Buldhana News : बुलडाण्यात आज (ता. ३ सप्टेंबर) ‘शासन आपल्या दारी’ हा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अन्य काही मंत्री उपस्थित होते. मात्र, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची अनुपस्थिती प्रकर्षाने जाणवत होती. कार्यक्रमपत्रिकेत नाव असूनही देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे आजच्या कार्यक्रमाला गैरहजर होते. जालन्यातील लाठीहल्ला प्रकरणामुळे या दोघांनी कार्यक्रमाला येणे टाळले असावे, अशी चर्चा कार्यक्रम स्थळी रंगली होती. (Absence of both Deputy CM at the 'Shasan Aplya Dari' program in Buldana)
आमदार संजय गायकवाड यांचा मतदारसंघ असलेल्या बुलडाण्यात आज ‘शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. स्थानिक पातळीवर गायकवाड यांनी कार्यक्रमाची जय्यत तयारी केली होती. मात्र, जालन्यात झालेल्या लाठीहल्ल्यामुळे मराठवाड्यात तणावाची परिस्थिती आहे, त्यामुळे हा कार्यक्रम होणार की नाही, अशी परिस्थिती होती. आमदार संजय गायकवाड यांनी कार्यक्रमात बोलताना मोठ्या कठीण परिस्थितीत आमच्या प्रशासनाने हा कार्यक्रम आयोजित केला आहे, अशी कबुली दिली आहे.
कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार हे येणार होते. मात्र, जालन्यात मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेल्या उपोषणकर्ते व त्यांना पाठिंबा देणाऱ्या कार्यकर्त्यांवर पोलिसांनी लाठीहल्ला केला. त्यामुळे मराठवाड्यात जनक्षोभ उसळला आहे. लाठीहल्ल्याला गृहमंत्री या नात्याने देवेंद्र फडणवीस यांना जबाबदार धरण्यात येत आहे. आंदोलकांकडूनही वरून फोन आल्यामुळेच आमच्यावर लाठीहल्ला झाला असा आरोप करत आहेत, त्यामुळे सध्या फडणवीस यांच्यावर निशाणा साधला जात आहे.
मराठवाड्यातील सद्यस्थिती लक्षात घेऊन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुलडाण्यात येणे टाळले असावे, असे सांगितले जात आहे. मात्र, उपमुख्यमंत्री अजित पवार न येण्याचे कारण मात्र उमगू शकलेले नाही. मराठा बांधवांवर झालेल्या लाठीहल्ल्यामुळे समाज माध्यमांतून सरकारवर टीकेची झोड उठवली जात आहे. त्यातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे दोघे मराठा नेते सरकारमध्ये असूनही काय उपयोग असा प्रश्न मराठा समाजाकडून विचारला जात आहे. बहुधा वातावरण आणखी चिघळू नये, यासाठी या दोघांनीही बुलडाण्याच्या ‘शासन आपल्या दारी’पासून दूर राहाणे पसंत केले असावे, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.