Beed News : ‘श्रद्धेय साहेब, काल, आज आणि भविष्यातही तुमच्याबद्दल श्रद्धा आणि आदर कायम राहील. कालच्या सभेत आपण माझ्या तोंडी घातलेल्या वाक्याबाबत मी स्वप्नातही तसा विचार करू शकत नाही, अशी भावनिक पोस्ट राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) माजी आमदार अमरसिंह पंडित यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांना उद्देशून लिहिली आहे. या मजकुरासोबत पंडित यांनी पवारांसोबतचा पाच वर्षांपूर्वीचा परदेशातील शेती अभ्यास दौऱ्यातील फोटोही जोडला आहे. (After Sharad Pawar's criticism, AmarSinh Pandit's emotional post)
बीड येथील स्वाभिमानी सभेत शरद पवार यांनी अमरसिंह पंडित यांच्यावर हल्लाबोल केला होता. ‘माझे वय झाल्याने राजकीय भविष्यासाठी भूमिका बदलली, असे अमरसिंह पंडित कोणाजवळ तरी म्हटले आहेत,’ असे म्हणत ‘माझे वय काढता; पण तुम्ही माझे काय बघितले', अशी टीकाही पंडित यांच्यावर केली होती.
बीडच्या सभेत शरद पवार हे राष्ट्रवादी सोडून गेलेल्या इतर कोणत्याच नेत्यांबदल बोलले नाहीत. मात्र, पंडित यांचे नाव घेऊन का बोलले, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. दरम्यान, पवार आणि पंडित यांचे सुरुवातीपासून अत्यंत निकटचे संबंध आहेत. बीड जिल्हा दौऱ्यातील शरद पवार यांचा मुक्काम हमखास पंडित यांच्या शिवछत्र या निवासस्थानी असे. गेल्या वर्षी ज्येष्ठ नेते शिवाजीराव पंडित यांच्या अभीष्टचिंतन सोहळ्यालाही ते आले होते. शेती, दुष्काळ हा पवार व पंडित यांच्यातील समान धागा होता. पवारांच्या परदेशातील काही अभ्यास दौऱ्यात त्यांनी अमरसिंह पंडित यांना सोबत नेले होते. दरम्यान, पवार यांच्या वक्तव्याचे अमरसिंह पंडित यांनी अगदी संयमाने उत्तर दिले आहे.
अमरसिंह पंडित यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, आपल्या कानी कोणी काय घातले, हे मला माहीत नाही, त्याविषयी जाणून घेण्यात स्वारस्यही नाही. मात्र, हे अत्यंत क्लेषदायक आहे, एवढेच सांगतो. आम्हा भावंडांवर शिवाजीराव पंडित यांचे संस्कार आहेत, त्यामुळे केवळ तुमचे वय झाले; म्हणून नेतृत्व बदल केला, असे तोकडे विचार आमच्या मनी येणार नाहीत. याबद्दल सार्वजनिक ठिकाणी सोडा; परंतु वैयक्तिकसुद्धा कोणाला बोललेलो नाही.
पंडित पुढे लिहितात की, तुम्हाला शंभर वर्षे निरामय आयुष्य लाभो, हीच सदैव भवानी चरणी प्रार्थना आहे. तुमच्यासोबत अनेक वर्षे निष्ठेने काम करताना अनेक संधी आणि प्रलोभने मिळाली. मात्र, त्यावेळी कधीही डगमगलो नाही, तुमची साथ सोडली नाही. राजकारणाच्या पलिकडे जाऊन पवार परिवाराशी शिवछत्र परिवाराचा स्नेहबंध, तो भविष्यातही जपणार आहे.
तुम्ही आणि अजितदादा वेगळे व्हावेत, हेच मुळात पटत नाही... असो, राजकीय निर्णय घेताना वैयक्तिक लाभाचा विचार कधीच मनाला शिवला नाही. लाभापायी काही निर्णय घेणार नाही, याची खात्री तर तुम्हालाही असेल. बाकी माणुसकी वगैरे जपणारच; कारण तुमचेच राजकीय संस्कार आहेत, असेही अमरसिंह पंडित यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.