Shivsena UBT News : मुंबई विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते म्हणून गेली अडीच-तीन वर्ष कार्यकाळ गाजवणारे शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांचा कार्यकाळ 28 ऑगस्ट 2025 रोजी संपला. राज्यातील सत्तांतरानंतर विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते पद शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या अंबादास दानवे यांच्याकडे आले. तेव्हापासून दानवे यांनी विधिमंडळात आपल्या कामाची छाप पाडली. विधिमंडळ अधिवेशन काळात वैविध्यपूर्ण आंदोलनांनी त्यांनी संपूर्ण राज्याचे लक्ष वेधले होते.
मुंबईतील पावसाळी अधिवेशन असो की नागपूरच्या कडाक्याच्या थंडीतील हिवाळी अधिवेशन, सत्ताधाऱ्यांना घाम फोडण्यात अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी आपली भूमिका चोख बजावली. संभाजीनगर- जालना स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून सर्वाधिक मताधिक्याने निवडून येण्याचा रेकॉर्ड अंबादास दानवे यांच्या नावावर आहे. विधान परिषदेत विरोधी पक्ष नेते पदाची संधी मिळाल्यानंतर अंबादास दानवे यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा विश्वास सार्थ ठरवला. शेतकरी, कामगार, मजूर, विद्यार्थी, महिला यांच्यासह आरोग्य, शिक्षण, उद्योग अशा सगळ्याच क्षेत्रातील प्रश्नांना त्यांनी सभागृहात वाचा फोडली.
पोट तिडकिने आणि तितक्याच आक्रमकपणे मांडणी करत दानवे यांनी सभागृह दणाणून सोडल्याचे पहायला मिळाले. (Uddhav Thackeray) नुकतेच पार पडलेले विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन खऱ्या अर्थाने दानवे यांनी गाजवले. विधानसभेत विरोधी पक्षनेते पद नसल्याने दानवे यांनी विरोधी पक्षाची सगळी धुरा आपल्या खांद्यावर वाहिली. अंबादास दानवे यांच्या कार्यकाळ 29 ऑगस्ट रोजी संपला असला तरी विधिमंडळाच्या शेवटच्या अधिवेशनातच त्यांना सरकारकडून निरोप देण्यात आला होता.
निरोप समारंभाच्या भाषणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार या सगळ्यांनीच दानवे यांच्या कामाचे तोंड भरून कौतुक केले. एवढेच नाहीतर देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे यांनी अंबादास दानवे यांना अप्रत्यक्षरीत्या पक्षात येण्याची ऑफरही दिली. तर उद्धव ठाकरे यांनी निष्ठा अशाच कायम ठेवा, असा सल्ला दानवे यांना दिला होता. माध्यमांशी बोलताना मात्र अंबादास दानवे यांनी 'मी पुन्हा येईन, पण कोणत्या मार्गाने हे सांगता येत नाही', असे म्हणत सगळ्यांनाच धक्का दिला होता.
आज मात्र उद्धव ठाकरे यांची सदिच्छा भेट घेतल्यानंतर विरोधी पक्षनेते पदाचा कार्यकाळ संपला असला तरी पक्षाचे काम यापुढेही आपण जोमाने करणार, असल्याचा शब्द दानवे यांनी पक्षप्रमुखांना दिला. विरोधी पक्षनेते पदाची जबाबदारी सोपवल्याबद्दल त्यांनी उद्धव ठाकरे यांचे आभारही मानले. आता अंबादास दानवे उद्धव ठाकरे यांना दिलेल्या शब्दाला जागतात? की मग पुढील राजकीय वाटचाल सुकर करण्यासाठी सत्ताधारी पक्षाने दिलेल्या ऑफरचा गांभीर्याने विचार करतात, हे येणारा काळच ठरवेल.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.