

Nagpur News : मराठवाड्यातील राजकारणातील शिवसेनेतील दोन नेते अब्दुल सत्तार आणि अर्जुन खोतकर यांची नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात चांगलीच चर्चा होत आहे. विधीमंडळ परिसरात प्रवेश केल्यापासून ते कामकाज संपेपर्यंत खोतकर आणि अब्दुल सत्तार (Abdul Sattar) हे दोघे एकमेकांचा हातात हात घेऊनच वावरले. मेरा दोस्त, मेरा शेर म्हणत सत्तार वारंवार दोघांच्या मैत्रीचे गोडवे गातांना दिसले. या दोघांमधील हा 'याराना' तसा बराच 'पुराना' आहे.
नागपूरचे हिवाळी अधिवेशन सध्या सभागृहातील कामकाजापेक्षा मंत्री, आमदारांच्या स्टाईल, कपडे, जॅकेट, गाॅगलची चर्चाच अधिक होताना दिसत आहे. अजित पवारांचे काळे ब्लेझर,धनंजय मुंडेंचा गाॅगल, बांगर-मुटकुळेंचे हम साथ साथ है दाखवणारे फोटो शूट अन् खोतकर-सत्तारांचा 'याराना' वावरची सध्या चांगलीच चर्चा होत आहे. आठवडाभराच्या अधिवेशनावरून सत्ताधाऱ्यांवर टीका होत असली तरी आज दुसऱ्या दिवसाचे कामकाज सुरू झाले आहे.
अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी शिवसेनेचे आमदार अब्दुल सत्तार आणि अर्जुन खोतकर (Arjun Khotkar) यांच्या एकत्रित एन्ट्रीने सगळ्यांचे लक्ष वेधले. कॅमेऱ्यांची नजर आपल्यावर आहे हे लक्षात आल्यानंतर सत्तारांनी खोतकर यांचा हात हातात घेत विशेष पोझ दिली. बरं हे फक्त एन्ट्री पुरतं मर्यादित नव्हत तर अगदी सभागृहातही दोघे हातात हात घालूनच पोहचले. यातून सत्तार-खोतकर यांना नेमका कोणता संदेश द्यायचा होता? यावर आता खल सुरू आहे.
अब्दुल सत्तार काँग्रेसमध्ये असतानापासून खोतकर आणि त्यांची मैत्री आहे. जालना लोकसभेचे माजी खासदार भाजप नेते रावसाहेब दानवे यांच्याकडून जेव्हा केव्हा सत्तारांना त्रास झाला, तेव्हा तेव्हा त्यांनी अर्जुनास्त्राचा वापर करत दानवेंना शह देण्याचा प्रयत्न केला. सत्तार यांचा सिल्लोड-सोयगाव विधानसभा मतदारसंघ हा जालना लोकसभा मतदारसंघात येतो. त्यामुळे दानवे-सत्तार वेगवेगळ्या पक्षात असले तरी त्यांच्यातील पडद्यामागच्या मैत्रीची चर्चा अजूनही केली जाते.
जालना लोकसभा मतदारसंघातील पराभवानंतर दानवे-सत्तार यांचे बिनसले आहे. नगरपालिका निवडणुकीत मग सत्तारांनी पुन्हा दानवे यांच्याविरोधात अर्जुनास्त्र बाहेर काढत त्यांना सिल्लोडमध्ये प्रचाराला आणले. मग दोघांनी जाहीर सभांमधून दानवे यांच्यावर हल्लाबोल केला. 2019 मध्ये लोकसभा निवडणुकीपुर्वी अब्दुल सत्तार यांनी रावसाहेब दानवे यांच्याविरोधात अर्जुन खोतकर यांनी लोकसभा लढवावी, अशी मागणी करत त्यांना काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी मिळवून देण्याचे प्रयत्न केले होते.
शिवसेनेचे नेते अर्जुन खोतकर हे सत्तारांच्या जाळ्यात अडकलेच होते, पण राज्यात महायुती असल्यामुळे रावसाहेब दानवे यांनी शेवटच्या क्षणी देवाभाऊंचा धावा केला आणि उद्धव ठाकरे यांना सांगून अर्जुन खोतकरांना शस्त्र म्यान करायला लावले. खोतकरांनी माघार घेतल्यामुळे सत्तार यांचा डाव फसला पण त्यांची मैत्री मात्र कायम राहिली. पुढे अब्दुल सत्तार यांनीही धनुष्यबाण हाती घेतला, पक्षात झालेल्या बंडात सहभागी होत एकनाथ शिंदेंची साथ दिली. आता सत्तार आणि खोतकर हे एकाच पक्षात आहेत.
शिवसेनेचे आमदार अर्जुन खोतकर यांनी सिल्लोड नगरपालिकेत सत्तार यांच्या मुलासाठी प्रचार केला. याची परतफेड सत्तार जालना महापालिकेच्या निवडणुकीत अर्जुन खोतकरांच्या मदतीला धावून जात करण्याची शक्यता आहे. जालन्यामध्ये अर्जुन खोतकर यांच्याविरोधात भाजपचे सगळे नेते एकवटले आहेत. कैलास गोरंट्याल यांना भाजपमध्ये प्रवेश देत रावसाहेब दानवे यांनी त्यांची कोंडी केली आहे.
शिवाय बबनराव लोणीकर यांच्याशीही त्यांनी जुळवून घेतले आहे. अशावेळी एकट्या पडलेल्या आपल्या मित्रासाठी सत्तार धावून जाणार असल्याचे बोलले जाते. नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात हातात हात घालून फिरणारे सत्तार-खोतकर आपल्या राजकीय विरोधकांना एकप्रकारे इशाराच देत आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.