
रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील तळवडे या गावाने निवडणुकीच्या मतदानासाठी अनोखी मागणी केली आहे. इंटरनेटपासून पूर्णत:वंचित असणाऱ्या या गावात आश्चर्याचकीत करणारे बॅनर झळकत आहे. गावात फुकट फिरू नका, नेट द्या… मत घ्या!, नेट दिलात तरच वोट…, असे हे बॅनर चर्चेचा विषय ठरत आहे.
देशाची राजधानी दिल्लीत लाल किल्ल्याजवळ झालेल्या कार बॉम्बस्फोट प्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे. अटक आरोपी मुजम्मिल शकील गनईनं स्फोटके तयार करण्यासाठी आटा चक्की आणि इलेक्ट्रिकल मशीनचा वापर केल्याची धक्कादायक बाब तपासात समोर आली आहे. फरीदाबादमधील टॅक्सी कार ड्रायव्हरच्या घरातून या वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत.
महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री देशमुख यांची माघार. जयश्री देशमुख यांनी अजित पवार गट आणि भाजप युतीच्या उमेदवाराला दिला पाठिंबा. भगूरमध्ये आता शिवसेना शिंदे गटाच्या अनिता करंजकर आणि अजित पवार गटाच्या प्रेरणा बलकवडे आमने सामने.
लोकल ट्रेनच्या प्रवासात अर्णव खैरे या विद्यार्थ्याला मराठी बोलता येत नाही का? मराठी बोलण्याची लाज वाटते का?, असे बोलत यावरून मारहाण झाली होती. डोंबिवली ते ठाणे दरम्यान ही घटना घडली. झालेल्या मारहाणीमुळे अर्णव विद्यार्थी मानसिक तणावात होता. याच तणावातून या विद्यार्थ्याने कल्याणमध्ये आपल्या घरी येऊन गळफास घेत आत्महत्या केली. याबाबत आज सपा नेते अबू आझमी यांनी गोवंडी मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासमोर आंदोलन केले. याबाबत मुख्यमंत्र्यांनी कडक कारवाई करायला हवी, याला जबाबदार मनसे असून मनसेवर ही कारवाई व्हावी अशी मागणी अबू आझमी यांनी केली आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील बाळासाहेब ठाकरे स्मारकाची पाहणी केली. महापौर बंगल्यामध्ये या स्मारकाचे काम सुरू आहे. काही दिवसांपूर्वीच राज्य सरकारने स्मारक समितीच्या अध्यक्षपदी त्यांची नियुक्ती केली आहे.
नितीश कुमार यांच्या नवीन मंत्रिमंडळातील खात्यांची विभागणी करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी यांना गृह खाते देण्यात आले आहे, तर दुसरे उपमुख्यमंत्री विजय सिन्हा यांना जमीन महसूल आणि खाण खाते देण्यात आले आहे.
दुबईमध्ये आज दुपारी एअर शोदरम्यान मोठा विमान अपघात झाला. उड्डाण घेत असताना भारतीय लढाऊ विमान 'तेजस' कोसळले. या अपघातात जीवितहानी झाल्याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.
नांदेड : उमेदवारी अर्ज घेण्याच्या कारणावरून हिमायतनगरमध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि ठाकरे सेनेत राडा झाला. शुक्रवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी हिमायतनगरमध्ये गोंधळ पहावयास मिळाला. राष्ट्रवादीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार मोहम्मद जावीद आणि ठाकरे सेनेचे माजी नगराध्यक्ष कुणाल राठोड यांच्यात झटापट झाल्याचे पाहावयास मिळाले. राष्ट्रवादीच्या वार्ड क्रमांक 9 च्या उमेदवार सुनीता पंचमासे यांनी अर्ज मागे घेतल्याने वाद झाला होता.
राज्यातील नगपरिषद, नगरपंचायत निवडणुकीचा उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस होता. दुपारी तीन वाजता उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपली आहे. उमेदवारी न मिळालेल्या अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी बंडखोरी केली आहे. तर अनेक अपक्ष सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या नेत्यांची डोकेदुखी वाढवणार आहेत, असे असताना बंडखोर आणि आणि अपक्ष उमेदवारांवर काही नगरपालिका आणि नगर पंचायतींचं समिकरण ठरणार आहे. किती ठिकाणी मविआ आणि किती ठिकाणी महायुती याचे चित्रही स्पष्ट होणार आहे. त्यासोबतच किती नगर पंचायती या बिनविरोध होणार हेदेखील काही वेळातच स्पष्ट होणार आहे.
नगरपालिका निवडणुकीमध्ये राज्यातील मुस्लिम समाज भाजपसोबत आहे. अनेक ठिकाणी मुस्लिम समाज बांधव भाजपच्या कमळ चिन्हावर निवडणुकीसाठी उभे आहेत, आता राज्यातील परिस्थिती बदलली आहे. सोलापूर जिल्ह्यातील सर्व ठिकाणी भाजपचे उमेदवार विजयी होतील, असा दावा ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी पंढरपुरात केला.
युवा स्वाभिमान संघटनेचे अध्यक्ष तथा आमदार रवी राणा यांनी एक खळबळजनक दावा केला. काँग्रेसच्या नेत्या आणि माजी मंत्री यशोमती ठाकूर येणाऱ्या सहा महिन्यांमध्ये भाजपमध्ये दिसतील ही काळ्या दगडावरील पांढरी रेघ आहे, असा दावा केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत त्यांची भेट झाली होती. मला तिवसा मतदार संघाची तिकीट पाहिजे. तिवसाचं भाजपचं तिकीट मला मिळत असेल, तर मी भाजपमध्ये यायला तयार आहे. पण राजेश वानखडे हे उमेदवार फायनल झाले होतं, असेही आमदार राणा यांनी म्हटले.
धाराशिवमधील साखर कारखान्यांनी ऊस दर जाहीर करावा, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी आक्रमक झाली असून, तालुक्यातील ढोकी येथील चौकात स्वाभिमानीचे रास्ता रोको आंदोलन केलं. साखर कारखान्यांनी सर्व नियम धाब्यावर बसवून बेकायदेशीर गाळप सुरू करून शेतकऱ्यांची थट्टा केल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रविंद्र इंगळे यांनी केला. साखर कारखान्यांनी ऊसाला पहिली उचल 3500 रुपये द्यावी, तर गुळपावडर कारखान्यांनी किमान 3 हजार रुपये दर देण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केली आहे.
नाशिक येथील तपोवन वृक्षतोड प्रकरणी अभिनेते सयाजी शिंदे यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. 'कुंभमेळ्यासाठी तपोवनमधील झाडे तोडणे दुर्दैवी आहे. याला खूप विरोधच करावा लागणार आहे. तुम्ही एक झाड तोडून, दहा झाडे लावणार, असे फालतू विधान करत असाल, तर आम्ही एक झाड तोडू नये, यासाठी 100 माणसे मरू, पण एक झाड तोडून देणार नाही,' असा इशारा सयाजी शिंदे यांनी दिला. सरकार आपलं असून सुद्धा ते बेजबाबदार वागत आहे. माझ्या तोंडात शिव्या येत आहेत, अशा शब्दात सयाजी शिंदे यांनी राग व्यक्त केला.
'नगरपालिका निवडणुकीमध्ये राज्यातील मुस्लिम समाज भाजप सोबत आहे. अनेक ठिकाणी मुस्लिम समाज बांधव भाजपच्या कमळ चिन्हावर निवडणुकीसाठी उभे आहेत. आता राज्यातील परिस्थिती बदलली आहे. सोलापूर जिल्ह्यातील सर्व ठिकाणी भाजपचे उमेदवार विजयी होतील,' असा दावा भाजपचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी पंढरपुरात केला.
अहिल्यानगर महापालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-25 साठी विधानसभेच्या मतदार यादीच्या आधारे तयार केलेल्या मतदार याद्या प्रभागनिहाय छापून घेत अधिप्रमाणित केली आहे. सदर मतदार याद्या 20 नोव्हेंबर 2025 रोजी महापालिका क्षेत्रातील नागरिकांना माहितीसाठी मुख्य प्रशासकीय कार्यालय व महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आल्या आहेत. अहिल्यानगर महानगरपालिकेचे संकेतस्थळ www.amc.gov.in येथे फोटो विरहित मतदार यादी निःशुल्क पाहण्यासाठी उपलब्ध आहे.
कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या दौऱ्यापूर्वी आंदोलन करण्याचा प्रयत्नात असलेल्या काँग्रेस पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याने काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर आक्रमक झाल्या आहेत. काँग्रेस कार्यकर्त्यांना नजर कैदेत ठेवल्याने यशोमती ठाकूर पोलिसांवर संतापल्या आहेत. पोलिसांनी वर्दीचा गैरफायदा फायदा घेऊ नये, आम्ही घाबरत नाही, असा इशारा यशोमती ठाकूर यांनी दिला.
जालना शहरातील सिटीएमके गुजराती विद्यालयांमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सकाळी साडेसातच्या सुमारास आठवीमध्ये शिकणाऱ्या 13 वर्षाच्या विद्यार्थिनीने शाळेच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या केली. आरोही दीपक बिडलान असे मयत मुलीचे नाव असून शाळेमध्ये विद्यार्थ्यांच्या त्रासामुळे ही आत्महत्या केल्याचा आरोप मयत मुलीच्या वडिलांनी केला आहे. दरम्यान शालेय व्यवस्थापनाने हे आरोप फेटाळून लावलेले आहेत.
पुण्यातील मुंढवा आणि बोपोडी इथल्या सरकारी जमीन विक्री घोटाळ्यातील मुख्य आरोपी असलेल्या शीतल तेजवानी हिला महसूल व वन विभाग तसेच पुणे पोलिसांनी नोटीस बजावली आहे. शीतल तेजवानी हिच्या पिंपरी इथल्या ज्वेल ऑफ पिंपरी ए-विंगमधील ऑफिस नंबर A-23 ऑफिस या ठिकाणी नोटीस लावून तिला चौकशी समिती समोर हजर राहण्याच्या तसेच पुणे पोलिसांसमोर हजर राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.
मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने अंतर्गत सर्व्हे केला आहे. या सर्व्हेनुसार भाजप मुंबई महापालिकेत स्वबळावर 100 जागा मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे एकनाथ शिंदेंसोबत युतीची आवश्यकता नसल्याची चर्चा सुरू झाली आहे.
रायगडच्या राजकारणातील सुनील तटकरे यांचे कट्टर विरोधक शिंदेंचे आमदार महेंद्र दळवी यांनी तटकरेंना रायगडच्या राजकारणातून हद्दपार करण्याचे आवाहन केले आहे. दळवी म्हणाले, की रोहा तालुक्याची बदनामी होण्याआधी तटकरेंना हद्दपार करा. त्यांची कमळाच्या दिशेने वाटचाल सुरू असून ते लवकरच भाजपमध्ये जातील, असे देखील ते म्हणाले
भाजपकडून काही नगरपालिका, नगरपरिषदेमध्ये नेत्यांच्या कुटुंबात तिकीट देऊन निवडणूक बिनविरोध करण्यात आली आहे. त्यावरून नाव न घेता रोहित पवारांनी भाजपवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले, सत्तेचं अमर्यादित केंद्रीकरण न होता विकेंद्रीकरण होऊन सामान्य माणसालाही निर्णय प्रक्रियेत सामावून घेता यावं, या दृष्टीकोनातून स्थानिक स्वराज्य संस्थांकडं पाहिलं जातं… पण आज मंत्र्यांचीच पत्नी, आई, मामेभाऊ किंवा नेत्याची सून ‘बिनविरोध’ निवडून आणली जातेय.. या ‘बिनविरोध’साठी साम-दाम-दंड-भेद याचा सर्रास वापर केला जातोय. हळूहळू लोकशाही संपण्याची भीती वाटतेय आणि असं झालं तर सर्वाधिक त्रास हा सामान्य माणसाला भोगावा लागणार आहे.
ठाण्यात भाजपच्या माजी नगरसेवकाने एकनाथ शिंदेंच्या पदाधिकाऱ्याच्या कानाखाली लावल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. सरकारी कार्यक्रमादरम्यान हा प्रकार घडला. या प्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
मुंबई महापालिकेत महाविकास आघाडी टिकवण्यासाठी शरद पवारांनी काँग्रेस नेत्यांना फोन केल्याची माहिती आहे. मंगळवारपर्यंत महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक होणार आहे. या बैठकीत मुंबई महापालिका कशी लढायची यावर चर्चा होणार आहे.
काँग्रेसचे जेष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या संगमनेर शहरामध्ये नगरपंचायत निवडणुकीत काँग्रेसचा एकही उमेदवार नाही. या निवडणुकीत पंचा चिन्ह गायब झाले आहे. सत्यजित तांबे यांच्या पत्नी नगराध्यक्षपदाच्या उमेदवार आहेत. दरम्यान, थोरात यांनी भाजपला रोखण्यासाठी स्थानिक आघाडी करून लढत असल्याचे म्हटले आहे.
विधानमंडळ तसेच संसद सदस्यांना सन्मानाची आणि सौजन्याची वागणूक देण्याबाबत राज्य सरकारने नवा जीआर गुरूवारी (ता.20) काढला आहे. या जीआरमध्ये राज्यातील आमदार खासदारांना सन्मानाची वागणूक मिळण्यासंदर्भात काही मार्गदर्शक तत्वे नमूद केली आहेत. या शासन निर्णयात विधानमंडळ सदस्य/संसद सदस्य कार्यालयास भेट देतील, त्यावेळी त्यांना संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी त्यांना आदराची व सौजन्याची वागणूक द्यावी. तसंच आमदार खासदारांचे म्हणणे काळजीपूर्वक ऐकून त्यांना लवकरात लवकर मदत करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
राज्यातील नगपरिषद, नगरपंचायत निवडणुकीचा उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस आहे. 2 डिसेंबरला नगपरिषद, नगरपंचायतींच्या निवडणुकीसाठी मतदान पार पडणार आहे. तर 3 डिसेंबरला निकाल जाहीर होणार आहे.
काशिनाथ चौधरी पक्ष प्रवेशाच्या प्रकरणावर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, मी मुख्यमंत्री असताना भाजपनं साधू हत्याकांडातील आरोपी म्हणून किती बोंबाबोंब केली होती. तेव्हा भाजपने शिवसेना कशी हिंदुत्वाच्या विरोधात आहे हे बोंबलून सांगितलं आणि आता त्याच चौधरीला पक्षात प्रवेश दिला. हा हिंदुत्वाचा अपमान नाही? फडणवीस म्हणतात स्थानिक पातळीवर चौकशी केली होती. तो चौधरी या हत्याकांडात सामील असेल तर प्रवेश का दिला? आणि नसेल तर प्रवेश का थांबवला? त्याचा संबंध नसेल तर भाजपनं आणि फडणवीसांनी चौधरीची, हिंदूंची आणि शिवसेनेची माफी मागितली पाहिजे.'
मनी लाँड्रिंग प्रकरणातील खटला रद्द करण्यासाठी बडतर्फ पोलिस अधिकारी सचिन वाझे यांनी याचिका दाखल केली आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या कथित भ्रष्टाचाराशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणातील आरोपी सचिन वाझे यांनी मंगळवारी मुंबई सत्र विशेष न्यायालयात ही याचिका दाखल केली.
महाविकास आघाडीच्या खासदारांच्या निधीतून टक्केवारी मिळत नसल्याने डीपीडीसीचा निधी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याकडून थांबवला जात असल्याचा गंभीर आरोप खासदार प्रणिती शिंदे यांनी केला आहे. तर गोरेनीं जिल्ह्यातील खासदार धैर्यशील मोहिते पाटील, ओमराजे निंबाळकर आणि आता माझाही डीपीडीसीचा निधी थांबवल्याचा दावाही त्यांनी केला आहे.
मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथील चिमुकलीवर झालेला अत्याचार व हत्येच्या निषेधार्थ दिनांक आज मालेगाव शहर बंदची हाक पुकारण्यात आली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.