
Maharashtra Assembly Winter Session : हिवाळी अधिवेशनात राज्यातील कायदा व सुव्यवस्था आणि वाढती गुन्हेगारी यावर पहिल्या दिवसापासून चर्चा होत आहे. बीड जिल्ह्यातील अपहरण, खंडणी आणि खूनाच्या घटना आणि परभणी शहरात डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील संविधानाच्या प्रतिकृतीची झालेली विटंबना या घटनांनी राज्यातील वातावरण तापले आहे. अशातच (Amit Deshmukh) काँग्रेसचे आमदार अमित देशमुख यांनी आपल्या लातूर शहर मतदारसंघातील वाढत्या गुन्हेगारीकडे सभागृहाचे लक्ष वेधले.
गेल्या काही दिवसात लातूरमध्ये घडलेल्या गुन्हेगारी घटनांचा उल्लेख सभागृहात करत अमित देशमुख यांनी राज्यातील कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असल्याचे आपल्या भाषणात सांगितले. (Latur) लातूर जिल्ह्यात लातूर येथील एका खाजगी रुग्णालयात काम करणाऱ्या बाळू डोंगरे या तरुणाचा मागच्या आठवड्यात खून झाला, त्याच्या मारेकऱ्यांना अद्याप अटक झालेली नाही.
त्यांना अटक करावी अशी मागणी करतानाच मागच्या सहा महिन्यात लातुरात अनेक खून, दरोडे, हत्येच्या घटना घडल्याचे अमित देशमुख यांनी सांगितले. लातूरची प्रमुख बाजारपेठ असलेल्या गंजगोलाई परिसरात ऑक्टोबर महिन्यात दोन दिवसात मोहसीन सय्यद आणि पैगंबर हाजीमलंग या दोन तरुणांचे खून झाले. दोन वर्षांपूर्वी बाभळगाव येथे बशीर शेख या शेतकऱ्याचा खून झाला होता, या शेतकऱ्याच्या मारेकऱ्याचा अद्याप शोध लागलेला नाही.
वारंवार घडणाऱ्या गंभीर गुन्ह्यांचा व्यवस्थित तपास होत नसल्यानेच गुन्हेगारांचे मनोबल उंचावून गुन्ह्याच्या घटनात दिवसेंदिवस वाढ होत आहे. ही बाब अत्यंत चिंताजनक असल्याचे सांगून सरकारने याबाबत गंभीर दखल घेऊन अवैध व्यवसाय, व गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी उपाय योजना आखाव्यात, अशी मागणी यावेळी अमित देशमुख यांनी केली. बीड,परभणी, लातूरसह मराठवाड्यात आणि संपूर्ण महाराष्ट्रातच आलिकडच्या काळात ज्या घटना घडल्या आहेत, त्यामुळे राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेसामोर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
प्रगत, पुरोगामी महाराष्ट्राच्या दृष्टीने ही बाब अत्यंत चिंताजनक आहे. नव्याने सत्तारूढ झालेल्या सरकारने या संदर्भात त्वरित कार्यवाही करावी, गुन्हेगारांना कठोर शासन मिळेल हे पहावे. महाराष्ट्रात पुन्हा भयमुक्त, चिंतामुक्त सुरक्षिततेचे वातावरण निर्माण करावे, अशी मागणी देशमुख यांनी विधानसभेती आपत्कालीन विषयावरील चर्चेत सहभागी होतांना केली.
तत्पुर्वी भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेत अवमान केल्याच्या प्रकाराचा विधानभवन परिसरात महाविकास आघाडीच्या वतीने निदर्शने करत निषेध करण्यात आला. यात अमित देशमुख यांनी सहभागी होत डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचा आत्मा आहेत, देशाचा विवेक आहेत, त्यांचा अपमान म्हणजे संपूर्ण देशाचा अपमान आहे, आम्ही तो कदापीही सहन करणार नाही अशा घोषणाही अमित देशमुख यांनी दिल्या.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.