

Shivsena news: नगरपालिका, नगरपंचायत निवडणुकीचे पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडले आहे. तर 20 डिसेंबर रोजी दुसरा टप्पा होणार आहे. त्यानंतर महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका कोणत्याही क्षणी जाहीर होऊ शकतात. या पार्श्वभूमीवर महायुती आणि महाविकास आघाडी शिवाय इतर पक्षांनी तयारी सुरू केली आहे. छत्रपती संभाजीनगर महापालिकेवर गेली 25 वर्ष शिवसेना भाजप युतीची सत्ता राहिली आहे.
शिवसेनेत फूट पडल्यानंतर होणाऱ्या महापालिकेच्या पहिल्याच निवडणुकीत मोठा भाऊ म्हणून स्थान मिळवण्यासाठी एकनाथ शिंदे आणि संभाजीनगर येथील स्थानिक नेत्यांनी कंबर कसली आहे. भाजपकडून सुरुवातीपासून स्वबळाची भाषा केली जात असली तरी शिवसेनेने संयम राखत एकत्र लढण्याची भूमिका घेतली आहे.
महापालिका निवडणुकीच्या तयारीचा भाग म्हणूनच आजपासून समर्थनगर येथील कार्यालयातून इच्छुकांना अर्जांचे वाटप सुरू झाले आहे. सोमवारी आणि मंगळवारी प्रत्यक्ष मुलाखती घेण्यात येणार आहे. मुलाखतींचा महत्त्वाचा टप्पा पार पडल्यानंतर प्रत्यक्ष भाजपसोबत युतीची चर्चा केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पूर्वीच्या युतीमध्ये ज्या पक्षाकडे जितक्या जागा होत्या त्याच कायम ठेवण्याचा फॉर्मूला राबवला जावा, अशी इच्छा शिवसेनेकडून व्यक्त केली जात असल्याचे समजते.
गेल्या वेळच्या महापालिकेत 29 नगरसेवकांसह शिवसेना मोठ्या भावाच्या भूमिकेत होता. तर भाजपचे 23 नगरसेवक होते. त्यामुळे या जागांवर कुठलीही तडजोड न होता उर्वरित जागांवर बोलणी केली जाईल असे बोलले जाते. नगरपालिका, नगरपंचायत निवडणुकीत एकमेकांचे पदाधिकारी, कार्यकर्ते फोडाफोडी वरून शिवसेना आणि भाजप मधले संबंध कमालीचे ताणले गेले होते. हा वाद अगदी दिल्लीत अमित शहा यांच्या दरबारी पोहोचला होता.
त्यानंतर फोडाफोडी, पळवा पळवीचे राजकारण थांबेल असे वाटले होते. परंतु पुन्हा काही भागात शिवसेना आणि भाजपने एकमेकांचे महत्त्वाचे पदाधिकारी फोडून त्यांना आपापल्या पक्षात प्रवेश दिल्याचे प्रकार घडले. त्यानंतर पुन्हा राज्यातील भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांची बैठक होऊन महापालिका, जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर फोडाफोडी थांबवण्याचा निर्णय झाल्याचे समजते.
एवढेच नाही तर महापालिका, जिल्हा परिषदेसाठी स्वबळाची भाषा करणाऱ्या भाजपने एकत्र लढण्याची भाषा सुरू केली आहे. हे बदलते वातावरण आगामी निवडणुकीसाठी महायुतीला फायद्याचे ठरू शकते. अर्थात जागावाटप हा कळीचा मुद्दा दोन्ही पक्षाचे नेते कशा पद्धतीने हाताळतात? यावरच महायुतीचे भवितव्य अवलंबून असणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.