Dhananjay Munde : मुंडे एकाकी; पवारांवरील आरोपांनंतर पक्ष आक्रमक

Dhananjay Munde Ajit Pawar : बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येवरून राष्ट्रवादीचे स्थानिक नेते व अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी सर्वपक्षीयांकडून होत असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मात्र
Dhananjay Munde, Ajit Pawar
Dhananjay Munde, Ajit Pawar sarkarnama
Published on
Updated on

पांडुरंग म्हस्के

Beed News : मस्साजोग येथील प्रकरणावरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सहकारी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर विरोधकांकडून आरोपांची राळ उडविली जात आहे. ‘राष्ट्रवादी काँग्रेस’कडून मात्र याबाबत कोणतीच प्रतिक्रिया दिली गेलेली नाही. आधी परदेशी असल्याने आणि आता परत आले तरी अजित पवार यांनीही अद्याप या मुद्द्याबाबत अवाक्षरही काढलेले नाही.

बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येवरून राष्ट्रवादीचे स्थानिक नेते व अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी सर्वपक्षीयांकडून होत असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मात्र यावर काहीच प्रतिक्रिया दिलेली नाही. या प्रकरणावरून सुरुवातीच्या काळात विजनवासात गेलेली राष्ट्रवादी काँग्रेस त्यांच्या नेत्यावर म्हणजे अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर थेट निशाणा साधल्यानंतर लगेचच व्यक्त होऊ लागली आहे.

या प्रकरणावर व्यक्त होण्यास एवढा वेळ का लागला हाच खरा प्रश्न आहे. बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्येच्या निषेधार्थ परभणीत निघालेल्या सर्वपक्षीय मूक मोर्चातील सभेतून भाजपचे आमदार सुरेश धस यांनी ‘अजित दादा क्या हुआ तेरा वादा, काय को इसको अंदर लिया?’ असे म्हणत त्यांनी धनंजय मुंडे यांच्या मंत्रिमंडळातील समावेशावरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधला होता. सुरेश धस यांनी अजित पवार यांना घेरल्यानंतरच राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली आहे. याचा अर्थ धनंजय मुंडे (Dhananjay Munde) पक्षातील अन्य नेत्यांना अडचणीचे होत आहेत का, असा प्रश्‍न उपस्थित होतो.

धनंजय मुंडे यांच्यावर आरोप होत असताना एकही नेता पुढे आलेला नव्हता, मात्र अजित पवार यांचे नाव या प्रकरणात घेतले जाताच राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक होते, याचा अर्थ धनंजय मुंडे हे पक्षात एकटे पडले आहेत. बीडमधील संतोष देशमुख यांच्या हत्येवरून धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी होत असताना यावर पक्षाचे प्रमुख आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांचा पक्ष शांत होता. देशमुख हत्येप्रकरणी कारवाईच्या मागणीसाठी सर्वपक्षीय मोर्चे विविध ठिकाणी काढण्यात येत आहेत.

Dhananjay Munde, Ajit Pawar
Nitesh rane : नितेश राणेंचे ठीक आहे पण संयमी सुरेश खाडेंकडूनही द्वेषांची भाषा...

नागपूरच्या हिवाळी अधिवेशनातही याचे अत्यंत तीव्र पडसाद उमटले. अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी अजित पवार यांनी बीडमध्ये जाऊन देशमुख कुटुंबीयांची भेट घेतली होती व सूत्रधारांवर कारवाईचा इशाराही दिला होता. मात्र त्यानंतर आठवडाभर धनंजय मुंडे यांच्या विरोधात कारवाईची मागणी होत असताना अजित पवारांकडून काहीच प्रतिक्रिया व्यक्त आलेली नाही. अजित पवार कुठे आहेत याबद्दलही तर्क लावण्यात येत होते. इकडे मुंडेंच्या विरोधात रान पेटलेले असताना अजित पवार मात्र आपल्या कुटुंबीयांसह परदेशात होते. मुंडे यांच्या राजीनाम्यावरून पक्षाचे प्रचंड नुकसान सुरु असताना ‘डॅमेज कंट्रोल’ची कोणतीही यंत्रणा पक्षाकडून कार्यरत नव्हती.

निवडणूक काळात प्रतिमा संवर्धनासाठी नेमलेली खासगी कंपनीसुद्धा या कामात मदतीला अली नसल्याचे जाणवले. मात्र नेताच परदेशात असल्याने इथले नेते आणि कार्यकर्तेही संभ्रमात होते. पक्षाकडून डॅमेज कंट्रोलचे काहीच प्रयत्न होताना दिसत नसल्याबद्दल राष्ट्रवादीच्या काही मंत्र्यांना विचारले असता, हे प्रकरण ‘कंट्रोल’च्या बाहेर गेले असल्याची प्रतिक्रिया एका मंत्र्याने खासगीत दिली.

Dhananjay Munde, Ajit Pawar
Walmik Karad News : ...खरं,खोटं काय ते बावनकुळे, धस अन् मिटकरींनाच ठावं!

दमानियाही रिंगणात

मुंडे यांच्यावर विविध पक्षांकडून आरोप होत असताना राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या अध्यक्षा संध्या सोनावणे यांची ‘सीआयडी’ने चौकशी केली आहे. आपण राष्ट्रवादीच्या पदाधिकारी असल्याने चौकशी झाल्याचा दावा सोनावणे यांनी केला. मुंडेंवर आरोप होत असतानाच युवती काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांची चौकशी होणे म्हणजे ‘राष्ट्रवादी’बद्दल संशय निर्माण होण्यासारखेच आहे. बीडमधील गुंडगिरी तसेच देशमुख हत्या प्रकरण धसास लावण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आता रिंगणात उतरल्या आहेत. त्यामुळे या प्रकरणाची व्याप्ती वाढली आहे. त्यातच भाजप आमदार सुरेश धस यांनीही सातत्याने मुंडेंवर निशाणा साधत राष्ट्रवादीची कोंडी केली आहे. या प्रकरणाला जातीय रंग आल्याने अजित पवार गटाला सध्या बचाव करताना तारेवरची कसरत करावी लागत आहे, हे मात्र खरे.

धस यांच्यावर निशाणा

धस यांनी थेट अजित पवार यांच्यावर निशाणा साधताच सारी राष्ट्रवादी काँग्रेस खडबडून जागी झाली. मुंडे यांना मंत्रिमंडळात का घेतले, असा थेट सवाल जाहीर सभेतून धस यांनी पवार यांना केल्याने पक्षाचे प्रवक्ते अमोल मिटकरी, सूरज चव्हाण आणि रूपाली चाकणकर यांनी अखेर तोंड उघडत धस यांना प्रत्युत्तर दिले. ‘आपल्या पक्षाचे आमदार सुरेश धस यांनी परभणीमधील मूक मोर्चात अजित पवार यांच्या विषयी जी गरळ ओकली त्याबद्दल आपण त्यांना जाब विचारणार, की त्यांचा बेभान सुटलेला बैल आणखी मोकाट सोडणार?’ असा सवाल फडणवीस यांना मिटकरी यांनी केला.

Dhananjay Munde, Ajit Pawar
Amol Mitkari : 'हमाम मे सब नंगे' मिटकरींच्या विधानाचा हाच आहे का अर्थ?

तर, ‘आरोपी आत्मसमर्पण करत आहेत. मग तुमचा गृहखात्यावर आणि गृहमंत्र्यांवर विश्वास नाही का,’ असा प्रश्‍न राष्ट्रवादीचे प्रवक्ते सूरज चव्हाण यांनी विचारला आहे. या प्रकरणी अजित पवार यांनी धनंजय मुंडे यांच्याशी स्वतंत्रपणे तासभर चर्चाही केल्याचे समजते. मात्र त्यात नेमकी चर्चा काय झाली याबाबत सगळ्यांचीच अळीमिळी गुपचिळी आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com