Amol Mitkari : 'हमाम मे सब नंगे' मिटकरींच्या विधानाचा हाच आहे का अर्थ?

Amol Mitkari on Suresh Dhas : राजकारणात कुणीही स्वच्छ नसतो, असा समज दृढ आहेच. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अमोल मिटकरी यांच्या विधानाने तो पुन्हा अधोरेखित झाला आहे. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे प्रकरण लावून धरणारे आमदार सुरेश धस यांचीही प्रकरणे बाहेर काढण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
Amol Mitkari Suresh Dhas
Amol Mitkari Suresh DhasSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News: सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर सुरू झालेल्या राजकीय घडामोडी थांबायचे काही केल्या नाव घेत नाहीत. या प्रकरणात धनंजय मुंडे विरोधकांसह मित्रपक्षांतील काही नेत्यांच्या निशाण्यावर आले आहेत.

भाजपचे आमदार सुरेश धस यांनी हे प्रकरण लावून धरले आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अमोल मिटकरी यांचा तोल सुटला आणि ते नको ते बोलून गेले. महायुती धर्मामुळे आम्ही धस यांची प्रकरणे काढली नाहीत, आता काढावी लागतील, असे म्हणत मिटकरी यांनी 'हमाम मे सब नंगे' याची प्रचीती दिली आहे.

सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर बीड जिल्हा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. देशमुख यांच्या हत्येच्या दोन दिवस आधी आमदार धस यांनी वाल्मिक कराड यांच्याशी संपर्क साधला होता, असा आरोप मिटकरी यांनी केला आहे.

आमदार सुरेश धस यांच्यावर अनेक प्रकारचे आरोप आहेत. त्यात खंडणी मागणे, हत्या, जमीन बळकावणे अशा आरोपांचा समावेश आहे. अशा आरोपांची लांबलचक यादी असल्याचे मिटकरी यांनी सांगितले आहे. या सर्व प्रकरणांतील पुरावे योग्यवेळी बाहेर काढणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

आता सामान्य लोकांना पडलेला प्रश्न असा की, अमोल मिटकरी कशाची वाट पाहत आहेत? आमदार धस यांच्यावर इतके गंभीर आरोप असल्याची माहिती त्यांना आधीपासूनच आहे, असे त्यांच्या वक्तव्यावरून लक्षात येत आहे. मग त्यांनी आतापर्यंत आवाज का उठवला नाही? पवनचक्की कंपनीकडे दोन कोटी रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय वाल्मिक कराड याला अटक करण्यात आली आहे. संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणात अटकेत असलेले आरोपी कराड याच्या जवळचे आहेत.

खंडणी आणि संतोष देशमुख यांच्या खुनाच्या प्रकरणात संशयाची सुई वाल्मिक कराड याच्याकडे गेली आहे. त्यामुळे धनंजय मुंडे अडचणीत आले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड, आमदार धस यांनी त्या दृष्टीनेच हे प्रकरण लावून धरले आहे. त्यामुळे मुंडे यांची अडचण झाली आहे. त्यांच्या राजीनाम्याची मागणी सुरू झाली. आरोप सिद्ध होईपर्यंत मुंडे यांचा राजीनामा मागणार नाही, असे अजितदादा पवार (Ajit Pawar) यांनी स्पष्ट केले आहे. आरोपी कुणीही असला तरी त्याला सोडणार नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वारंवार सांगत आहेत.

राजकारण हे चांगल्या लोकांचे काम नाही, अशी चर्चा जुनीच आहे. गेल्या महिना भरापासून सुरू असलेल्या घडामोडींमुळे त्या चर्चेला बळ मिळाले आहे. राजकारणात सगळेच सारखे असतात, असा लोकांचा समज आहे, तो मिटकरी यांच्या वक्तव्यामुळे आणखी दृढ होणार आहे.

महायुतीचा धर्म म्हणून आम्ही धस यांची प्रकरण बाहेर काढली नव्हती. मुख्यमंत्री फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगूनही धस थांबत नसतील तर आम्हालाही त्यांच्या प्रकरणांची यादी बाहेर काढावी लागेल, असे मिटकरी म्हणाले आहेत.

Amol Mitkari Suresh Dhas
Walmik Karad : "वाल्मिक कराडने चांगलं काम केलं म्हणून...", लाडकी बहीण योजनेच्या अध्यक्षपदाबाबत बावनकुळेंनी केलेलं 'ते' वक्तव्य चर्चेत

अमोल मिटकरी हे लोकांना वेडे समजतात का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. आमदार धस यांच्या प्रकरणांची त्यांना माहिती असेल तर ती त्यांनी आतापर्यंत चव्हाट्यावर का आणली नाहीत, याचे उत्तर त्यांना द्यावे लागणार आहे.

मुंडे यांच्याविरोधात प्रकरण लावून धरू नका, असे मुख्यमंत्री फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी आमदार धस यांना समजावून सांगितले आहे, असेही मिटकरी (Amol Mitkari) सांगत आहेत. हे खरे आहे का, हेही समोर आले पाहिजे. प्रकरण गंभीर वळणावर जात आहे का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

आमदार धस किंवा आमदार आव्हाड यांनी आरोप केले म्हणून मुंडे दोषी ठरतील का, हे तपासाअंती स्पष्ट होणार आहे. पंकजा मुंडे या महिला व बालविकास मंत्री असताना धनंजय मुंडे यांनी त्यांच्यावर चिक्की घोटाळ्याचा आरोप करत राजीनाम्याची मागणी केली होती, हे मिटकरी यांनी लक्षात घेतले पाहिजे. वाल्मिक कराड हा धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय आहे, हे कुणीही नव्याने सांगण्याची गरज नाही. त्यामुळेच तपास पूर्ण होईपर्यंत मुंडे यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी धस, आव्हाड आणि अन्य नेत्यांनी केली आहे.

Amol Mitkari Suresh Dhas
Delhi Assembly Election 2025: ममतादीदी, अखिलेश, उद्धव ठाकरेंनी काँग्रेसला एकटं पाडलं; दिल्लीत काँग्रेस Vs इंडिया आघाडी

याला मिटकरी यांनी दिलेले उत्तर राजकीय नेत्यांना संशयाच्या भोवऱ्यात आणणारे आहे. तुम्हीही शांत बसा, मग आम्ही शांत बसू, एकमेकांचे घोटाळे बाहेर काढायचे नाहीत, असा मिटकरी यांच्या विधानांचा अर्थ आहे. आमदार धस हे थांबत नसल्याचे पाहूनच राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांच्याविरोधात रणनीती आखल्याचे सांगितले जात आहे. राजकारणात कुणीही स्वच्छ नाही, सर्वच जण गुंडगिरी करतात, जमिनी बळकावतात, खून करतात, असा अर्थ मिटकरी यांची विधाने आणि राष्ट्रवादीच्या रणनीतीतून निघत आहे.

सुरेश धस-अजितदादांची भेट; आव्हाडांना वेगळाच संशय़-

दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही आमदार धस यांच्यावर निशाणा साधला आहे. आमदार धस यांनी उमपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची भेट घेतली. धस यांनी संतोष देशमुख यांच्या हत्येचे प्रकरण लावून धरले आहे. जेव्हा युद्ध सुरू असते तेव्हा आपल्या सैन्याने समोरच्या सेनापतीला भेटायचे नसते.

राजकारण जरी असले तरी त्यांची घरी जाऊन जेवण केलात तर संशय येणारच, असे आमदार आव्हाड म्हणाले आहेत. बीडमधील काही पतसंस्थांनी गुंतवणूकदारांचे पैसे बुडवले आहेत. वाल्मिक कराड याने एका पतसंस्थेकडून पैसे उकळले आहेत, हे अजितदादांना सांगण्यासाठी, यावर मार्ग काढण्यासाठी त्यांची भेट घेतल्याचे धस यांनी स्पष्ट केले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com