही भाजपच्या बाहेरच्या नेत्यामुळे तुटली आहे. जिल्ह्यातील नेत्यांकडून नाही, अशी स्पष्ट प्रतिक्रिया दिली आहे.

मालेगावमध्ये चिमुरडीवर अत्याचार करुन हत्या, जरांगे पाटील यांची मोठी मागणी 

मालेगावमधील डोंगराळे येथे एका तीन वर्षीय चिमुरडीवर अत्याचार करून, दगडानं तिचं डोकं ठेचून हत्या करण्यात आली. या घटनेनं राज्यभरात खळबळ उडाली असून, संताप व्यक्त करण्यात येत आहे. मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पीडित कुटुंबाची भेट घेतल्यावर मुख्यमंत्री महोदय, दोन महिन्यांच्या आत कायदा करा आणि आरोपीला फाशी द्या, नाहीतर त्याचा एन्काऊंटर करा अशी मोठी मागणी केली आहे. अन्यथा मोठं आंदोलन करण्यात येईल असा इशाराही त्यांनी दिला आहे.

'फडणवीस महाराष्ट्राच्या इतिहासात सर्वात क्रूर मुख्यमंत्री म्हणून...', यशोमती ठाकरे यांचा आरोप 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे मामेभाऊ आल्हाद कलोती यांच्या बिनविरोध निवड झाली आहे. याच निवडीवरुन काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर शाब्दिक हल्ला केला. त्या म्हणाल्या, फडणवीस हे या ठिकाणी दमदाटी आणि गुंडागर्दी करत आहे. मुख्यमंत्रीपदाचा दुरुपयोग करत आहेत. देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राच्या इतिहासात सर्वात क्रूर मुख्यमंत्री म्हणून ओळखले जातील, असा आरोप यशोमती ठाकूरांनी केला आहे. 

आधीच नाराज असलेल्या शिंदेच्या शिवसेनेला भाजपचा आणखी एक मोठा धक्का

भाजपमध्ये सध्या जोरदार इनकमिंग सुरू असून याचा मोठा फटका शिंदेंच्या शिवसेना गटाला बसला आहे. यावरून शिवसेनेत नाराजी दिसून येत आहे. दरम्यान एकनाथ शिंदे दिल्लीत जावून तक्रार करून आले. पण अद्याप फोडाफोडीचे वातावरण शांत झालेले नाही. जळगावच्या जामनेरात नगरपालिका निवडणुकीत शिवसेनेच्या दोन उमेदवारांनी निवडणुकीत माघार घेत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. यावरून भाजप आणि शिवसेना पुन्हा एकदा आमने सामने आली आहे.

भाजपच्या इशाऱ्यानंतर वैभव खेडेकरांचा यू-टर्न, पत्नीचा उमेदवारी अर्ज घेणार मागे

खेड नगर परिषदेच्या निवडणुकीत भाजपकडून पक्षांतर्गत कारवाईच्या इशाऱ्यानंतर वैभव खेडेकर यांनी नरमाईची भूमिका घेतली आहे. महायुती जाहीर झाल्यानंतरही, खेडेकर यांच्या पत्नी वैभवी खेडेकर यांनी अपक्ष म्हणून नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला होता, ज्यामुळे महायुतीत तणाव निर्माण झाला होता. रत्नागिरीत झालेल्या महायुतीच्या मेळाव्यानंतर आणि पक्षश्रेष्ठींच्या सूचनेनंतर, वैभव खेडेकर यांनी आता यू-टर्न घेतला आहे. त्यांनी आपली पत्नी वैभवी खेडेकर यांचा उमेदवारी अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया सुरू केली असल्याचे या वृत्तात म्हटले आहे. या घडामोडीमुळे खेडच्या स्थानिक राजकारणात मोठी उलथापालथ झाली आहे.

मी रबरी शिक्का नाही… परळीच्या हिताचे निर्णय मीच घेणार : पद्मश्री धर्माधिकारी यांचा निर्धार

बीडच्या परळी नगरपरिषद निवडणुकीच्या रिंगणात राजकारणाचे तापमान चढवतच आहे. अशातच महायुतीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार पद्मश्री बाजीराव धर्माधिकारी यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. परळीचा समृद्ध, स्वच्छ आणि डिजिटल विकास हा माझा मुख्य अजेंडा असून प्रलंबित प्रकल्प पूर्णत्वास नेण्याचा आपला निर्धार असल्याचे त्यांनी सांगितलं आहे. तसेच यासाठीच आपण काम करणार असून लोकहिताचे आणि विकासाचे निर्णय मी स्वतः घेणार, मी रबरी शिक्का म्हणून राहणार नाही. मंत्री पंकजा मुंडे, आमदार धनंजय मुंडे आणि परळीकरांचा पाठिंबा असल्याने विरोधकांचे कोणतेही आव्हान मला वाटत नसल्याचे पद्मश्री धर्माधिकारी यांनी स्पष्ट केले आहे.

भाजपच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराची काँग्रेसच्या उमेदवाराला जाऊन जीवे मारण्याची धमकी 

बीडच्या गेवराईचे माजी आमदार लक्ष्मण पवार यांच्या भाऊजाई गीता पवार या भाजपच्या नगराध्यक्षाच्या उमेदवार आहेत. पण आता त्यांच्याकडून काँग्रेसचे उमेदवार संजीवनी चाळक यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. यानंतर संजीवनी चाळक यांचे पती मनोहर चाळक यांनी गेवराई पोलीस ठाण्यात धाव घेत घडलेल्या प्रकाची तक्रार दाखल केली आहे. ज्यानंतर एकच खळबळ उडाली आहे.

Girish Mahajan News : जामनेरच्या नगराध्यक्षपदी साधना महाजन

जामनेर नगरपंचायतीच्या निवडणुकीत मंत्री गिरीश महाजन यांच्या पत्नी साधना महाजन यांची नगराध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे. त्यांच्याविरोधात अर्ज दाखल केलेल्या विरोधी पक्षातील उमेदवारांनी आज अर्ज मागे घेतले. त्याचप्रमाणे भाजपचे पाच उमेदवारही बिनविरोध निवडून आले आहेत.

Sunil Kedar : सुनील केदारांच्या विरोधातील तक्रारींकडे काँग्रेस नेत्यांचे दुर्लक्ष

सुनील केदार आणि त्यांच्यासोबतचे जिल्हाध्यक्ष, इतर पदाधिकारी हे उमेदवार ठरविताना आणि रणनीती निश्चित करताना मनमानी करत आहेत, असा आरोप काँग्रेस कार्यकर्त्यांकडून होत आहे. सुनील केदारांच्या मनमानीविरोधात अनेक पदाधिकाऱ्यांनी पक्षाचे राजीनामेही दिले आहेत. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांच्यापर्यंत तक्रार करण्यात आली. मात्र, त्याकडे कानाडोळा करण्यात आला आहे. तक्रारीनंतरही पक्षाने निवडणुकीची संपूर्ण जबाबदारी सुनील केदार यांच्याकडेच कायम ठेवली आहे.

Ashish Shelar :  नवाब मलिकांकडे नेतृत्व असेल तर मुंबईत राष्ट्रवादीशी युती नाही : भाजप नेते आशिष शेलार

राष्ट्रवादी काँग्रेसने मुंबई महापालिका निवडणुकीची जबाबदारी माजी मंत्री नवाब मलिक यांच्याकडे दिले आहे. त्याला भाजपकडून विरोध करण्यात आला आहे. राष्ट्रवादीचे मुंबई महापालिकेसाठी मलिक यांच्याकडे नेतृत्व असेल तर महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस नसावी, अशी भाजपच्या सर्वसामन्या कार्यकर्त्याची भावना आहे, असे भाजपचे मंत्री आशिष शेलार यांनी सांगितले.

Kagal Politic's : दोन कट्टर विरोधक एकत्र; कागलमध्ये आता शिवसेनेची एन्ट्री

कागल नगरपालिका निवडणुकीत कट्टर विरोधक कॅबिनेट मंत्री हसन मुश्रीफ आणि समरजितसिंह घाटगे यांच्यामध्ये युती झाली आहे. त्या विरोधात आता एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची एन्ट्री झाली आहे. कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आबीटकर हे माजी खासदार मंडलिकांसाठी आता मैदानात उतरले आहेत. शिवसेनेच्या कोणत्याही उमेदवाराने माघार घेऊ नये यासाठी सर्व उमेदवारांना शिंदेसेनेकडून अज्ञातस्थही हलविण्यात आले आहे.

Shahajibapu Patil : सांगोल्यात काय घडतंय हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कळत नाही का? : शहाजीबापू पाटील

सांगोल्यात काय घडतंय हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कळत नाही का? मी त्यांचा असा कोणता शब्द मोडला आहे. हे त्यांनी मला सांगावं. माझ्या सांगोला मतदारसंघातून भाजपचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना पंधरा हजार मतांचे लिड आहे. मोहिते पाटील घराण्याचा उमेदवार होता. परिस्थिती अत्यंत बिकट होती. पण माझ्या आजाराकडे दुर्लक्ष करून भाजप उमेदवाराचे काम केले, असे माजी आमदार शहाजीबापू पाटील यांनी सांगितले.

Eknath Shinde Delhi Tour :  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि रवींद्र चव्हाणांची एकनाथ शिंदेंनी केली अमित शाहांकडे तक्रार

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची दिल्लीत जाऊन भेट घेतली. या दिल्ली भेटीत शिंदे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची अमित शाह यांच्याकडे तक्रार केल्याची माहिती आहे. प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनी शिवसेना नेते फोडण्याचा सपाटाच लावला आहे. दुसरीकडे फडणवीस यांनी बाळासाहेब ठाकरे स्मारक समितीचे अध्यक्षपद आम्हीच खरी शिवसेना असताना उद्धव ठाकरे यांच्याकडे दिले आहे, अशी तक्रार केल्याचे सांगितले जात आहे. यावर एकनाथ शिंदे यांनी मी रडणारा नाही. मी लढणारा आहे. आणि हा माझा दौरा स्थानिकचे विषय दिल्लीत मांडण्यासाठी नव्हता, असे सांगितले.

Uddhav Thackeray जे दिवटे निघाले त्यांना मशालीचं महत्त्व कळलं नाही

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्याध्यापक आणि शिक्षकांच्या एका कार्यक्रमाला संबोधित केले. यावेळी त्यांनी शिवसेनेच्या मशाल चिन्हाचा उल्लेख करत काही जणांवर टीका केली. 'अशाचे काही देवटे निघालेत, त्यांना मशालीचं महत्त्व कळलं नाही आणि कळलेलं नाही,' असे विधान उद्धव ठाकरे यांनी केले. कार्यक्रमात बोलताना त्यांनी कामाचे महत्त्व सांगितले, कार्यक्रमाच्या आकाराचे नाही. तसेच, शिवसेनेच्या माध्यमातून शिक्षक मतदारसंघातून निवडून आलेल्या लोकप्रतिनिधीने विधानपरिषदेत आणि आपल्या कामात वेगळा ठसा उमटवला आहे, असे सांगत त्यांनी त्या प्रतिनिधीचे कौतुक केले.

Uddhav Thackeray : चांगल्या लोकांना सुद्धा देशद्रोही ठरून तुरुंगात टाकले जाते 

शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिक्षण व्यवस्था आणि आमदार निधीच्या वापरावर भाष्य केले आहे. विरोधी पक्षांच्या आमदारांचा निधी कसा रोखला जातो यावर टीका करताना त्यांनी घराणेशाही आणि संस्कारांवरही मत मांडले. 'चांगल्या लोकांना सुद्धा कसं देशद्रोही ठरून तुरुंगात टाकले जातं हे सोनम वांगचुक एक उत्तम उदाहरण आहे,' असे म्हणत त्यांनी सोनम वांगचुक यांच्या अटकेच्या वृत्तावरून सरकारच्या धोरणांवर टीका केली. शिक्षण पद्धतीत काळानुरूप आणि विभागानुसार बदल व्हायला हवेत, असे मत त्यांनी व्यक्त केले. पाटी-पेन्सिलपासून कॉम्प्युटरपर्यंतच्या प्रवासाचा उल्लेख करत, मातृभाषेतील शिक्षणाचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले. यावेळी त्यांनी स्वतःच्या आणि शिवसेनाप्रमुखांच्या अपूर्ण राहिलेल्या शालेय शिक्षणाची आठवणही सांगितली.

अंबरनाथमध्ये आयोगाचा भोंगळ कारभार, निवडणूत चिन्हाखाली पक्षाचं नाव नाही |

अंबरनाथमध्ये निवडणूक आयोगाचा भोंगळ कारभार समोर आला आहे. कोणत्या पक्षाचे कोणते चिन्ह आहे हे स्पष्ट व्हावे म्हणून नगरपालिकेच्या बाहेर एक विशेष माहिती फलक उभारण्यात आला आहे. मात्र या फलकावरील निवडणूक चिन्हाखाली पक्षाचं नावं लिहिले नसल्याचं समोर आलं आहे. राज्यस्तरीय पक्षांच्या चिन्हांखालीही पक्षाचं नावं दिलेलं नाहीत...

नवी मुंबईत बोगस कॉल सेंटरवर छापा; 17 जणांना अटक

नवी मुंबईतील मिलेनियम बिझनेस पार्कमधील बोगस कॉल सेंटरवर पोलिसांनी छापा टाकला. तब्बल 12 तास चाललेल्या या कारवाईत 17 जणांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये कॉल सेंटरमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. विशेषतः अमेरिका आणि युरोपमधील नागरिकांना टार्गेट करून शेअर मार्केटमध्ये अपार नफा मिळेल असा खोटा दिखावा करत होते.

Nitish Kumar Oath Ceremony Live: 'नितीश सरकार' मध्ये एकमेव मुस्लिम मंत्री

बिहारचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांनी आज नितीश सरकारच्या मंत्र्यांना शपथ दिली. जमा खान, संजय सिंह टाइगर, अरुण प्रसाद, रमा देवी आणि नारायण प्रसाद यांनी मंत्र्यांना शपथ दिली.

उपमुख्यमंत्रीपदी सम्राट चौधरी, विजय कुमार सिन्हा

सम्राट चौधरी, विजय कुमार सिन्हा- यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली, पाटण्याच्या गांधी मैदानात हा शपथविधी सोहळा सुरु आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत शपथ 

नितीश कुमार यांनी बिहारच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली, ते दहाव्यांदा बिहारचे मुख्यमंत्री झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांच्यासह देशातील भाजपशासित राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री उपस्थित आहेत.

नितीश कुमार यांच्या शपथविधीसाठी मोदींचे आगमन

बिहारचे मुख्यमंत्रीपदी आज नितीश कुमार विराजमान होणार आहे. त्यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी नरेंद्र मोदी दाखल झाले आहेत. अमित शाह, आणि पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डादेखील उपस्थित आहेत

Sheetal Tejwani: शीतल तेजवानीची आज पुन्हा चौकशी

मुंढवा जमीन गैरव्यवहारप्रकरणी शीतल तेजवानीची आज पुन्हा चौकशी होणार आहे. पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं शीतल तेजवानीचा जबाब नोंदवला आहे. मंगळवारी तेजवानीचा प्राथमिक जबाब नोंदवण्यात आला आहे. शीतल तेजवानीला अटक का केली नाही असा सवाल सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी उपस्थित केला आहे.

Bihar CM oath taking ceremony LIVE: 25 मंत्री शपथ घेणार

नितीश कुमार यांच्यासोबत आज २५ मंत्री शपथ घेणार आहेत. सम्राट चौधरी आणि विजय कुमार सिन्हा हे उपमुख्यमंत्रीपदाची शपत घेणार आहे. भाजपचे १२ आमदार मंत्रि‍पदाची शपथ घेतील. तर जेडीयूचे ७ आमदार मंत्रि‍पदाची शपथ घेणार आहेत.

Nitish Kumar oath ceremony LIVE: शपथविधी सोहळ्याला आदित्यनाथ उपस्थित राहणार

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे देखील नितीश कुमार सरकारच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. ते या सोहळ्यासाठी पाटण्याला रवाना झाले आहेत.बिहार निवडणुकीत आदित्यनाथ यांनी ३१ सभा घेतल्या होत्या.

खासदार मुरलीधर मोहोळांनी घेतली नितीन गडकरींची भेट

पुण्याचे खासदार तथा केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. नवले पूल परिसरात होणाऱ्या अपघात रोखण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या माध्यमातून अल्पकालीन आणि दीर्घकालीन उपाययोजना राबविण्यात याव्यात, याबाबत दोघांमध्ये चर्चा झाल्याची माहिती आहे.

माजी सभापती दिलीप भोईर यांना जामीन मंजूर

अलिबाग तालुक्यातील चोंढी येथील संगणक प्रशिक्षण केंद्राच्‍या संचालिका रूपाली थळे, त्यांचे पती विजय थळे आणि त्यांच्या नातेवाईकांवर दिलीप भोईर आणि त्यांच्या साथीदारांनी हल्ला केल्याचा आरोप होता. या प्रकरणी आता रायगड जिल्हा परिषदेचे माजी सभापती दिलीप भोईर यांच्यासह एकूण 21 आरोपींना मुंबई उच्‍च न्‍यायालयाने जामीन मंजूर केला आहे.

सांगलीच्या विद्यार्थ्याची दिल्लीतील मेट्रोच्या प्लॅटफॉर्मवरून उडी मारून आत्महत्या

सांगली जिह्यातील खानापूर तालुक्यातील रहिवासी असलेल्या शौर्य प्रदीप पाटील या दहावीत शिकत असणाऱ्या विद्यार्थ्याने दिल्लीतील मेट्रो स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवरून उडी मारून आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. दिल्लीतील सेंट कोलंबस शाळेच्या प्राचार्या आणि शिक्षिकांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याचं सांगितलं जात आहे.

CM Nitish Kumar Oath Taking Ceremony : नितीश कुमारांचा आज शपथविधी, दहाव्यांदा घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ

नितीश कुमार आज बिहारच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. ते दहाव्यांदा मुख्यमंत्रि‍पदाची शपथ घेणार आहेत. त्यांच्यासोबत सम्राट चौधरी आणि विजय सिन्हा हे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. पाटणा येथील गांधी मैदानात शपथविधी पार पडेल. या सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, जेपी नड्डा उपस्थित राहणार आहेत.

आपलेच आहेत तर समोर का? निलेश राणेंचा सवाल

शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार निलेश राणेंनी त्यांचे बंधू तथा भाजप नेते नितेश राणेंना उद्देशून जर आपलेच आहेत तर समोर का? ते आपल्या बरोबर असले पाहिजेत, असा सवाल केला आहे. शिवाय आगामी निवडणुकीसाठी आपण आता विकासात्मक चर्चा केली पाहिजे, शहर विकास आघाडीवर टीका टिप्पणी होईल, आरोप केले जातील. पैशांचा वापर केला जाईल. मात्र आपण गुलाल उधळायचा, असं वक्तव्य केलं आहे.

बिबट्यांची नसबंदी न केल्यास सरकारची नसबंदी, शशिकांत शिंदेंचा इशारा

राज्यात बिबट्यांच्या हल्यात अनेक लोकांचे जीव जात आहेत. त्यामुळे बिबट्यांची संख्या रोकण्यासाठी त्वरित त्यांची नसबंदी करावी आणि सरकारने बिबट्यांची नसबंदी केली नाही तर सरकारची नसबंदी होईल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी दिला आहे.

कबूतरखान्यांचा वाद पुन्हा मुंबई हाय कोर्टात

मुलुंड पूर्वेकडे नवीन कबुतरखाना सुरू करण्याच्या महापालिकेच्या निर्णयविरोधात मुंबई हाय कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. जुन्या ऐरोली-मुलुंड चेक नाका परिसरात खाडीजवळ कबुतरखाना सुरू केल्यास येथे येणाऱ्या फ्लेमिंगोंना त्याचा धोका होऊ शकतो असा दावा याचिकेत करण्यात आला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com