

Beed NCP News : महाराष्ट्राच्या राजकारणातील 'दादामाणूस' एका विमान अपघातात अकाली गेला. या दुर्दैवी घटनेवर संपूर्ण महाराष्ट्र शोक व्यक्त करतो आहे. राजकारणात प्रत्यक्षात ज्यांनी अजित पवार यांच्यासोबत वर्षानुवर्ष काम केले त्या पक्षातील आणि विरोधकांच्याही मनाला या घटनेने चटका बसला. बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांना अजित पवारांचा गेल्या अनेक वर्षापासून सहवास लाभला. 'ये बजरंगा बस'हा दादांचा आवाज आजही कानात घुमतो, अशा शब्दात बजरंग सोनवणे यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली.
'अजित दादा पवार यांच्या निधनाची बातमी मनाला अत्यंत चटका लावणारी आहे. ही केवळ एका नेत्याची एक्झिट नाही, तर माझ्यासाठी ही वैयक्तिक हानी आहे. भेटायला गेलो की दादांचा आपुलकीचा आवाज आजही कानात घुमतो.
'ये बजरंगा, बस'… मराठवाड्यातील शेतकऱ्यांना उच्च दर देणारा कारखाना म्हणून येडेश्वरी साखर कारखान्याचे ते अभिमानाने जाहीर कौतुक करत. शेतकरी, कष्टकरी आणि ग्रामीण अर्थव्यवस्था यांच्यासाठी झटणारा नेता म्हणून अजितदादा कायम ठामपणे उभे राहिले.
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांनी घेतलेले निर्णय, त्यांची प्रशासकीय पकड, विकासाभिमुख दृष्टिकोन आणि कठोर पण स्पष्ट नेतृत्व शैली राज्याने अनुभवली. जलसंपदा, अर्थकारण, सहकार आणि पायाभूत सुविधांच्या क्षेत्रात त्यांनी महाराष्ट्राला दिशा देणारे अनेक धाडसी निर्णय घेतले. विरोधकांनाही मान्य करावे लागेल अशी कामाची शिस्त आणि निर्णयक्षमता हे दादांचे मोठे वैशिष्ट्य होते.
सामान्य माणसाला उभं करण्याची त्यांची तळमळ, ग्रामीण भागातील माझ्यासारख्या उद्योजकांना सातत्याने प्रोत्साहन देणारा नेता म्हणून दादा कायम स्मरणात राहतील. 2024 मध्ये पक्षबदलाचा निर्णय घेत असताना मुंबईतील त्यांच्या शासकीय निवासस्थानी तब्बल 6 तास त्यांनी माझ्यासोबत सखोल चर्चा केली होती. त्या वेळी मी केवळ एक माजी जिल्हा परिषद सदस्य/उपाध्यक्ष होतो तरीही त्यांनी दिलेले महत्त्व, दाखवलेला विश्वास माझ्यासाठी आयुष्यभराचा ठेवा आहे.
कठोर शब्दांत व्यक्त होणारे दादा असले, तरी कार्यकर्त्यांवर मनापासून प्रेम करणारेही तेच दादा होते. कार्यकर्त्यांची अचूक पारख करणारे, त्यांना बळ देणारे दादा होते. त्यांच्या जाण्याने माझी वैयक्तिक हानी झाली आहेच, पण त्याहून अधिक संपूर्ण महाराष्ट्राचे अतोनात नुकसान झाले आहे, अशा शब्दात खासदार बजरंग सोनवणे यांनी आपल्या या लाडक्या नेत्याला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.