

NCP News : राज्यभरात बीड जिल्ह्याची बदनामी सुरू असताना तत्कालीन उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांनी बीड जिल्ह्याचे पालकत्व स्वीकारले होते. पालकमंत्री झाल्यानंतर जिल्ह्यात त्यांनी कामांचा धडाका सुरू केला होता. बीड जिल्ह्याच्या माथ्यावर लागलेला बदनमीचा कलंक मिटवून त्याला विकासाच्या मार्गावर आणण्याचा विडाच अजित पवारांनी उचलला होता. त्या दृष्टीने वाटचाल सुरू असतानाच त्यांनी बीडमध्ये सर्व प्रकारच्या अत्याधुनिक सुविधांनी युक्त असे भव्य क्रीडा संकूल निर्माण करण्याचे स्वप्न पाहिले होते.
पालकमंत्री म्हणून त्यांनी बीडच्या जिल्हा क्रिडा संकुलाला भेट देत त्याच्या विकासकामासाीठी 25 कोटींचा निधी देण्याची घोषणा केली होती. पुढे दुर्दैवाने बारामती येथील एका विमान अपघातात अजित पवारांचे निधन झाले. विकासाचे स्वप्न दाखवून अजित पवारांनी घेतलेली ही अचानक एक्झीट बीडकरांच्या जीवाला चटका लावून गेली.
आता राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी बीड जिल्ह्याचे पालकत्व स्वीकारले आहे. अद्याप त्यांना बीड जिल्ह्यासाठी अधिकचा वेळ देता आला नसला तरी अजित पवारांनी बीड क्रीडा संकुलाच्या विकासाच्या पाहिलेल्या स्वप्नांना निधी मंजुरीच्या पंखांचे बळ देण्याचे काम मात्र त्यांनी केले आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत बीडच्या क्रीडा संकुलासाठी 24 कोटी 95 लाखाच्या निधीला मंजूरी देण्यात आली आहे. पालकमंत्री म्हणून सुनेत्रा पवार यांनी यात महत्त्वाची भूमिका बजावली.
बीड जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री अजित पवार यांनी बीड जिल्हा क्रीडा संकुलास भेट देत तेथील समस्यांसंदर्भात खेळाडू व क्रीडाप्रेमी नागरिकांशी चर्चा केली होती. त्यानंतर लगेच बीड जिल्हा क्रीडा संकुलाच्या विकासकामांसाठी 25 कोटी रुपये निधीची घोषणा केली होती. याबाबत शासन निर्णय निर्गमित झाला होता.
शासन निर्णयातील अटींप्रमाणे या कामास मंत्रिमंडळ समितीची मान्यता घेणे आवश्यक होते. राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांच्या प्रयत्नातून आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत याबाबत चर्चा होऊन त्यास मंजुरी मिळाली आहे. बीड जिल्हा क्रीडा संकुलाच्या 24 कोटी 95 लाख रुपयांच्या कामांना मंजुरी देण्यात आली आहे.
क्रीडा संकुलात सिंथेटिक ॲथलेटिक ट्रॅक, फुटबॉल, हॉकी मैदान, व्हॉलीबॉल, कबड्डी, खो-खो मैदान, इनडोअर हॉल इमारतीचे अद्ययावतीकरण, वसतिगृहाच्या तिसऱ्या मजल्याचे बांधकाम, रेनवॉटर हार्वेस्टिंग करणे आणि विविध खेळांच्या मैदानांचा समावेश आहे.
बीड जिल्हा क्रीडा संकुलाच्या विविध विकासकामांसाठी सुमारे 24 कोटी 95 लाख रुपयांचा निधी मंजूर केल्याबद्दल गेवराईचे आमदार विजयसिंह पंडीत यांनी महायुती सरकारचे पालकमंत्री सुनेत्रा पवार यांचे आभार मानले आहेत.
खेळाडूच्या डोळ्यांतील स्वप्नांना नवी उमेद
यामुळे बीडमधील खेळाडूंना अत्याधुनिक प्रशिक्षणाची संधी उपलब्ध होणार आहे. बीड जिल्ह्यातील तरुण खेळाडूंना आधुनिक व दर्जेदार क्रीडा सुविधा मिळाव्यात, त्यांना राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर झेप घेण्यासाठी सक्षम व्यासपीठ मिळावं, हा कायमच माझा प्रयत्न राहिला आहे. या क्रीडा संकुलाच्या उभारणीत येणारे प्रशासकीय अडथळे दूर करून निधी मंजुरीचा मार्ग मोकळा करण्यासाठी सातत्यानं प्रयत्नशील राहिले, अशी प्रतिक्रिया बीडच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी दिली आहे.
मंत्रिमंडळाच्या निर्णयामुळे क्रीडा संकुलाच्या उर्वरित कामांना मोठी गती मिळणार असून, बीड जिल्ह्यातील क्रीडा संस्कृती अधिक सक्षम होईल, याचा मला विश्वास आहे. आदरणीय अजितदादांनी पाहिलेलं बीडमध्ये भव्य-दिव्य क्रीडा संकुल उभारण्याचं स्वप्न आता प्रत्यक्षात साकार होत आहे. बीडच्या प्रत्येक खेळाडूच्या डोळ्यांतील स्वप्नांना नवी उमेद देणारा हा निर्णय असून, जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्रासाठी हा एक ऐतिहासिक टप्पा ठरणार असल्याचे सुनेत्रा पवार यांनी म्हटले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.