Latur Political News : शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देऊन सत्तेतल्या उपमुख्यमंत्री अजित पवार गटात गेलेले माजी नगराध्यक्ष डॉ. अफसर शेख यांची आता थेट अजित पवार गट लातूर जिल्हा कार्याध्यक्षपदी (ग्रामीण) नियु्क्ती करण्यात आली आहे. मात्र असे असले तरी येणारी निवडणूक त्यांना सोपी असणार नाही, असे चित्र आहे. शरद पवार गटाशी फारकत घेतल्याने त्यांची अर्धी ताकद कमी झाल्याची चर्चा आहे. तर दुसरीकडे महायुतीतील आमदार अभिमन्यू पवार यांच्याशी त्यांचा सुप्त राजकीय संघर्ष आहे आणि ही स्पर्धा आता अधिकच वाढत जाणार आहे. (Latest Marathi News)
राज्यात अजित पवार गट महायुतीत असले तरी भाजपचे आमदार त्यांना युती धर्मातील सहकारी मानायला तयार नाहीत. याउलट अभिमन्यू पवार हे शेख यांच्यावर राजकीय कुरघोडी करण्याची एकही संधी सोडत नाहीत. तर दुसरीकडे येणाऱ्या काळात अफसर शेख यांना त्यांचे एकेकाळचे आपलेच सहकऱ्यांसोबतच अभिमन्यू पवार असा दुहेरी सामना करायचा आहे. त्यामुळे आता ते जिल्हाध्यक्षपदाला कसे न्याय देणार? हे पाहावे उत्सुकतेचं आहे. मात्र, या राजकीय संघर्षात अफसर यांची काही प्रमाणात पीछेहाट झाल्याचे बोलले जात आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत अफसर शेख यांचे वडील दिवंगत एन. बी. शेख यांचे निकटचे संबंध होते. लातूरमध्ये राष्ट्रवादीची ताकद वाढवण्यात एन. बी. शेख यांचा मोलाचा वाटा होता. मध्यंतरी शरद पवारांचे नातेवाईक डॉ. पद्मसिंह पाटील आणि त्यांचे पुत्र आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी पवारांची साथ सोडत भाजपची कास धरली. मात्र पक्षाच्या वाईट काळातही एन.बी. शेख यांनी पवारांना साथ दिली. मात्र आता एन.बी. शेख यांचे पुत्र अफसर शेख पक्ष आणि पक्षश्रेष्ठींवरील निष्ठेऐवजी सत्तेच्या राजकारणाची निष्ठा वाहताना दिसत आहेत.
अफसर शेख यांनी जिकडे सत्ता तिकडे मी, असाच नारा सूचित केला आहे. यामुळे आता अफसर यांच्यावर शरद पवार समर्थक स्थानिक नेते नाराज झाले आहे. ज्यांच्या पाठिंब्यावर ऐन मोदी लाटेत त्यांनी 12 नगरसेवक निवडून आणले आता तेच सोबत नसल्याने त्यांची पंचाईत झाली आहे. शिवाय अजित पवार गट महायुतीत असून स्थानिक भाजप त्यांच्याविरोधातच उभे असल्याची परिस्थिती आहे.
भाजपचे स्थानिक आमदार अभिमन्यू पवार हे मुस्लिम समाजाचे सर्वात जास्त मते आपल्या पारड्यात पाडून घेणारे म्हणून त्यांची ओळख आहे. स्थानिक समीकरण घडवून त्यांनी बहुतांशी मुस्लिम समाजाला आपल्याकडे वळवले आहे. यामुळे अफसर शेख यांचा कायम मतदार म्हणवणारा मुस्लिम मतांमध्ये मोठ्या फरकाने विभागणी झाली आहे. यामुळे हक्काचे मतदार दुरावले असतानाच, अभिमन्यू पवार आणि लातूरच्या देशमुखांशी राजकीय संघर्ष त्यांना महागात पडू शकतो. यामुळे त्यांचे जिल्हाध्यक्षपद फलदायी ठरण्याची शक्यता, तशी फारच कमी आहे.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.