Maharashtra Politics Live Update
Maharashtra Politics Live UpdateSarkarnama

Maharashtra Political Updates : राज्यात दिवसभरात काय राजकीय घडामोडी घडल्या? जाणून घ्या एका क्लिकवर

Sarkarnama breaking Updates : लोकशाहीमध्ये नाराजी चालत नाही, नाराजी घरात चालते’ अशा शब्दात सुप्रिया सुळे यांनी जगताप यांच्या नाराजी नाट्याला धुडकावले होते.
Published on

शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून महापालिकांसाठी निवडणूक प्रभारींच्या नियुक्त्या जाहीर 

राष्ट्रवादी शरद पवार गटाकडू महानगरपालिकांसाठी निवडणूक प्रभारी म्हणून नियुक्ती.

- विदर्भातील चार महानगर पालिकेमध्ये पूर्व विदर्भातील नागपूरमध्ये माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर जबाबदारी तर चंद्रपूर जिल्ह्यासाठी खासदार अमर काळे यांच्या जबाबदारी देण्यात आली आहे.

- तेच अमरावती जिल्ह्याची जबाबदारी माझी मंत्री रमेश बंग यांना तसेच अकोला जिल्ह्याची जबाबदारी राजेंद्र शिंगणे यांच्यावर सोपवण्यात आली आहे.

मुंबईतील भाजप उमेदवारांवर अंतिम शिक्कामोर्तब होण्याची शक्यता

भाजप निवडणूक संचलन समितीची बैठक दादरच्या वसंतस्मृती कार्यालयात सुरु आहे. भाजप निवडणूक प्रभारी आशिष शेलार, मुंबई अध्यक्ष अमित साटम यांच्या नेतृत्वाखाली बैठक सुरु आहे. या बैठकीत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, प्रविण दरेकर, चित्रा वाघ, अतुल भातखळकर यांची प्रमुख उपस्थिती आहे. या बैठकीत मुंबईतील भाजप उमेदवारांवर अंतिम शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.

कोल्हापुरात काँग्रेस आणि ठाकरेसेनेची युती

कोल्हापूर महानगर पालिकेसाठी निवडणूक घोषित झाली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीतील काँग्रेसकडून मित्र पक्षांशी युतीबाबत चर्चा सुरू होती. त्याला यश आले असून कोल्हापुरात काँग्रेस आणि ठाकरेसेनेची युती झाली आहे.

दीड हजार लोकवस्तीच्या गावात 28 हजार पेक्षा जास्त जन्म नोंदी,  बांगलादेशी नागरिकांची नावे

यवतमाळच्या शेंदूरसणीत दीड हजार लोकवस्तीत 28 हजार पेक्षा जास्त नोंदी आढळल्याने खळबळ उडाली आहे. येथे जन्मानोंदीत 80% बांगलादेशी नागरिकांची नावे आढळली आहे. यामुळे आता राज्य सरकारच्या गृह विभागाने चौकशी समिती नेमली असून एसआयटी समितीद्वारेही चौकशी होणार आहे. सायबर अतिरिक्त पोलीस महासंचालक यशस्वी यादव, यांच्या अध्यक्षतेखाली आरोग्य उपसंचालक बबिता कमलापूरकर जिल्हा आरोग्य अधिकारी सुभाष ढोले यांची समिती असेल.

उद्या काँग्रेसची पार्लमेंट्री बोर्डची बैठक

उद्या काँग्रेसची पार्लमेंट्री बोर्डची बैठक होणार असून राज्यातले प्रमुख नेते या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ पृथ्वीराज चव्हाण बाळासाहेब थोरात नाना पटोले असे दिग्गज नेते या बैठकीमध्ये उपस्थित राहणार असल्याची माहिती सूत्राने दिली आहे.

मंत्री नितेश राणे आमदार प्रविण दरेकर व प्रसाद लाड यांना कुडाळ न्यायालयाचा दणका

राज्याचे कैबिनेट मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांना कुडाळ न्यायालयाचा अजामीनपात्र अटक वॉरंट जारी

तर संविधान बचाव आंदोलन केल्याप्रकरणी आमदार प्रविण दरेकर व आमदार प्रसाद लाड यांनाही अजामीनपात्र अटक वॉरंट जारी.

२६ जून २०२१ रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यात झालेल्या ओबीसी आंदोलनात सहभाग घेतल्या प्रकरणी कुडाळ पोलीस स्थानकात झाला होता गुन्हा दाखल

राजन तेली यांच्यासह आमदार निलेश राणे, मंत्री नितेश राणे यांच्यासह अन्य ४२ जणांवर आंदोलन प्रकरणी झाला होता गुन्हा दाखल

मात्र आज झालेल्या सुनावणीस आमदार निलेश राणे व राजन तेली व अन्य आरोपी राहीले उपस्थित तर नितेश राणे यांच्यासह अन्य 5 जन होते गैरहजर.

न्यायालयाने अनुपस्थित राहिलेल्या नितेश राणे यांच्या वकिलांचा विनंती अर्ज नाकारत जारी केला अटक वॉरंट.

वारंवार न्यायालयाच्या तारखांना गैरहजर राहिल्याने अजामीनपात्र अटक वॉरंट जारी

ठाकरेसेना आणि मनसे युतीचा भंडाऱ्यात जल्लोष...

उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि राज ठाकरेंची महाराष्ट्र नवनिर्माण सेना एकत्र येत महानगरपालिकांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर युतीची घोषणा केली. तब्बल 20 वर्षानंतर हे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्यानं राज्यभरात ठाकरे आणि मनसेचे पदाधिकारी जल्लोष साजरा करत असताना भंडाऱ्यातही या दोन्ही भावांच्या पक्षांच्या युतीचा जल्लोष करण्यात आला.

अखेर प्रशांत जगताप यांचा राजीनामा!

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी अखेर राजीनामा दिला आहे.

पुण्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का

सुप्रिया सुळे यांच्याशी सहा तास चर्चा केल्यानंतरही अखेर राजीनामा

‘लोकशाहीमध्ये नाराजी चालत नाही, नाराजी घरात चालते’ अशा शब्दात सुप्रिया सुळे यांनी जगताप यांच्या नाराजी नाट्याला धुडकावले होते.

दोन्ही राष्ट्रवादी पुणे महानगर पालिकेच्या निवडणुकीत एकत्र येणार हे आता जवळपास निश्चित झाले आहे.

Maharashtra Cabinet News : नगराध्यक्षांच्या अधिकारात वाढ, अधिनियमात सुधारणा करण्याचा मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

महाराष्ट्रातील नगरपालिका, नगरपंचायती आणि औद्योगिक नगरी अधिनियम 1965 मध्ये सुधारणा करण्याचा निर्णय आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाला. नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या थेट निवडून आलेल्या अध्यक्षास सदस्यत्व मिळण्याबरोबर, मताचाही अधिकार मिळणार आहे. अधिनियमातील सुधारणेसाठी अध्यादेश नगर विकास विभाग काढणार आहे.

Ahilyanagar Politics : अहिल्यानगर महापालिकेसाठी विक्रमी एकूण 1 हजार 164 अर्जांची विक्री

अहिल्यानगर महापालिकेसाठी विक्रमी एकूण 1 हजार 164 अर्जांची विक्री झाली आहे. आतापर्यंत फक्त भाजपच्या एका उमेदवाराने दोन अर्ज भरले आहे. महायुतीचे चित्र स्पष्ट न झाल्याने भाजप, एकनाथ शिंदे शिवसेना, अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसकडून इच्छुकांमध्ये अस्वस्थता आहे.

Congress And VBA : काँग्रेस अन् वंचितची आघाडी फिस्कटली

अकोल्यासह इतर महापालिकेत आता वंचित आणि काँग्रेसची आघाडी होणार नसल्याचं समोर आलं आहे. राज्यातल्या महापालिका निवडणुकीत काँग्रेस अन् वंचितची आघाडी होणार, अशी जोरदार चर्चा सुरु होती. मात्र, या चर्चेला आता विराम लागला. प्रस्ताव कोणी द्यावा, यावरून आता दोन्ही पक्षात ओढाताण होती. 'पहले आप, पहले आप', वरूनचं आता दोन्ही पक्षातील आघाडीची चर्चा थांबली. माजी आमदार तथा वंचितचे नेते नतिकोद्दीन खतीब यांनी काँग्रेससोबत आघाडीबाबत उशीर झाल्याचे सांगितले.

Sindhudurg Update : मंत्री राणे, आमदार दरेकर अन् लाड यांना कुडाळ न्यायालयाचा दणका

राज्याचे भाजपचे मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नीतेश राणे यांना कुडाळ न्यायालयाचा अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केलं आहे. संविधान बचाव आंदोलन केल्याप्रकरणी आमदार प्रवीण दरेकर व आमदार प्रसाद लाड यांनाही अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केलं आहे. 26 जून 2021 रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यात झालेल्या ओबीसी आंदोलनात सहभाग घेतल्याप्रकरणी कुडाळ पोलिस स्थानकात गुन्हा दाखल झाला होता. राजन तेली, आमदार नीलेश राणे, मंत्री नीतेश राणे यांच्यासह अन्य 42 जणांवर आंदोलन प्रकरणी गुन्हा दाखल झाला होता.

ShivsenaUBT Vs BJP : उल्हासनगरचा शिवसेना ठाकरे पक्षाचा जिल्हाप्रमुखांचा भाजपमध्ये प्रवेश

ठाकरे बंधूंची युती झाली असतानाच, उल्हासनगरमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाला धक्का बसला आहे. कल्याण जिल्हाप्रमुख धनंजय बोडारे यांचा भाजपमध्ये प्रवेश केला आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत बोडारे यांनी हा पक्ष प्रवेश केला आहे.

Kalyan Dombivli Municipal Corporation : कल्याण डोंबिवली महापालिका निवडणूक; पहिल्याच दिवशी विक्रमी 912 उमेदवारी अर्जांची विक्री

कल्याणडोंबिवली महापालिकेच्या आगामी निवडणुकीची तारीख जवळ येत असतानाच शहरातील राजकीय हालचालींना प्रचंड वेग आला आहे. महायुती आणि महाविकास आघाडीतील जागावाटप अद्याप अंतिम झाले नसले, तरी इच्छुक उमेदवार कोणताही धोका पत्करायला तयार नसल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. त्याचाच परिणाम म्हणून उमेदवारी अर्ज विक्रीच्या पहिल्याच दिवशी विक्रमी प्रतिसाद मिळाला असून तब्बल 912 नामनिर्देशन अर्जांची विक्री झाली आहे.

Ahilyanagar Politics : दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्याने अहिल्यानगरमध्ये जल्लोष

महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष एकत्र येत, आज घोषणा झाल्यानंतर शिवसेना आणि मनसेच्या कार्यकर्त्यांनी अहिल्यानगर शहरातील दिल्ली दरवाजा इथं फटाके फोडत एकमेकांना मिठाई भरवत आनंदोत्सव साजरा केला. अहिल्यानगर महापालिका निवडणुकीत शिवसेना आणि मनसे एकत्रित निवडणूक लढवून महापालिकेवर विजयाचा झेंडा रोवणार असल्याचे यावेळी दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सांगितले.

Uddhav Raj Thackeray Alliance : ठाकरे बंधू एकत्र आल्याने दोनही ठाकरे कार्यकर्त्यांचा नवी मुंबईत जल्लोष

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येत युतीची घोषणा केल्यावर राज्यभरातील दोनही ठाकरे बंधूंच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. नवी मुंबईत देखील मनसे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी नेरुळ इथं जल्लोष साजरा करत एकमेकांना लाडू, पेढे भरवत तोंड गोड केलं. नेरुळमधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्प अर्पण करून अभिवादन करत चौकात जल्लोष साजरा केला.

Ashish Shelar : ठाकरे बंधुंच्या युतीच्या घोषणेवर आशिष शेलारचं ट्वीट

घेरलं होतं मातोश्रीवरील "विठ्ठलाला" बडव्यांनी.. तुमच्या मते, पक्षाचा ताबा घेतला होता चार कारकुनांनी...

माजी वनमंत्री सुरुपसिंग नाईक यांचे उपचारावेळी निधन.. 

नंदुरबार, धुळे जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री सुरुपसिंग नाईक (वय 88) यांचे वृध्दापकाळाने निधन झाले. त्यांच्या निधनाने दर्‍याखोर्‍यातील आदिवासी बांधवांना न्याय मिळवून देणारा बुलंद आवाज हरपला आहे

Raj - Uddhav Thackeray : ठाकरे बंधुंची युती जाहीर!

मुंबईचा महापौैर आमचाच होणार, मुंबईच्या महानगरपालिका निवडणुकीसाठी मनसे शिवसेना एकत्र. ठाकरे बंधुंची युती जाहीर.

महाराष्ट्रासाठी आजचा दिवस ऐतिहासिक आहे- संजय राऊत

आज महाराष्ट्रासाठी अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. संयुक्त महाराष्ट्र चळवळीनंतर मराठी एकजुटीचे दर्शन पुन्हा घडत आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्याने राज्यात आनंदाचे वातावरण आहे. मुंबईसह अनेक महापालिकांमध्ये विजयाचा भगवा फडकेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. महाराष्ट्राचे नेतृत्व ठाकरेच करू शकतात, असे संजय राऊत यांनी सांगितले.

काही क्षणांत ठाकरे बंधुंच्या युतीची घोषणा!

18 वर्षानंतर ठाकरे बंधु एकत्र, थोड्याचं वेळात ठाकरे बंधुंच्या युतीची घोषणा.

ठाकरे बंधूंकडून बाळासाहेबांना अभिवादन.. 

राज ठाकरे-उद्धव ठाकरे यांनी आपल्या परिवारासह बाळासाहेबांना अभिवादन केले आहे. यावेळी सोनचाफ्याची फुले बाळासाहेंबांच्या स्मृतीस्थळावर वाहण्यात आले.

ठाकरे बंधू बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मतीस्थळाकडे निघाले आहेत. थोड्याच वेळात ते बाळासाहेबांना अभिवादन करणार आहेत. 

Prashant Jagtap live: प्रशांत जगतापांची आज पुण्यात पत्रकार परिषद

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप आज पत्रकार परिषद घेणार आहेत. मुंबईत येऊन त्यांनी खासदार सुप्रिया सुळे आणि प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्याशी चर्चा केली. मुंबईतील पक्ष कार्यालयात त्यांची सुमारे तीन तास चर्चा झाली. पुण्यात अजित पवारांशी आघाडी करु नये अशी भूमिका, प्रशांत जगताप यांनी घेतली आहे. ते राजीनामा देणार की अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसोबतच्या युतीला पाठिंबा देणार हे लवकरच समजेल.

Supriya Sule: सुप्रिया सुळे आज कार्यकर्त्यांनी साधणार संवाद 

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे आज पुण्यात पक्ष कार्यालयात कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या राजीनाम्याबाबत त्या चर्चा करणार आहेत.

Nashik Mahapalika News: नाशिक पालिकेसाठी पहिल्याच दिवशी विक्रमी अर्जांची विक्री

महापालिका निवडणूक उमेदवारी अर्ज विक्रीच्या पहिल्या दिवशी मंगळवारी सहाही विभाग मिळून विक्रमी १,७६३ अर्जांची विक्री झाली. सर्व ठिकाणी अर्ज घेण्यासाठी उमेदवारांची मोठी गर्दी झाली होती.

Maharashtra Politics live:दुपारी 12 वाजता पत्रकार परिषद

युतीच्या घोषणेआधी ठाकरे बंधू शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळास एकत्र येऊन अभिवादन करणार आहेत. दुपारी 12 वाजता पत्रकार परिषदेत ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होणार आहे. त्यापूर्वी सकाळी 11 वाजता मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे शिवाजी पार्क येथे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळी जाणार आहेत.

महापालिका निवडणुकीत पैशाचा वारेमाप खर्च करणाऱ्यांवर पडणार इन्कम टॅक्सची धाड

गेल्या अनेक वर्षापासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता संपन्न होत आहेत. या पार्श्वभूमीवर निवडणुकीत होणाऱ्या पैशांच्या वापरावर इन्कमटॅक्स विभाग वाॅच ठेवणार आहे. वारेमाप खर्चावर आळा घालण्यासाठी निवडणूक काळात 24 तास नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. निवडणूक काळात येणाऱ्या तक्रारींवरती त्वरित दखल घेण्यात येणार असून संबंधित ठिकाणी धाड टाकण्यासाठी पथकांची देखील निर्मिती करण्यात आली आहे. आचारसंहिता लागू राहील तोपर्यंत ही यंत्रणा सक्रिय राहणार आहे. निवडणूक प्रचारादरम्यान रोख रक्कम किंवा मौल्यवान वस्तूंचा दुरुपयोग होत असल्यास, त्याची माहिती नागरिकांना सहज देता यावी, यासाठी ही व्यवस्था कार्यान्वित करण्यात आली आहे.

या क्रमांकावर माहिती देता येणार

टोल फ्री क्रमांक – १८००-२३३-०७०१

व्हॉट्सॲप क्रमांक – ९९२२३८०८०६

ईमेल आयडी – pune.pdit.inv@incometax.gov.in

पत्ता – नियंत्रण कक्ष, कक्ष क्र. ८२९, ८ वा मजला, आयकर सदन, बोधी टॉवर, सॅलिसबरी पार्क, गुलटेकडी, पुणे ४११०३७

पुण्यात अस्तित्व दाखवायची खुमखुमी असेल तर स्वत:चा पक्ष काढ, मिटकरींनी जगतापंना डिवचलं

आगामी महापालिका निवडणुकांमध्ये दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रित निवडणुका लढणार असल्याच्या चर्चांना आता अंतिम स्वरूप येताना पाहायला मिळत आहे. मात्र या एकत्रिकरणाला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पुण्यातील शहराध्यक्ष प्रशांत जगताप हे विरोध करताना दिसत आहेत. सुरूवातीला त्यांनी पक्षाला निर्वाणीचा इशारा देत राजकारणातून काही काळ संन्यास घेणार असल्याचं सांगितलं होतं. त्यानंतर आता त्यांनी आपला राजीनामाच पक्षाकडे दिल्याचं सांगितलं जात आहे. त्यांच्या याच भूमिकेवरून अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी त्यांना डिवचलं आहे. "अजितदादांच्या पुण्याईने विविध पदांवर पुण्यात शेखी मिरवणाऱ्या पुण्याच्या माजी महापौराला कोअर कमिटी व ज्येष्ठ नेत्यांच्या एकत्र येण्याच्या निर्णयाने चांगलाच जुलाब लागलाय. मागच्या काळात राजकीय संन्यास घेणार, राजीनामा देणार,अशा वल्गना करत निष्ठावंत वगैरे बिरुदावली चढवत भावी खासदारकीचे स्वप्न पाहणाऱ्या उपटसुंभाचा पीळ स्वभावाप्रमाणे कायम राहणार यात शंका नाही. खरच पुण्यात स्वतःच अस्तित्व दाखवायची खुमखुमी असेल तर स्वत:चा एखादा पक्ष काढ की बाबा, अशा शब्दात मिटकरींनी जगताप यांच्यावर टीका केली आहे.

Valmik Karan news : वाल्मीक कराडचा दोष मुक्तीसाठी खंडपीठात अर्ज

बहुचर्चित संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मीक कराडने औरंगाबाद खंडपीठात दोषमुक्तीसाठी अर्ज सादर केला आहे. या याचिकेवर सुनावणी घेत खंडपीठाने पुढील सुनावणी १५ जानेवारी रोजी ठेवली आहे.

सुधीर मुनगंटीवार यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट

भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची काल रात्री मुख्यमंत्र्यांच्या 'वर्षा' या शासकीय निवासस्थानी भेट घेतली. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. नगरपालिका निकालानंतर मुनगंटीवारांनी पक्षावर नाराजी व्यक्त केली होती. पक्षानेच माझी ताकद केल्याचा आरोप त्यांनी केला होता. त्यानंतर मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या भेटीत चंद्रपुरातील स्थानिक विषयांवर चर्चा झाल्याचं मुनगंटीवार यांनी सांगितलं.

ठाकरे बंधू आज दुपारी 12 वाजता युतीची घोषणा करणार

आज दुपारी 12 वाजता वरळीतील हॉटेल ब्लू सी मध्ये राज आणि उद्धव या ठाकरे बंधुंच्या युतीची घोषणा केली जाणार आहे. याबाबतची माहिती ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सोशल मिडिया पोस्टद्वाले दिली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com