Shivsena V/S BJP Politics News : राज्याचे अल्पसंख्याक विकास व पणन तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्याविरोधातील रोष दिवसेंदिवस वाढतो आहे. सिल्लोड-सोयगाव विधानसभा मतदारसंघात नवरात्र आणि दसरा, दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मंत्री अब्दुल सत्तार यांच्याकडून लाडक्या बहीणींना साड्या, ड्रेस व नऊवार पातळांचे वाटप केले जात आहे.
गावागावात हा उपक्रम धुमधडाक्यात सुरू असताना 6 आॅक्टोबर रोजी सर्वप्रथम वांगी (बुद्रक) गावात साड्यांची होळी करण्यात आली होती. त्यानंतर हे लोण मतदारसंघातील इतर गावांमध्ये हळूहळू पसरले. (Abdul Sattar) मांडणा आणि आज उंडणगाव येथे अब्दुल सत्तार मित्र मंडळाकडून वाटप करण्यात आलेल्या साड्यांची गावातील मुख्य चौकात होळी करण्यात आली. यावेळी अब्दुल सत्तार यांच्याविरोधात घोषणाबाजी देखील करण्यात आली.
या घटनेने तालुक्यात एकच खळबळ उडाली असून राजकीय वातावरण तापले आहे. अब्दुल सत्तार हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जातात. सरकारची प्रत्येक योजना मतदारसंघात प्रभावीपणे राबवली जावी, यासाठी सत्तारांची यंत्रणा राबत असते. या सोबतच अब्दुल सत्तार यांच्याकडून मतदारसंघातील महिलांना वैयक्तिक भेट, मदतही केली जाते.
परंतु गेल्या काही महिन्यापासून विशेषत: लोकसभेच्या जालना मतदारसंघात महायुतीचा पराभव झाल्यापासून मित्रपक्ष असलेल्या भाजपशी सत्तारांचे बिनसले आहे. त्यात वांगी (बुद्रक) येथील नवरात्रोत्सवानिमित्त आयोजित व्याख्यानात एका मुस्लिम महिलेने गोंधळ घालत `तुम्हाल सत्तार शेठ यांच्या साड्या कशा चालतात`? असे म्हणत गोंधळ घातला. (Shivsena) यानंतर गावातील महिलांनी एकत्रित येत अब्दुल सत्तार यांच्याकडून वाटण्यात आलेल्या साड्यांची होळी केली आणि निषेधाच्या घोषणा दिल्या.
त्यानंतर तालुक्यातील मांडणा गावात साड्यांची होळी करण्याचा प्रकार घडला. परंतु हे विरोधकांचे षडयंत्र आहे, असे म्हणत सत्तारांकडून साड्या वाटपाची मोहित आणखी जोरात राबवण्यात आली. दरम्यान, आज पुन्हा उंडणगाव येथे सत्तारांनी वाटप केलेल्या साड्यांची होळी करण्यात आली. त्यामुळे मध्यंतरी थांबलेला हा प्रकार पुन्हा सुरू झाल्याने वातावरण तापले आहे.
विधानसभा निवडणुक तोंडावर असताना मतदारसंघात अब्दुल सत्तारांना होणारा वाढता विरोध त्यांच्यासाठी डोकेदुखी ठरू शकतो. येत्या एक-दोन दिवसात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होऊन निवडणूक कार्यक्रम जाहीर होणार आहे. त्याआधी मतदारसंघातील प्रत्येक लाडक्या बहीणीला साड्यांची ओवाळणी पोहचवण्याचा मंत्री अब्दुल सत्तार यांचा प्रयत्न आहे. काही गावातील विरोध आणि सांड्याच्या होळी प्रकारामुळे सत्तारांची ही मोहिम थांबणार का? हा खरा प्रश्न आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.