

Chhatrapati Sambhajinagar Aimim News : महानगरपालिका निवडणुकीत 33 नगरसेवक निवडून आणत एमआयएम पक्ष दुसऱ्या क्रमांकाचा ठरला. आता निवडणुकीपूर्वी दिलेल्या आश्वासनांच्या पूर्ततेच्या दिशेने पाऊलं टाकण्यासाठी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी महत्वाचा निर्णय घेतला आहे. शहराला नशेखोरीच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी सर्व देशी दारूची दुकानं ही शहराबाहेर हटवण्याचा ठराव महापालिकेच्या पहिल्याच सर्वसाधारण सभेत आणणार असल्याचे इम्तियाज यांनी जाहीर केले.
निवडणुका संपल्या आहेत, निकाल जाहीर झालेला आहे. त्यामुळे प्रचारात एकमेकांवर केलेले आरोप, टीका, चिखलफेक विसरून आता शहराच्या विकासासाठी एकत्र या. महापालिकेच्या पहिल्या सर्वसाधारण सभेत जो ठराव एमआयएमचे नगरसेवक आणणार आहेत, त्याला भाजप, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी, वंचित बहुजन आघाडी, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सर्व 115 नगरसेवकांनी पाठिंबा द्यावा, असे आवाहन इम्तियाज जलील यांनी केले.
एमआयएमच्या नवनिर्वाचित नगरसेवकांचा एकमेकांचा परिचय आणि त्यांना महापालिकेतील कामकाजाची थोडक्यात माहिती व्हावी, या संदर्भात एकदिवसीय प्रशिक्षण पक्षाच्या वतीने देण्यात आले. यावेळी इम्तियाज जलील यांनी एमआयएम कोणत्या मुद्यांवर महापालिकेत जोर देणार आहे, याची माहिती माध्यमांना दिली. 33 पैकी 17 नगसेवक या महिला आहेत. त्यामुळे आमच्या पक्षावर महिलांना पुढे येऊ देत नाही, असा आरोप करणाऱ्यांना हे उत्तर आहे.
महापालिका निवडणुकीच्या आधी आम्ही शहरात काही मुद्दे घेऊन होर्डिंग्ज लावले होते. यात प्रामुख्याने नशेखोरी रोखण्यासाठी शहरातील दारुची दुकाने शहराबाहेर हलवणे, जितके दिवस पाणी, तितकीच पाणीपट्टी महापालिकेने आकारावी याचा समावेश होता. पाणी प्रश्न बऱ्यापैकी सुटला आहे, योजनेचे काम अंतिम टप्प्यात असल्याने शहरवासियांना मुबलक पाणी मिळणार आहे.
परंतु शहरातील दारूची दुकाने बाहेर हलवण्या संदर्भात आम्ही पहिल्याच जनरल बाॅडी मिटिंगमध्ये ठराव आणणार आहोत. दारु दुकाने हलवण्यात कायदेशीर अडचणी सांगितल्या जात होत्या. परंतु आम्ही या संदर्भात सखोल माहिती आणि चौकशी केल्यानंतर शहरवासियांचे प्रतिनिधित्व महापालिकेत करणाऱ्या 115 नगरसेवकांना सर्वसाधारण सभेत ठराव घेऊन हा निर्णय घेता येऊ शकतो.
माझी सत्ताधारी व विरोधातील सर्वच पक्षांना विनंती आहे, की त्यांनी या ठरावाला आपला पाठिंबा देऊन एक चांगला संदेश राज्यातच नाही तर देशात पोहचवावा, असे आवाहन इम्तियाज जलील यांनी केले. वेगवेगळे पक्ष, विचारसरणी असली तरी शहराच्या विकासासाठी सगळ्यांनी एकत्र येवून काम करावे. विकास हाच आपला अजेंडा असला पाहिजे, अशी अपेक्षा इम्तियाज यांनी यावेळी व्यक्त केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.