Sillod Assembly Constituency 2024 : शिंदेंचा सत्तारभाईंवर विश्वास ! पक्षाची उमेदवारी मिळाल्याने आता `प्रासंगिक करार` कायम

Abdul Sattar Party Candidature: शिवसेनेत पहिल्यांदा प्रवेश केला तेव्हा उद्धव, आदित्य ठाकरे यांना सत्तारांनी मतदारसंघात ताकद आणि जंगी स्वागत करत भुरळ घातली होती. हीच जादू नंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही चालली.
Eknath Shinde, Abdul Sattar
Eknath Shinde, Abdul SattarSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Assembly Constituency 2024 : शिवसेनेच्या पहिल्या यादीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही `नो रिप्लेस` चे धोरण स्वीकारत मराठवाड्यातील दहा पैकी आठ विद्यमान आमदारांना उमेदवारी दिली. मंत्री अब्दुल सत्तार यांना पक्षाकडून दुसऱ्यांदा उमेदवारी देण्यात आली आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीआधी अब्दुल सत्तार यांनी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत हाती धनुष्यबाण घेतले होते. 2024 मध्ये तेच धनुष्यबाण एकनाथ शिंदे यांच्याकडून त्यांना मिळाले.

पाच वर्षातील दोन शिवसेनेतील सत्तार यांचा प्रवास तसा रंजक राहीला. (Abdul Sattar) महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये राज्यमंत्री आणि शिवसेनेत फूट पडल्यानंतर स्थापन झालेल्या युती सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री पदी सत्तारांना बढती मिळाली. माझ्या नावात `सत्ता` असल्यामुळे मी ज्या पक्षात जातो तिथे सत्तेत असतो, असे सत्तार नेहमी सांगतात. नेत्याला प्रभावित करण्याची कला अब्दुल सत्तार यांना चांगली अवगत आहे.

शिवसेनेत पहिल्यांदा प्रवेश केला तेव्हा उद्धव, आदित्य ठाकरे यांना सत्तारांनी मतदारसंघात ताकद आणि जंगी स्वागत करत भुरळ घातली होती. हीच जादू नंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही चालली.

दोन वर्षात अब्दुल सत्तार यांनी मतदारसंघासाठी किती निधी, योजना, प्रकल्प आणले हे ते आपल्या प्रचार सभांमधून सांगतीलच. पण हवे ते पदरात पाडून घेण्यासाठी दबाव तंत्राचा वापर सत्तार यांच्या इतक्या खुबीने कोणत्याच नेत्याने केला नसावा.

Eknath Shinde, Abdul Sattar
Abdul Sattar News : अब्दुल सत्तार भाजपचा खेळ बिघडवणार ? बागडे नानांच्या फुलंब्रीत बंडाची तयारी

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्री पद हे त्याचे उत्तम उदाहरण म्हणून ओळखले जाते. `मी काही शिवसैनिक नाही, माझा एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याशी प्रासंगिक करार झाला आहे`, असे विधान सत्तार यांनी जाहीरपणे अनेकदा केले आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आपल्यावर जोपर्यंत विश्वास आहे, तोपर्यंत मी त्यांच्यासोबत आहे, माझ्यावरचा विश्वास संपले तेव्हा मी योग्य निर्णय घेईल`, याची आठवण सत्तार वारंवार करून देत राहिले. त्यामुळे सत्तारांना हवे ते देण्याचा मुख्यमंत्र्यांचा प्रयत्न राहिला आहे.

जिल्ह्यातील इतर नेत्यांच्या बाबतीत वाढपी आपला असूनही बुंदी मात्र सत्तारांच्या पात्रातच अधिक पडत असल्यासारखी परिस्थिती होती. पण परिस्थितीचा अंदाज घेत जुळवून घ्यायचे आणि इप्सित साध्य झाले की आपली चाल खेळायची, याता सत्तार यांचा नेहमीच हातखंडा राहिला आहे. सिल्लोड-सोयगाव मतदारसंघातून अब्दुल सत्तार सहाव्यांदा निवडणूक लढवत आहेत. पैकी 1999 मध्ये सत्तार पहिल्यांदा अपक्ष लढले होते. तेव्हा भाजपच्या किसन काळे यांनी त्यांना पराभूत केले होते.

Eknath Shinde, Abdul Sattar
Eknath Shinde : शिवसेनेच्या ‘एवढ्या’ जागांवर उमेदवार देऊन भाजपनं CM शिंदेंना सूचक इशारा दिला?

पण पहिल्याच निवडणुकीत सत्तार यांनी 27760 इतकी मते मिळवत आपली ताकद दाखवून दिली होती. 2004 मध्ये ते काँग्रेसकडून निवडणूक लढले. पण पुन्हा त्यांचा थोडक्यात पराभव झाला.

भाजपच्या सांडू पाटील लोखंडे हे फक्त 301 मतांनी निवडून आले होते. त्यानंतर मात्र 2009 ते 2019 मध्ये अब्दुल सत्तार यांनी सलग तीन वेळा विजय मिळवला. पैकी दोन वेळा काँग्रेसकडून तर एकदा शिवसेनेकडून. पक्ष फुटीनंतर अब्दुल सत्तार दुसऱ्यांदा शिवसेनेकडून लढणार आहेत.

लोकसभा निवडणुकीनंतर सत्तार शिवसेनेसोबतचा प्रासंगिक करार मोडणार आणि दुसऱ्या पक्षात जाणार, अशा चर्चांना उधाण आले होते. पण सत्तार यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब झाले आणि त्यांनी ती स्वीकारल्यानंतर आता हा प्रासंगिक करार पुढे सुरूच राहणार हे स्पष्ट झाले आहे. लोकसभेच्या जालना मतदारसंघात महायुती असताना भाजपच्या रावसाहेब दानवे यांचा पराभव झाल्यानंतर सत्तार आणि दानवे या दोन मोठ्या नेत्यांमध्ये कटुता निर्माण झाली आहे.

Eknath Shinde, Abdul Sattar
Shivsena First Candidate list : शिवसेनेची 45 जणांची पहिली यादी घोषित; एकनाथ शिंदेंचा मतदारसंघही झाला जाहीर

यातून सत्तार यांना दगाफटका होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सत्तार यांच्याविरोधात दोन वेळा निवडणुकीत पराभूत झालेले भाजपचे सुरेश बनकर यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची मशाल हाती घेतली आहे.

त्यांच्या या पक्ष प्रवेशामागे रावसाहेब दानवे यांचा हात असल्याचे बोलले जाते. मतदारसंघात सत्तार विरोधात रोष असल्याचे चित्र निर्माण झाले होते. आता प्रत्यक्ष विधानसभेची लढाई सुरू झाली आहे, तेव्हा सत्तार विरोधकांच्या हल्ल्याला कसे तोंड देणार? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com