

मंगेश काळोखे हत्येला १२ दिवस पूर्ण झाले असून आतापर्यंत १२ आरोपींना अटक करण्यात आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी सुधाकर घारे व भरत भगत यांची नावे समोर येऊनही अटक न झाल्याने प्रश्न उपस्थित झाले आहेत.
काळोखे कुटुंबियांनी पोलिस तपासावर संशय व्यक्त करत निष्पक्ष चौकशीची मागणी केली आहे.
Raigad News : खोपोली नगर परिषदेच्या नवनिर्वाचित नगरसेविका मानसी काळोखे यांचे पती माजी नगरसेवक मंगेश काळोखे यांची २६ डिसेंबर २०२५ला निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. ही हत्या राजकीय वादातून झाल्याचा दावा करण्यात येत असतानाच शिवसेना आमदार महेंद्र थोरवे यांनी राष्ट्रवादीचे प्रवक्ते भरत भगत आणि जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांचे नाव घेतले होते. यावरून नव्या वादाला तोंड फुटले होते. तर त्यानंतर खऱ्या आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आले होते. ज्यानंतर ही हत्या राजकिय वैमनस्यातुन 20 लाखांची सुपारी देऊन करण्यात आल्याचे स्पष्ट झाले होते. तर या हत्ये मागील मुख्य सूत्रधार रवींद्र देवकर असल्याचेही पोलिसांनी जाहीर केलं आहे. पण आता या प्रकरणात गुन्हा दाखल होवूनही मुख्य सूत्रधारावरून आता नवे प्रश्न उपस्थित केले जात असून पोलिसांच्या तपासावरच काळोखे कुटूंबियांनी संशय व्यक्त केला आहे. तसेच काही धक्कादायक प्रश्न उपस्थित केले आहेत. यावरून आता नवा वाद उफाळण्याची शक्यता आहे.
मंगेश काळोखे यांच्या हत्याकांडाला आज १२ दिवस पूर्ण झाले असून या प्रकरणात आतापर्यंत १२ आरोपींना अटक करण्यात आली आहे. याच प्रकरणात सुधाकर घारे आणि भरत भगत यांचा देखील आरोपी म्हणून समावेश आहे. दोघेही राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी असल्याने या प्रकरणाला राजकीय वळण आले आहे. दरम्यान आता त्यांना अद्यापही अटक करण्यात आलेली नाही. यावरूनच आता नवे सवाल उपस्थित केले जात असून त्यांना का अटक करण्यात आलेली नाही असा सवाल काळोखे कुटुंबियांनी केला आहे.
यावेळी कुटुंबियांनी पोलिसांच्या तपासावर संशय व्यक्त करताना या प्रकरणात जे आरोपी आहेत. यावेळी शिवसेनेच्या नवनिर्वाचित नगरसेविका मानसी काळोखे यांनी रवींद्र देवकर, त्याचा मुलगा दर्शन देवकर व धनेश देवकर, पत्नी उर्मिला देवकर यांच्यासह ज्यांना ज्यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्यावर कडक कारवाई व्हावी, त्यांना फाशी व्हायलाच हवी अशी मागणी केली आहे.
तसेच त्यांनी पोलिसांकडून सुरू असणाऱ्या तपासावर टीका करताना हा तपास रेंगाळत असून तो जलद व्हायला हवा. पोलिसांच्या तापासाचे स्पीड पाहता त्यांच्यावर कोणाचा तरी दबाव असल्याचे दिसत आहे. तर यावेळी आपल्या वडीलांची हत्या करणाऱ्यांना फाशीच व्हावी एवढीच आपली मागणी असल्याचे मत दिवंगत काळोखे यांच्या मुलीने मांडले आहे.
यावेळी दिवंगत काळोखे यांचे पुतणे यांनी पोलिसांवर गंभीर आरोप करताना, ज्या दिवशी काका मंगेश काळोखे यांची हत्या झाली त्याच दिवशी मुख्य सूत्रधार रवींद्र देवकर याला भरत भगत यांचे दहा फोन कॉल झाले होते. त्याच्याआधी त्या दोघांची भेटही झाली होती. याचे पुरावे पोलिसांकडे असतानाही अद्याप यांना अटक का झालेली नाही. तर अटक न करता बेलसाठी ते अर्ज करत आहेत. यामुळे या प्रकरणात पोलिसांनी योग्य तपास करावा, दखल घ्यावी आणि फरार असणाऱ्या सुधाकर घारे आणि भरत भगत यांना अटक करावी अशी मागणी केली आहे.
दरम्यान रायगड पोलीस अधीक्षक आँचल दलाल यांनी पत्रकार परिषद घेवून या प्रकरणाची माहिती दिली होती. त्यांनी, या हत्येचा मुख्य सूत्रधार रवींद्र देवकर असून, त्याने इशा पापा शेख हिच्यामार्फत कॉन्ट्रॅक्ट किलरना सुपारी दिली होती. ज्यात आदिल मुखत्यार शेख, खालीद खलिल कुरेशी आणि एकाचा समावेश असल्याचे सांगितले होते.
तर या प्रकरणात देवकर याने २० लाख रुपयांची सुपारी दिल्याचेही तपासात निष्पन्न झाल्याचे त्यांनी सांगितले होते. तर आर्थिक व्यवहार, मोबाईल कॉल डिटेल्स आणि आरोपींच्या जबाबांच्या आधारे हा संपूर्ण पूर्णतः पूर्वनियोजित असून राजकीय वादातून हत्या झाल्याचे उघडकीस येत असल्याचेही त्यांनी सांगितले होते. आरोपींनी अनेक दिवस मंगेश काळोखे यांच्या हालचालींवर लक्ष ठेवत रेकी केली आणि योग्य संधी साधून हा हल्ला केल्याचेही तपासात उघड झाले आहे.
पण या प्रकरणात गुन्हा दाखल असलेले संशयीत राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे आणि प्रवक्ते भरत भगत यांचा या गुन्ह्यात अद्याप तरी सहभाग आढळून आलेला नाही. पण तपास सुरू असून त्यांचा सहभाग अढळल्यास कारवाई केली जाईल, असेही त्यांनी म्हटले होते. आता गुन्हा दाखल असतानाही त्यांना का अटक होत नाही असा सवाल काळोखे कुटूंबियांनी केला असून पोलिसांच्या तपासावर देखील संशय व्यक्त केला आहे.
Q1. मंगेश काळोखे हत्या प्रकरणाला किती दिवस झाले?
➡️ या प्रकरणाला आज १२ दिवस पूर्ण झाले आहेत.
Q2. आतापर्यंत किती आरोपींना अटक करण्यात आली आहे?
➡️ आतापर्यंत १२ आरोपींना अटक करण्यात आली आहे.
Q3. कोणत्या राजकीय नेत्यांची नावे या प्रकरणात पुढे आली आहेत?
➡️ राष्ट्रवादी काँग्रेसचे सुधाकर घारे आणि भरत भगत यांची नावे समोर आली आहेत.
Q4. काळोखे कुटुंबियांचा मुख्य आक्षेप काय आहे?
➡️ ठोस माहिती असूनही काही आरोपींना अटक न झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
Q5. कुटुंबियांची प्रमुख मागणी काय आहे?
➡️ निष्पक्ष आणि पारदर्शक तपास करून सर्व दोषींवर कठोर कारवाई करावी.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.