

Chhatrapati Sambhajinagar News : MIM पक्षाची अंतिम उमेदवार यादी जाहीर झाल्यानंतर प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांच्याविरोधात उद्रेक पहायला मिळाला. उमेदवारी कापलेल्या पक्षातील बहुतांश माजी नगरसेवकांनी इम्तियाज जलील यांच्यावर पैसे देऊन तिकीटं विकल्याचा, दलालांना उमेदवारी दिल्याचा आरोप करत त्यांचे फोटो पायदळी तुडवले. तर दुसरीकडे ज्या नव्या चेहऱ्यांना पक्षाकडून संधी मिळाली त्यांनी इम्तियाज जलील यांच्या घरासमोर जाऊन जल्लोष साजरा केला. इम्तियाज यांनीही घराबाहेर येत विरोधकांना दंड थोपटत आव्हान दिले.
एमआयएमचे सर्वेसर्वा असदुद्दीन ओवेसी यांनी छत्रपती संभाजीनगरसह राज्यातील उमेदवार ठरवण्याचे सर्वाधिकार प्रदेशाध्यक्ष या नात्याने इम्तियाज जलील यांना दिले होते. लोकसभा आणि त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर महापालिकेत मोठ्या ताकदीने नगरसेवक निवडून आणण्यासाठी इम्तियाज जलील यांनी काही धक्कादायक निर्णय घेतले. ज्यात सर्वाधिक माजी नगरसेवकांना वगळून नव्या, सुशिक्षित चेहऱ्यांना संधी देत त्यांनी पक्षातील पदाधिकाऱ्यांचा रोष मोठ्या प्रमाणात ओढावून घेतला.
गेल्या महापालिकेत निवडून आलेल्या 26 पैकी तब्बल 22 जणांना एमआयएमने नारळ देत घरी बसवल्याचे बोलले जाते. त्यांच्याऐवजी तरुणांना उमेदवारी देण्याचा इम्तियाज जलील यांचा प्रयत्न दिसून आला. सर्वात मोठा आणि धक्का देणारा निर्णय म्हणजे पक्ष स्थापनेपासून ज्या अब्दुल कदीर मौलाना यांच्याशी इम्तियाज जलील यांना राजकीय संघर्ष करावा लागला, त्या कदीर मौलाना यांच्या मुलालाच एमआयएमकडून उमेदवारी देण्यात आली. इम्तियाज जलील यांच्या या निर्णयाचे अनेकांना आश्चर्य वाटले.
काल मंगळवारी (ता.30) ज्यांना उमेदवारी मिळाली त्यांनी इम्तियाज जलील यांच्या मन्नत निवासस्थानाबोहर जोरदार शक्तीप्रदर्शन करत जल्लोष केला. त्या ओसामा अब्दुल कदीर व त्यांचे समर्थक आघाडीवर होते. ओसामाला उमेदवारी देण्याचा निर्णय एमआयएमच्या पदाधिकारी, माजी नगरसेवकांसाठी 'जोर का झटका' होता. कदीर मौलाना आणि इम्तियाज जलील यांच्या समर्थकांमध्ये गेल्या काही वर्षात अनेकदा राडा झाल्याचे पहायला मिळाले. मौलाना यांनी ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष आणि त्यानंतर बीआरएस पक्षाचे नेते असताना गंभीर आरोप केले होते.
असे असतांना त्यांच्या मुलाला एमआयएमची उमेदवारी देत इम्तियाज जलील यांनी भविष्यातील वेगळ्या राजकीय समीकरणाचे संकेत दिल्याचे बोलले जाते. कदीर मौलाना यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडल्यानंतर तेलंगाणातील के. चद्रशेखर राव यांच्या बीआरएस पक्षाची मोठी जबाबदारी महाराष्ट्रात स्वीकारली होती. परंतु या पक्षाची त्यांच्याच राज्यात वाताहात झाल्यानंतर कदीर मौलाना हे राजकारणातूनच बाहेर फेकले गेले.
विशेष म्हणजे तेलंगणामध्ये बीआरएस पक्षाच्या पराभवाला एमआयएम पक्षाचाही हातभार लागला होता. आता त्याच एमआयएमसोबत कदीर मौलाना यांचे सूर जुळू लागले आहे. ओसामा अब्दुल कदीर यांना उमेदवारी हे त्यांचेच उदाहरण म्हणावे लागेल.
मध्य विधानसभा मतदारसंघातून दोनवेळा निवडणूक लढलेले एमआयएमचे (AIMIM) पदाधिकारी व इम्तियाज जलील यांचे विश्वासू सहकारी असलेल्या नासेर सिद्दीकी यांनीच त्यांच्यावर गंभीर आरोप केले. दहा-पंधरा वर्ष ज्यांनी सातत्याने पक्षाच्या विरोधात काम केले, त्यांनाच इम्तियाज जलील यांनी तिकीटे दिली. आणि ज्यांनी पक्ष वाढवण्यासाठी मेहनत घेतली, त्यांना ते आज गद्दार ठरवत असल्याचा आरोप सिद्दीकी यांनी केला. 'बाप बेटे ने उमेदवार फायनल करके उसपे ओवेसी साहब की मोहर उठायी' असे म्हणत इम्तियाज जलील यांना प्रदेशाध्यक्ष पदावरून हटवण्याची मागणी केली.
एवढ्या सगळ्या गोंधळानंतरही इम्तियाज जलील यांनी जे नाराज झाले आहेत, ते माझे आपले आहेत. त्यांची नाराजी मी समजू शकतो. पण मी पक्षाकडून नव्या चेहऱ्यांना संधी देण्याचा प्रयत्न केला आहे. ज्यांनी पक्ष मोठा करण्यासाठी पडत्या काळात कष्ट घेतले, अशा लोकांनाच आपण उमेदवारी दिली आहे. सुशिक्षित, तरुणांची पक्षाला गरज आहे. काम सगळ्यांचेच आहे, प्रत्येकांना पक्ष मोठा करण्यासाठी योगदान दिले आहे. पण उमेदवारी कोणा एकालाच देता येते? त्यामुळे नाराजांना आपण भेटून, त्यांची समजूत काढू, अशी भूमिका इम्तियाज जलील यांनी घेतली.
इम्तियाज जलील यांनी छत्रपती संभाजीनगर महापालिकेत तरुण आणि नव्यांना संधी देण्याचा घेतलेला निर्णय, बहुतांश माजी नगरसेवकांना नारळ देत घरी बसवण्याचे दाखवलेले धाडस याकडे मास्टर स्टोक म्हणून पाहिले जात आहे. पण खरचं हा त्यांचा मास्टर स्ट्रोक आहे की सेल्फ गोल? हे लवकरच स्पष्ट होईल.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.