
BJP Vs Shivsena UBT : सरकारविरोधात आंदोलन करताना, भाजपच्या कार्यालयात जाण्याची गरज काय होती? मी शहरात नव्हतो, नाही तर त्यांना पायसुध्दा ठेऊ दिला नसता. यापुढे अंबादास दानवे यांची दादागिरी खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा भाजप आमदार संजय केणेकर यांनी दिला. केणेकर यांच्या या इशाऱ्यानंतर 'उबाठा' आणि भाजप पुन्हा एकदा आमने-सामने येण्याची शक्यता आहे.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वात छत्रपती संभाजीनगर शहरात 'क्या हुआ तेरा वादा' या शीर्षकाखाली महायुती सरकार विरोधात आंदोलन सुरू करण्यात आले. आंदोलनाच्या पहिल्याच दिवशी अंबादास दानवे आणि शिवसैनिकांनी जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले.
त्यानंतर पक्षाच्या मंत्री, आमदार आणि खासदारांना निवेदन देण्याचा कार्यक्रम हाती घेतला. त्यानुसार शिवसैनिक 'क्या हुआ तेरा वादा' अशा घोषणांचे फलक आणि घोषणा देत पायी भारतीय जनता पक्षाच्या गुरुगोविंदसिंगपुरा येथील विभागीय कार्यालयाकडे निघाले. ओबीसी व बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे व भाजपाचे पदाधिकारी कार्यकर्ते या ठिकाणी आधीपासूनच उपस्थित होते.
शिवसैनिक कार्यालयाजवळ येताच भाजपचे पदाधिकारीही 'लबाड लांडग ढोंग करतय' या घोषणा देऊ लागले. यामुळे वातावरण तणावपूर्ण झाले होते. भाजप कार्यालयाबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैणात करण्यात आला होता. पण दानवे यांनी घोषणाबाजी थांबवली आणि ते दानवे, राजू वैद्य, बाळासाहेब थोरात आणि काही निवडक पदाधिकारी भाजपा कार्यालयात गेले.
तिथे उपस्थित मंत्री अतुल सावे यांनी या सर्वांशी सविस्तर चर्चा केली. सावे यांनी त्यांचे निवेदन स्वीकारत या सगळ्यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नावर महायुती सरकारची भूमिका आणि ते करत असलेले काम याची माहिती दिली. पण या सर्व प्रकाराने भाजप बॅकफुटवर आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात ऐकायला मिळाली. यानंतर या वादात आता भाजपकडून आमदार केणेकर यांनी उडी घेतली.
सरकारविरोधात आंदोलन असल्याने मंत्र्यांना निवेदन द्यायला हवे होते. असे असताना भाजपच्या कार्यालयात जाण्याचा संबंध काय? दानवे यांना शहरात दंगल घडवायची काय? असे प्रश्न केणेकर यांनी उपस्थित केले. तसेच दानवे हे पालकमंत्री संजय शिरसाट यांच्याविरोधात पत्रकार परिषद घेऊन बोलतात. मग ते एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या कार्यालयात का जात नाहीत, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.