

Jalna Shivsena-BJP News : जालना लोकसभा निवडणुकीतील पराभवापासून भाजप नेते रावसाहेब दानवे आणि सिल्लोडचे शिवसेना आमदार अब्दुल सत्तार यांच्यात बिनसले. विधानसभा निवडणुकीत सत्तारांचा करेक्ट कार्यक्रम थोडक्यात हुकला. पण नगरपालिकेत दणक्यात कमबॅक करत सत्तार यांनी पुन्हा वर्चस्व सिद्ध केले. या वर्ष-दीड वर्षात रावसाहेब दानवे आणि अब्दुल सत्तार हे कधी एकत्र आले नाही.
सिल्लोड नगरपालिका अब्दुल सत्तार यांनी एकहाती जिंकली, तर भोकरदनमध्ये भाजपच्या नगरसेवकांची संख्या वाढली असली तरी त्यांना सत्ता मिळवता आली नाही. यावरून अब्दुल सत्तार यांनी रावसाहेब दानवे यांच्यावर जे गावातली नगरपालिका निवडून आणू शकत नाही, ते राज्याचे अन् देशाचे नेते कसे होऊ शकतात? असा टोला लगावत डिवचले होते. त्याला रावसाहेब दानवे यांनी सिल्लोडमधील नगरपालिकेतील विजय हा अब्दुल सत्तार यांचा नाही तर तेथील सामाजिक समीकरणांचा असल्याचे प्रत्युत्तर दिले होते.
आतापर्यंतच्या राजकारणात एकमेकांवर आरोप करणारे, टीका करणारे प्रसंगी एकमेकांचं राजकारणच संपवण्याच्या शपथा घेतलेले अब्दुल सत्तार आणि रावसाहेब दानवे हे दोन्ही नेते शनिवार (ता.27) करमाड येथे एका कार्यकर्त्याच्या मुलाच्या साखरपुड्यासाठी एकत्र आले होते. एकमेकांच्या शेजारी बसत या दोघांमध्ये गप्पा-गोष्टी आणि हास्यविनोदही झाला. चॅनल आणि माध्यमांसमोर येऊन रोज एकमेकांची पिसं काढणारे सत्तार-दानवे यांच्यात पुन्हा दिलजमाई झाली की काय? अशी चर्चा या निमित्ताने सुरू होती.
जालना महापालिका निवडणुकीत युतीसाठी बैठकांवर बैठका सुरू आहेत. स्वतः रावसाहे दानवे हे या बैठकांना हजर राहत आहेत. अशा घाईतही त्यांनी करमाडच्या कार्यक्रमाला हजेरी लावली. तिथेच अब्दुल सत्तार हे ही आले होते. विशेष म्हणजे आयोजकांनी या दोघांना शेजारी बसण्याची व्यवस्था केली होती. रोजचे आरोप-प्रत्यारोप विसरून सत्तार-दानवे यांनीही आढेवेढे न घेता शेजारी बसून गप्पा मारल्या. अर्थात दोघांमध्ये पुर्वीसारख्या गप्पा रंगल्या नव्हत्या. पण टाळता येत नाही म्हणून ते शेजारी बसल्याचे काहीसे चित्र होते.
राजकारणात कोणी कोणाचा कायम शत्रू किंवा मित्र नसतो हे नेहमी बोलले जाते. सत्तार-दानवे यांच्या बाबतीत हेच म्हणावे लागेल. रावसाहेब दानवे यांचा पराभव होत नाही तोपर्यंत टोपी घालणार नाही, अशी शपथ सत्तार यांनी घेतली होती. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत दानवे यांचा पराभव झाला. यानंतर दानवे यांनीही अब्दुल सत्तार यांच्याकडून निवडणुकीत केली जाणारी बोगसगिरी, पाहुणे-रावळे, नातेवाईकांना सिल्लोड शहरात आणून त्यांची नावे मतदार यादीत घुसवल्याचा गंभीर आरोप करत बोगसगिरीवर ते निवडून आल्याचा हल्ला चढवला होता.
सिल्लोड-सोयगाव विधानसभा निवडणुकीतही आमचे सुरेश बनकर हे निवडून आले होते, पण निवडणूक अधिकाऱ्यांना हाताशी धरून सत्तार यांनी स्वतःचा विजय घोषित करायला लावला, असा आरोप केला. सत्तार यांनी पुन्हा मी तुमचा भोकरदनमध्ये आणि वैजापूरमध्ये करेक्ट कार्यक्रम केला. तुम्हाला गावातली नगरपालिका आणता आली नाही, तुम्ही कसले राष्ट्रीय नेते. ज्यांना गाव सांभाळता येत नाही, ते राज्याचे, देशाचे नेत होऊ शकत नाही, असा टोला लगावत रावसाहेब दानवे यांच्या जखमेवर मीठ चोळले होते.
एकीकडे हे सगळं सुरू असताना सत्तार-दानवे एकत्र आले, एकमेकांच्या शेजारी बसले आणि गप्पाही मारल्या. त्यामुळे दोघांचेही समर्थक बुचकळ्यात पडले आहेत. नेमकं हे एकमेकांचे राजकीय शत्रू, विरोधक की मित्र? असा प्रश्न कार्यकर्त्यांना पडल्याशिवाय राहीला नाही. करमाड येथील हारळ पाटील यांच्या मुलाचा साखरपुडा होता. या कार्यक्रमात अब्दुल सत्तार-रावसाहबे दानवे एकत्र आले होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.