

ZP Election News : जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते तथा जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांच्यावर त्यांच्याच पक्षातील दोन सदस्यांनी गंभीर आरोप केले आहेत. भाजपला मदत करण्याच्या हेतूने आर्थिक व्यवहार करत आम्हाला अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि आता सभापती पदाच्या निवडणुकीपासून वंचित ठेवल्याचा आरोप कृष्णा पाटील डोणगावकर या सदस्याने केला आहे.
शिवसेना-भाजपला मतदान करू नका हा व्हिप समजू शकतो, पण आपले उमेदवार उभे करून त्यांच्या भांडणाचा फायदा करून घेण्यापासून का रोखले? असा सवालही डोणगांवकर यांनी केला. अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीआधी आमच्या आठ सदस्यांची बैठक ठाण्याच्या महापौर बंगल्यावर एकनाथ शिंदे यांनी घेतली होती.
त्यानंतर तिथे अंबादास दानवे हे एका सदस्याला घेऊन नंतर आले होते. शिंदे यांच्यासोबत अंबादास दानवे यांचीही बैठक झाली होती, असा दावा करत कृष्णा पाटील डोणगावंकर यांनी खळबळ उडवून दिली. दरम्यान, अंबादास दानवे यांनी आपण ठाण्याला सदस्यांसोबत गेलो होता, पण एकनाथ शिंदे यांना भेटलो नाही, असे सांगितले होते. डोणगांवकर यांनी मात्र ते शिंदे यांना भेटले होते, असा दावा केला आहे.
जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत भाजपने बिनविरोध बाजी मारली. त्यानंतर आज झालेल्या चार विषय समित्यांच्या सभापती पदावरही भाजपाने शिताफीने तीन जागा स्वतःकडे राखत एक जागा राष्ट्रवादी काँग्रेसला दिली. या बिनविरोध निवडीमुळे जिल्हा परिषदेवर आता शतप्रतिशत भाजपाची सत्ता स्थापन झाली आहे. अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाच्या निवडी प्रमाणाचे विषय समिती सभापती निवडणुकीतही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून आपल्या सदस्यांना कोणालाही मतदान न करण्यासंदर्भात व्हिप जारी करण्यात आला होता.
परंतू हा आदेश झुगारत कृष्णा पाटील डोणगांवकर यांनी सभापती पदासाठी उमेदवारी अर्ज भरत शिवसेनेचे खासदार संदीपान भुमरे यांची भेट घेत त्यांना मतदान करण्याची गळ घातली होती. परंतु शिवसेनेने प्रतिसाद न दिल्यामुळे अखेर डोणगावंकर यांनी माघार घेतली. पण ही माघार घेत असतांना झेडपी सदस्य संजय निकम यांनी अंबादास दानवे यांच्यावर केलेल्या आर्थिक व्यवहाराच्या आरोपांची री ओढली.
शिवसेना-भाजपमधील भांडणाचा लाभ आपल्या मिळावा, त्यासाठी सगळ्या सदस्यांनी एकत्र राहावे, असे ठरले होते. परंतु अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाच्या वेळी आमचे दोन सदस्य फुटले. आता सभापती पदाच्या निवडीतही कोणालाच मतदान न करण्याचा व्हिप अंबादास दानवे यांनी जारी केला. मुळात हा व्हिप भाजपला मदत व्हावी यासाठीच काढला गेला, असा स्पष्ट आरोप कृष्णा पाटील डोणगांवकर यांनी केला.
28-29 सदस्यांच्या बळावर भाजपाचे सभापती झाले. शिवसेनेचे 21, आमचे 9 एक अपक्ष आणि एक राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा सदस्यही बैठकीला गैरहजर राहिला. मग आमच्या मतदान न करण्याने कोणाला फायदा झाला, तर तो भाजपाला, असे सांगत कृष्णा पाटील डोणगावंकर यांनी अंबादास दानवे यांच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला. सुरूवातीपासून शिवसेना-भाजपामधील भांडणाचा फायदा घेऊन अध्यक्ष, उपाध्यक्ष किंवा सभापती पद मिळवण्याचा प्रयत्न करायचा हे ठरले होते.
अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत जेव्हा व्हिप काढून वेगळी भूमिका घेतली गेली तेव्हा संजय निकम यांनी अंबादास दानवे यांच्यावर आरोप केले होते. तेव्हा मी दानवे यांचा बचाव केला. पण पुन्हा तीच भूमिका सभापती पदाच्या निवडणुकीत अंबादास दानवे यांनी घेतली तेव्हा ती पक्षासाठी आणि निवडून आलेल्या आम्हा सर्व सदस्यांसाठी घातक ठरते हे बघितल्यावर मी अर्ज भरला. मतदान करायचे नसले तरी अर्ज भरून आपल्याला कोणाची मते पडतात किंवा आपल्यातील कोण फुटतं हे स्पष्ट झालं असतं.
पण अर्जच भरू नका, अशी भूमिका आणि मतदान न करण्याचा व्हिप हा निश्चित भाजपला मदतीसाठीच काढण्यात आला होता, याचा पुनरुच्चार कृष्णा पाटील डोणगावकर यांनी केला. एकूणच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील सदस्यांनीच आता नेते अंबादास दानवे यांच्यावर अविश्वास दाखवला आहे.
संजय निकम यांनी 18 कोटी घेतल्याचा आरोप केल्यानंतर आता कृष्णा पाटील डोणगावकर या दुसऱ्या सदस्यानेही भाजपाला मदतीसाठी आर्थिक व्यवहार झाल्याचा आरोप करत अंबादास दानवे यांना टारगेट केल्याचे दिसून आले आहे. अंबादास दानवे यांनी मात्र आमच्याकडे संख्याबळ नसल्यामुळे मतदान प्रक्रियेत भाग घेण्यात अर्थ नव्हता म्हणून व्हीप काढल्याचे म्हटले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.