Shivsena News : छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुकीत शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. एकाच घरातून मुलगा माजी नगरसेवक सिद्धांत आणि आपल्या राजकारणाचा श्रीगणेशा महापालिका निवडणुकीतून करू पाहणारी कन्या हर्षदा यांना उमेदवारी देत शिरसाट यांनी घराणेशाहीला प्रोत्साहन दिले आहे. तीनवेळा आमदार म्हणून निवडून आलेल्या संजय शिरसाट यांच्या पश्चिम विधानसभा मतदारसंघाचाच भाग असलेला अठरा क्रमांकाचा हा प्रभाग.
मुलगा सिद्धांत शिरसाट याने याआधी महापालिकेची निवडणुक लढली आणि जिंकली. पण हर्षदा शिरसाट यांच्यासाठी निवडणुकीचा हा पहिलाच अनुभव आहे. पालकमंत्री असलेल्या वडिलांचा भक्कम पाठिंबा असला तरी संजय शिरसाट (Sanjay Shirsat) हे मुलीच्या बाबतीत रिस्क घेण्यास अजिबात तयार नाहीत. मुलीला बिनविरोध निवडून आणण्याचे अटोकाट प्रयत्न शिरसाट यांनी केले, पण त्यात त्यांना यश आले नाही.
विशेष म्हणजे ज्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी संजय शिरसाट यांच्यावर माघारीसाठी आमच्या उमेदवारांना धमकावले जात असल्याचा आरोप केला, त्याच पक्षाचा उमेदवार संजय शिरसाट यांच्या कन्येच्या विरोधात मैदानात नाही. हे असे कसे घडले? याबद्दलही आश्चर्य व्यक्त केले जात आहे. त्यामुळे आता या प्रभागामध्ये शिवसेनेच्या हर्षदा शिरसाट विरुद्ध भाजपच्या मयुरी बरथुने यांच्यात थेट लढत होत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानेही इथे वर्षा सोनवणे यांना उमेदवारी दिली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, काँग्रसे, एमआयएम, वंचित बहुजन आघाडी, बसपा या पक्षांनी इथे उमेदवार दिलेले नाहीत. आता त्यांनी माघार घेतली की त्यांना घ्यायला लावली? हा वादाचा मुद्दा आहे.
छत्रपती संभाजीनगरच्या (Chhatrapati Sambhajinagar) गेल्या महापालिका निवडणुकीत या प्रभागातील वार्डातून शिरसाट यांचे चिरंजीव सिद्धांत, विकास जैन आणि विजय वाघचौरे हे शिवसेनेचेच नगरसेवक निवडून आले होते. या निवडणुकीत मात्र हे तिघेही या प्रभागातून बाहेर पडले आहेत. पैकी विकास जैन हे नाराज असून ते निवडणूक लढवत नाहीयेत. तर सिद्धांत शिरसाट आणि विजय वाघचौरे हे दुसऱ्या प्रभागातून लढत आहेत.
नागरी सुविधांच्या बाबतीत परस्परविरोधी स्थिती असणाऱ्या भागांचे मिळून तयार करण्यात आलेल्या प्रभाग क्र. 18, 19 आणि 20 मधील एक लाख नागरिकांना या विविध समस्या आहेत. यात प्रामुख्याने पाण्याचा प्रश्न तर आहेच, त्याशिवाय साफसफाई, ड्रेनेज, आरोग्य, बाजारपेठांतील पार्किंग आणि वाहतूक समस्या, चिमुकल्यांचे खेळण्यासाठी आवश्यक क्रीडांगणे आणि उद्याने या समस्या यावेळी तरी सोडवल्या जातील का, असा प्रश्न मतदारांमध्ये आहे.
या तीन प्रभागांचा विचार करता हे तिन्ही प्रभाग आता संमिश्र समस्यांचे प्रभाग बनले. जुन्या वॉर्ड रचनेत यातील बन्सीलालनगर, वेदांतनगर, क्रांती चौक, ज्योतीनगर हे तुलनेने चांगले आणि पाणी वगळता इतर समस्या फारसे नसलेले वॉर्ड होते. पण, आता नवीन प्रभाग करताना या वॉर्डांची मोडतोड होऊन इतरही वॉर्डांमधील समस्यायुक्त भाग जोडले गेले.
परिणामी पाणी, कचरा, ड्रेनेज या रोजच्या समस्यांसोबतच सुसह्य नागरी जीवनासाठी आवश्यक असलेली वाहतूक समस्येची सोडवणूक, पार्किंग समस्या सोडवणे, उद्याने, क्रीडांगणे विकसित करणे, महापालिका रुग्णालयांची उपलब्धी हे महत्त्वाचे विषय असणार आहेत.
वाहतूक समस्येने बेजार असलेला शहानूरमियाँ दर्गा परिसर असेल किंवा 24 पैकी 18 तास वाहतूक कोंडीचा त्रास असणारा उस्मानपुरा भाग असेल किंवा उत्तमनगर, बौद्धनगर, पंचशीलनगर, शाहनूरवाडी झोपडपट्टी, क्रांतीनगर, जालाननगर, मगरबी कॉलनी, रमानगर यांसारखे भाग आजही किमान पायाभूत सुविधांपासून वंचित आहेत. प्रभागातील चारही नगरसेवक ते कसे हाताळतात यावर त्या प्रभागाचे भविष्य राहणार आहे. राजकीयदृष्ट्या ताकदवान पक्ष आणि नेत्यांचे हे प्रभाग असले तरी पुढील काळात सर्वसमावेशक विकासाचे शिवधनुष्य त्यांना पेलावे लागेल.
प्रत्येक भागात पाण्याची समस्या शहराच्या इतर भागांसारखीच गंभीर आहे. या तिन्ही प्रभागांत दाट लोकवस्तीचे भाग खूप असून, येथे स्वच्छतेचा प्रश्न कळीचा आहे. या भागात बाजारपेठ झपाट्याने विकसित होत आहे. पार्किंग आणि वाहतुकीच्या समस्येचा ताण रोज जाणवतो. तिन्ही प्रभागांमध्ये काही वसाहती चांगल्या सुविधा असलेल्या असल्या तरी आता बहुतांश भाग किमान सुविधांच्या प्रतीक्षेत आहे. तिन्ही प्रभागांत मिळून जवळपास 1 लाख लोकसंख्या असताना त्या तुलनेत क्रीडांगणे, बाग यांची संख्या कमी आहे.
प्रभाग 18 मध्ये असलेले जुन्या पालिकेतील पदमपुरा, बन्सीलालनगर, वेदांतनगर या वॉर्डांतून शिवसेनेचे गजानन बारवाल, विकास जैन, सिद्धांत शिरसाट तर क्रांतीनगर-कोकणवाडी वॉर्डातून एमआयएमच्या सरिता बोर्डे, तर राहुलनगरमधून काँग्रेसचे अब्दुल नावीद आणि हमालवाडा रेल्वेस्टेशन वॉर्डात राष्ट्रवादीच्या सलिमा बेगम खाजोद्दीन नगरसेवक राहिल्या. आता प्रभाग रचनेत जुन्या वॉर्डांची मोडतोड झाल्याने काँग्रेस, राष्ट्रवादी आणि एमआयएम यांचे भाग तुटले आहेत. परिणामी, नवी समीकरणे तयार होणार असली तरी शिवसेनेचे तिन्ही नगरसेवक आता शिंदे यांच्या शिवसेनेत गेल्याने त्यांचे वर्चस्व या प्रभागावर दिसेल.
या प्रभागाची एकूण मतदारसंख्या 30,369 एवढी आहे. यात अनुसूचित जातीचे 11,345, अनुसूचित जमातीच्या 782 मतदारांचा समावेश आहे. अनुसूचित जाती (महिला) राखीव असलेल्या प्रभाग अठरा (अ) मधून शिवसेनेच्या हर्षदा शिरसाट, भाजपच्या मयुरी बरथूने तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वर्षा सोनवणे रिंगणात आहेत. या शिवाय या प्रभागातील 'ब' हा नागरिकांचा मागास प्रवर्ग तर 'क' सर्वसाधारण महिलेसाठी तर 'ड' सर्वसाधारणसाठी राखीव आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.