Shivsena Political News : डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठावाडा विद्यापीठ परिसरात वर्षानुवर्षे इतिहासाची साक्षीदार म्हणून उभी असलेली पुरातन मंदिरे, बारव व इतर ऐतिहासिक ठिकाण अतिक्रमण ठरवण्यात आली आहे. विद्यापीठ प्रशासनाने ही सर्व धर्मांची अतिक्रमे काढण्याच्या हालचाली सुरु केल्या आहेत. यावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते तथा विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी टीका केली आहे. तथाकथित हिंदुत्ववाद्यांच्या छत्रछायेत विद्यापीठाची औरंगजेबी वृत्ती, असे म्हणत दानवे यांनी या कारवाईला विरोध दर्शवला आहे.
या संदर्भात केलेल्या ट्विटमध्ये अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी संताप व्यक्त केला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या आवारात ओरछा नरेश महाराजा पहाडसिंग यांच्या काळात बांधली गेलेली साधारण तीनशे वर्षे जुनी मंदिरे अतिक्रमण ठरवून ती पाडण्याचा घाट विद्यापीठ आणि स्थानिक प्रशासनाने घातला आहे. विशेष म्हणजे ही मंदिरे विद्यापीठाच्या स्थापनेच्या पूर्वीची आहेत, हे आजच्या सो-कॉल्ड हिंदुत्ववादी राज्यकर्त्यांना, विद्यापीठाला माहिती नाही काय ?
शिंदे-फडणवीस सरकारला ही औरंगजेबी वृत्ती पटते का? सोळाव्या शतकातील गणपती, मारुती आणि भैरवाच्या मूर्ती असलेले तळ्यातले गणपती मंदिर, प्राचीन बारवेच्या काठावर सती शिळा असलेले सती माता मंदिर, शंभर वर्षे जुनी बंगाली बाबाची समाधी, मल्लाव आणि बुंदेल समाजाचे कुलदैवत असलेले पुरातन चतुःशृंगी मंदिर, अशी एकूण नऊ मंदिरे विद्यापीठासाठी जमीन अधिग्रहण करताना महसुली दप्तरात नोंदवली गेली नाहीत, असे सांगून ही पडझड करण्यात येत आहे.
एका अर्थाने औरंगजेबी वृत्तीला पोसण्याचा हा प्रकार आहे. या मूर्ती आणि मंदिरे किती प्राचीन आहेत हे परिसरातील कोणत्याही जुन्या नागरिकाला, एखाद्या इतिहासाच्या विद्यार्थ्याला देखील कळेल अशी आहेत. (Shivsena UBT) समाजाच्या भावना भडकावून काड्या करणाऱ्या लोकांच्या तक्रारीवरून विद्यापीठाने आपापसात बसून एक थातूर-मातूर समिती स्थापन केली आणि ही मंदिरे अतिक्रमण ठरवली गेली. आणि आता ही मंदिरे पाडून या जागा लाटण्याचा डाव विद्यापीठाचा आहे.
विशेष म्हणजे एवढे नावाजलेले राज्य पुरातत्व विभागाचे कार्यालय विद्यापीठ आवारात असताना या समितीत एकही पुरातत्वीय विषयाचा जाणकार नसल्याने विद्यापीठ प्रशासनाच्या हेतूवर शंका येणे साहजिक आहे. मंदिरांभोवीत अतिक्रमण असेल तर मा. उच्च न्यायालयाच्या मार्गदर्शनात ते काढायला कुणाचा आक्षेप असण्याचे कारणच नाही.
पण इतिहासाची साक्ष सांगणारी मंदिरे अशी मुळासकट पाडली जाणे, हे संतापजनक आहे. आपापसात ठरवून अशी इतिहासाची पाडापाडी करता येणार नाही. राज्य पुरातत्व खात्याकडून या मुर्त्या आणि समाध्यांचा काळ विचारात घेऊनच ही कारवाई व्हायला हवी. असे कुणाच्याही मनात येईल ती मंदिरे आम्ही पाडू देणार नाही. महामहीम राज्यपाल महोदय आणि राज्य सरकारने याची दखल घ्यावी, ही विनंती!
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.