Beed Political News : राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांचे विश्वासू अशी ओळख असलेले अशोक डक भाजपात प्रवेश करण्याच्या चर्चांना उधाण आले आहे. बीडमध्ये भाजपाही नव्या चेहऱ्याच्या शोधात असल्याने डक यांच्या रुपाने त्यांचा हा शोध संपणार आहे. माजलगाव मतदारसंघात स्थानिक आमदार प्रकाश सोळंके यांच्याशी असलेले मतभेद पाहता डक यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय घेतला असल्याचे बोलले जाते. डक यांना भाजपाकडून जिल्हा पातळीवर नेतृत्वाची संधी दिली जाणार असल्याचे समजते.
अशोक डक हे मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती, बीड (Beed News) जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष म्हणून कार्यरत होते. तो कार्यकाळ डक यांनी चांगलाच गाजवला होता. पण माजलगाव मतदारसंघात त्यांचे आमदार प्रकाश सोळंके यांच्याशी कधी सूर जुळलेच नाही. 2024 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत डक यांनी सोळंके यांच्याविरोधात काम केल्याचा आरोपही केला जातो. स्थानिक पातळीवर पक्षाकडून दुर्लक्षित केले जात असल्याने डक यांनी आता वेगळा निर्णय घेतल्याचे बोलले जाते.
राज्य पातळीवर भाजपा-शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) या तीन पक्षांची महायुती झाली. पण बीड जिल्ह्यात भाजपाकडे नेतृत्व करणारा चांगला चेहराच उरला नाही. अनेकांनी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर उमेदवारीसाठी पक्ष बदलले. एकेकाळी माजलगांव मतदारसंघावर पकड असलेल्या भाजपासाठी नवे नेतृत्व उभे करण्याचे आव्हान असताना अशोक डक यांच्या सारखा मोहरा त्यांची हाती लागला आहे.
अशोक डक यांचा माजलगाव मतदारसंघातील दांडगा जनसंपर्क आणि बीड जिल्हाप्रमुख म्हणून केलेल्या कामाचा अनुभव भाजपासाठी आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत निश्चितच फायद्याचा ठरू शकतो. सध्या गल्ली ते दिल्ली भाजपाची सत्ता असतांना बीड जिल्ह्यात मात्र नेतृत्वाच्या अभावामुळे भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये मरगळीचे चित्र आहे. अशोक डक यांना संधी मिळाल्यास ही मरगळ दूर होण्यास निश्चितच मदत होणार आहे.
डक यांच्या भाजपा प्रवेशाची चर्चा सुरू असली तरी त्यांनी मात्र 'वेट अॅण्ड वॉच'ची भूमिका ठेवली आहे. दरम्यान डक यांच्या भाजपा प्रवेशाने माजलगाव मतदारसंघातील राजकीय समिकरणे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत बदललेली दिसतील. डक यांना रोखण्याचे प्रयत्न अजित पवार करतात का? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. अजित पवार बीडचे पालकमंत्री झाले असताना संघटनात्मक ताकद वाढण्याऐवजी ती कमी होताना दिसते आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.