Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या आंदोलनाने ज्या अंतरवाली सराटीतून राज्यभरात वणवा पेटवला, त्याच गावातील गावकऱ्यांनी चक्क उद्यापासून (ता.4) सुरु होणाऱ्या बेमुदत उपोषणाला विरोध दर्शवला आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या अंतरवाली सराटी येथील बेमुदत उपोषणाला परवानगी नाकारावी, अशी मागणी करणारे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे.
गावकऱ्यांच्या या भूमिकेने एकच खळबळ उडाली असून उद्याच्या उपोषणाची संपूर्ण तयारी झाल्यानंतर अचानक गावकऱ्यांनीच आता याला विरोध केल्याने पुढे काय होणार? याकडे सगळ्या राज्याचे लक्ष लागले आहे. जिल्हा प्रशासनने उपोषणाला परवानगी देऊ नये, गावात आणि परिसरात जातीय सलोखा बिघडत असल्याचे निवदेनात नमूद करण्यात आले आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
अंतरवाली सराटी गावच्या उपसरपंचासह 5 ग्रामपंचायत सदस्यांनी मनोज जरांगे यांच्या गावातील उपोषणाला उघडपणे विरोध दर्शवला आहे. याबाबतचे निवेदन प्रशासनाला देण्यात आले असून या निवेदनावर 70 गावकऱ्यांच्या सह्या आहेत. गावकऱ्याच्या विरोधानंतर मनोज जरांगे पाटील(Manoj Jarange) काय भूमिका घेतात? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी आरक्षणाच्या मागणीसाठी 29 ऑगस्ट 2023 पासून जनआक्रोश आंदोलन सुरु केले होते. अंतरवाली सराटी या छोट्याशा गावातून सुरु झालेला मराठा आरक्षणाचा लढा जिल्हा, मराठवाडा, राज्यपातळीवर पोहोचला होता. गेल्या सहा-आठ महिन्यात या गावाने मुख्यमंत्री, खासदार, आमदार, केंद्रीय मंत्री, राज्यमंत्री अशा सगळ्याच राजकीय पक्षांच्या गाड्यांचा धुराळा पाहिला.
मुंबईच्या वेशीवर मराठा आरक्षण(Maratha Reservation) आंदोलकांचा जरांगे यांच्या नेतृत्वाखालील मोर्चाची दखल देशभरात घेतली गेली होती. जरांगे पाटील यांच्या या लढ्याला यशही आले होते. स्वतः मुख्यमंत्र्यांनी वाशी येथे मराठा समाजाच्या मागण्या मान्य झाल्याचे पत्र जरांगे यांच्या हाती सोपवले होते. परंतु त्यानंतर अंमलबजावणी लांबली, राज्य सरकारने महाराष्ट्रात मराठा समाजाला स्वतंत्र दहा टक्के आरक्षण जाहीर करत वेगळी भूमिका घेतली.
तेव्हापासून मनोज जरांगे पाटील यांनी लोकसभा निवडणुक संपल्यानंतर म्हणजे चार जून पासून अंतरवाली येथे बेमुदत उपोषण करण्याची घोषणा केली होती. त्यासाठी सगळी तयारी पूर्ण होऊन मोठा मंडप टाकण्यात आला होता. परंतु आज म्हणजे उपोषणाच्या एक दिवस आधीच अंतरवाली सराटी तील गावकऱ्यांनी या उपोषणाला विरोध दर्शवण्याची भूमिका घेतली. आता यानंतर मनोज जरांगे पाटील काय पाऊल उचलतात? याकडे राज्य सरकार तसेच राज्यातील जनतेचे लक्ष लागले आहे.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.