Chhatrapati Sambhajinagar : राजकीय पक्षाच्या बड्या नेत्यांचे चेले चपाटे महापालिकेच्या आशिर्वादाने संभाजीनगरकरांच्या पाण्यावर डल्ला मारत आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून हा धंदा सुरू असून यात लूट मात्र सर्वसामान्यांची होत आहे. संभाजीनगरमधील सर्व पक्षीय लोकप्रतिनिधी आमदार, खासदार, मंत्र्यांनी वीस वर्षात नागरिकांना पाण्यासाठी तरसवले. तर दुसरीकडे प्रशासनातील अधिकारी नेत्यांच्या हातचे बाहुले बनले. यात भर टाकली ती नेत्यांच्या चेले चपाटे आणि त्यांच्या टॅंकर लाॅबीने.
पाण्यासाठी व्याकूळ झालेल्या संभाजीनगरकरांना (Chhatrapati Sambhajinagar) त्यांच्याच हक्काचे पाणी चोरी करून विकण्याचा धंदा अनेक वर्षापासून राजेरोसपणे सुरू आहे. राजकीय नेत्यांचा डोक्यावर हात आणि महापालिकेच्या आशिर्वादाने संभाजीनगरात टॅंकर लाॅबीचे मोठे जाळे निर्माण झाले आहे. यातून कोट्यावधीचा व्यवहार आणि सर्वसामान्यांची लूट सुरू आहे. आजघडीला शहरात जवळपास हजार टॅंकर पाण्याची विक्री करताना दिसत आहेत. ऐन उन्हाळ्यात नळाला पाणी येत नाही, म्हणून टँकर मागविण्याची वेळ नागरिकांवर येते. पाण्याचा टॅंकर घरात येईपर्यंत त्याचे दर दुप्पट-तिप्पट वाढलेले असतात.
दोनशे रुपयांना भरून आणलेले टँकर सहाशेला तर साडेतीनशेला भरलेले टँकर तब्बल एक हजार रुपयांना नागरिकांच्या माथी मारले जाते. यातून वर्षाला सुमारे दीडशे ते दोनशे कोटींची उलाढाल होत असून अशा लूटमारीतून टॅंकर लाॅबी गब्बर झाली आहे. बोअर, विहिरीच्या पाण्यासाठी जुजबी रक्कम मोजल्यानंतर टॅंकरचालक नागरिकांकडून तिपटीने पैसे वसूल करत आहेत. टॅंकरच्या व्यवसायातून शहर परिसरात वर्षाला दोनशे कोटी रुपयांची उलाढाल होते. 31 मार्चला नव्या 2740 कोटी रुपयांच्या पाणी योजनेचे (Water Supply Issue) पहिल्या टप्प्याचे पाणी देण्याची डेडलाइन देण्यात आली होती. मात्र आता ती हुकली असून त्रासलेल्या नागरिकांचा यामुळे संताप होत आहे.
एकीकडे पाणीटंचाई अन् दुसरीकडे टॅंकर लॉबीकडून होणारी नागरिकांची लूट अशा दुष्टचक्रात संभाजीनगरची जनता भरडली जात आहे. उन्हाळा सुरू झाला की दरवर्षी महापालिकेची पाइपलाइन फुटणे, तांत्रिक बिघाडाची मालिका सुरू होते. त्याचा सर्वाधिक फायदा घेत टॅंकर लॉबी पाण्याचा पैसा करत आहे. टँकर लॉबीच्या सोयीसाठीच दरवर्षी उन्हाळ्यात पाइपलाइन फुटतात का? असा संशय आता नागरिकांमधून व्यक्त केला जात आहे.
पाण्यासारखे पैसे मोजावे लागतात..
शहराच्या विविध भागांत टॅंकर लॉबीने दुकाने थाटली आहेत. ज्याठिकाणी विहिरींना पाणी आहे किंवा बोअरचे पाणी आटत नाही, असे भाग टॅंकर लॉबीसाठी वरदान ठरत आहेत. दिवसभर टॅंकरच्या लांब रांगा अनेक भागांत दिसून येतात. विहीर, बोअर मालकांना दोन हजार लिटरचे टँकरचालक 150 ते 200 रुपये देतात. पाच हजार लिटरसाठी 350 रुपये मोजले जातात. टँकरमध्ये पाणी पडताच मात्र हे दर तिप्पट होतात. नाइलाज झालेले नागरिक पाण्यासारखे पैसे मोजून हे पाणी विकत घेतात.
शहरात पाणीचोरांची लॉबी तयार झाली आहे. महापालिकेच्या टाक्यांवरून नागरिकांसाठी म्हणून टँकर भरले जातात आणि या पाण्याची विक्री करून काही जण कोट्यधीश झाले आहेत. पाणीचोरांवर कुणाचेही भय नसल्याने कारवाई करणार कोण? असा प्रश्न उपस्थित केला आहे. महापालिकेने नियुक्त केलेल्या टँकर एजन्सीतर्फे सध्या 47 टॅंकरद्वारे 220 फेऱ्या करून गुंठेवारी भागाला पाणी दिले जाते. मात्र, प्रत्यक्षात त्यापेक्षा दुप्पट टँकर दिवसभरात भरले जातात.
दोन लाख नागरिकांची तहान टँकरवर
एकीकडे 2740 कोटी रुपयांच्या नव्या पाणी योजनेचे काम सुरू असताना दुसरीकडे शहरातील पाणीटंचाईचा गैरफायदा घेण्यासाठी टँकर लॉबी सक्रिय झाली आहे. महापालिकेने नो-नेटवर्क भागात टँकरने पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला असला तरी फक्त पिण्याचेच पाणी दिले जाते. तीन दिवसांआड 200 लिटर पाणी नो नेटवर्क भागातील नागरिकांना मिळते.
सांडपाण्यासाठी मात्र या भागातील सुमारे दोन लाख नागरिकांना वर्षभर बोअर किंवा खासगी टँकरच्या पाण्यावर विसंबून राहावे लागते. महापालिकेने टँकरने पाणी पुरवठा करण्यासाठी निविदा प्रक्रिया राबवून काम दिले आहे. त्यासाठी कंत्राटदाराला प्रति किलोमीटर 3.51 रुपये दराने पैसे देते. वर्षानुवर्षे तेच ते टँकरचे कंत्राटदार महापालिकेत आहेत. यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि भाजपाच्या पदाधिकाऱ्यांकडे पाणीपुरवठ्याचे कंत्राट आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.