माजी मंत्री अब्दुल सत्तार यांनी आपल्या मुलाला नगराध्यक्ष करण्यासाठी महायुतीतून बाहेर पडत स्वतंत्र लढ्याची घोषणा केली आहे.
या निर्णयामुळे स्थानिक राजकारणात तणाव वाढला असून, युतीतील इतर पक्षांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे.
सत्तारांच्या या पावलामुळे मराठवाड्यातील राजकीय समीकरणांमध्ये मोठे बदल होण्याची शक्यता आहे.
Local Body Election 2025 : सिल्लोड- सोयगाव विधानसभा मतदारसंघातून अवघ्या 1420 मतांनी निवडून आलेले शिवसेनेचे आमदार अब्दुल सत्तार यांनी उद्गीनेतून आपण पुढील विधानसभा निवडणूक लढवणार नाही, असे जाहीर केले होते. मतदार संघात अनेक विकास कामे करूनही लोकांनी जातीला महत्त्व दिले, आपल्याला या राजकारणाचा वीट आल्याची नाराजी अब्दुल सत्तार यांनी व्यक्त केली होती. माझ्या घरातून कोणीही निवडणूक लढवणार नाही, मुलालाही मी तुझी इच्छा असेल तर तू बघ, असे सांगितले होते, अशी कठोर भूमिका सत्तारांनी घेतली होती.
प्रत्यक्षात मात्र गेल्या वर्षभरापासून मतदारसंघात झालेली पडझड, गमावलेला जनाधार पुन्हा मिळवण्यासाठी सत्तार धडपडत आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक ही सत्तार यांच्या वर्चस्वाची परीक्षा ठरणार आहे. लाखोंच्या मताधिक्याचा दावा करणाऱ्या अब्दुल सत्तार यांना 2024 च्या विधानसभा निवडणुकीत मतदारांनी चांगलाच झटका दिला. 1420 मतांनी निवडून आलेल्या सत्तार यांच्या विरोधात विरोधी पक्ष कोर्टातही गेला. विरोधक आक्रमक झालेले असताना शिवसेनेचे (Shivsena)सत्तार यांनी विधानसभा मतदारसंघ पुन्हा पिंजून काढत नव्याने मजबूत बांधणी साठी प्रयत्न सुरू केले आहेत.
अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांच्या 25 ते 30 वर्षाच्या राजकीय कारकीर्दीत सिल्लोड नगर परिषदेची सत्ता अत्यंत महत्त्वाची ठरली. या जोरावरच सत्तार यांनी राज्याच्या राजकारणात आपल्याला हवे ते पदरात पाडून घेतले. सरकार महाविकास आघाडीचे असो की महायुतीचे? सत्तार यांचे मंत्रिपद फिक्स असायचे. कृषि सारखे महत्त्वाचे खाते मंत्री म्हणून भूषवण्याचा मान सत्तार यांना मिळाला. मात्र चांगल्या कामापेक्षा गैरव्यवहार आणि भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे सत्तार यांची पत खालावली.
महायुतीच्या मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यानंतर नाराज झालेल्या सत्तार यांनी पक्ष, संघटनेपासून लांब राहत फक्त मतदार संघावरच लक्ष केंद्रित केले. मराठवाड्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दौरा असेल तेव्हाच सत्तार हजर राहायचे. जिल्ह्यातील इतर नेत्यांना त्यांनी कधी किंमत दिलीच नाही. आता स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी अब्दुल सत्तार यांनी सिल्लोड सोयगाव मतदार संघात स्वबळाची घोषणा केली.
मुलगा समीर सत्तार याला नगराध्यक्ष करण्यासाठी अब्दुल सत्तार यांनी युती नको, अशी भूमिका घेत स्वतंत्र तयारी सुरू केली. मित्रपक्षाकडूनच दगाफटका होऊ शकतो, नगरपरिषदेच्या एकाही सत्तेत कोणी वाटेकरी नको, या विचारातूनच सत्तार यांनी स्वबळाचे दंड थोटपटले आहेत. पुढील विधानसभा लढणार नाही असं जाहीर करणारे अब्दुल सत्तार मुलाला सिल्लोड नगर परिषदेचा अध्यक्ष करत पुढच्या विधानसभा निवडणुकीत त्यालाच मैदानात उतरवून स्वतः निवृत्त होत आपला शब्द खरा ठरवतात का? याकडे सगळ्यांचे लक्ष असणार आहे.
महाराष्ट्रात सध्या विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांवर मतचोरी आणि मतदार यादीमधील घोळावरून गंभीर आरोप केले जात आहेत. अब्दुल सत्तार यांच्या सिल्लोडमध्ये असाच आरोप महायुतीतील मित्रपक्ष असलेल्या भाजपने केला आहे. याशिवाय किरीट सोमय्या यांनी बोगस मतदार आणि बांगलादेशी घुसखोरांना केवळ आधार कार्ड बघून रहिवाशी प्रमाणपत्र दिल्याचा आरोप करत सिल्लोडमध्ये चार वेळा दौरे केले. कारवाईसाठी मुख्यमंत्र्यांना पत्रही लिहले.
अब्दुल सत्तार हे सध्या भाजपच्या निशाणावर आहेत. असे असले तरी सिल्लोड- सोयगाव मतदार संघावर आपली पकड मजबूत राहावी यासाठी नगर परिषदेच्या माध्यमातून सत्तारांनी पुन्हा डाव टाकला आहे. राजकारणातील घराणेशाहीची परंपरा पुढे चालवत पत्नी नंतर आता मुलाला नगराध्यक्ष करत सिल्लोडमध्ये आपली एकहाती सत्ता कायम ठेवण्याचा त्यांचा प्रयत्न यशस्वी होतो का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
1.अब्दुल सत्तार यांनी युती का तोडली?
त्यांच्या मुलाला नगराध्यक्ष बनवण्यासाठी त्यांनी महायुतीपासून वेगळे होऊन स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला.
2. हा निर्णय कोणत्या जिल्ह्यात घेतला गेला?
हा निर्णय छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड स्थानिक स्वराज्य निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर घेतला गेला.
3. या निर्णयामुळे महायुतीवर काय परिणाम होईल?
महायुतीतील विश्वास आणि एकजूट यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
4. अब्दुल सत्तार कोणत्या पक्षाशी संबंधित आहेत?
ते एकनाथ शिंदे गटाच्या शिवसेनेशी संबंधित मंत्री आहेत.
5. पुढे सत्तार यांची राजकीय रणनीती काय असू शकते?
ते स्थानिक स्तरावर सत्ता मजबूत करण्यासाठी आणि आपल्या मुलाला राजकारणात स्थिर करण्यासाठी स्वतंत्र शक्ती निर्माण करण्याचा प्रयत्न करू शकतात.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.