Pune : राष्ट्रीय लोकशाही आघाडीत (एनडीए) सामील झालेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसने आता पक्षसंघटना वाढीसाठी मैदानात उतरविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी उपमुख्यमंत्री पवार यांच्यासह राष्ट्रवादीचे नऊ मंत्री आणि खासदार प्रफुल्ल पटेल यांच्यावर विशेष जबाबदारी सोपविण्यात आली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील महत्वाच्या चार जिल्ह्यांची जबाबदारी अजित पवारांनी स्वतःच्या खांद्यावर घेतली आहे. (Special responsibility on nine ministers including Ajit Pawar for growth of NCP)
राष्ट्रवादी काँग्रेसमधून फुटून अजित पवार गट युती सरकारमध्ये सामील झाला आहे. त्यात अजित पवारांना उपमुख्यमंत्रिपद, तर आठ आमदारांना महत्वपूर्ण मंत्रालयाची जबाबदारी सोपविण्यात आलेली आहे. भाजपसोबत गेलेल्या अजित पवारांनी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनाही सोबत येण्यासाठी अनेकदा साकडे घातले आहे. मात्र, पवार हे भाजपसोबत जाण्यास तयार नाहीत. राष्ट्रवादीची उभारणी करण्यासाठी ते पुन्हा मैदानात उतरले आहेत. त्यामुळे अखेर अजित पवार गटानेही स्वतंत्रपणे पक्षवाढीसाठी प्रयत्न करण्याचे ठरविलेले दिसत आहे. त्यातून मंत्र्यांकडे राज्यातील जिल्ह्यांची जबाबदारी देण्यात आलेली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नऊ मंत्री आणि राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल यांच्याकडे राज्यातील ३६ जिल्ह्यांची पक्ष संघटना वाढीकरीता जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्याच्या राजकारणात महत्वपूर्ण ठरणाऱ्या पुणे, सातारा, सांगली व सोलापूर या जिल्ह्यांची जबाबदारी घेतली आहे. यात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा सांगली जिल्हाही आहे.
राष्ट्रवादीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल यांच्यावर भंडारा, गोंदिया, वर्धा, अमरावती व नागपूर हे विदर्भातील जिल्हे सोपविले आहेत. अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्यावर उत्तर महाराष्ट्रातील नाशिक आणि मुंबई शहर व मुंबई उपनगरांची जबाबदारी असेल. सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे अकोला, वाशीम, छत्रपती संभाजीनगर व बुलडाणा हे जिल्हे असतील.
वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर कोल्हापूर, सिंधुदुर्ग आणि नगर जिल्ह्यांत पक्षाचा विस्तार करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. तर कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बीड, परभणी, नांदेड, व जालना हे मराठवाड्यातील जिल्हे असतील. क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांना हिंगोली, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यात पक्षवाढीसाठी काम करावे लागणार आहे.
महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांच्याकडे कोकणातील रायगड, रत्नागिरी, ठाणे, व पालघर या ठिकाणी पक्ष वाढवावा लागेल, तर मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांच्याकडे खानदेशातील जळगाव, धुळे, व नंदुरबार जिल्ह्यांची जबाबदारी असणार आहे. राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांना गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ या जिल्ह्यात पक्ष वाढवून दाखवावा लागणार आहे.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.