Shivsena News : शिवसेनेचे माजी मंत्री जालन्याचे विद्यमान आमदार अर्जुन खोतकर सपत्नीक तिरुपती बालाजी येथे दर्शनासाठी गेले होते. नवसाला पावणारा देव म्हणून तिरुपती बालाजींची जगभरात ख्याती आहे. कोट्यावधी भाविक व्यंकटरमना गोविंदाचा जयघोष करत दर्शनासाठी येतात, नवस बोलतात आणि तो पूर्ण झाला की तो फेडण्यासाठी येतात. गरीब, श्रीमंत असा भेदभाव इथे नाही. राजकारणीही यात मागे नाहीत.
शिवसेनेचे जालन्याचे आमदार अर्जून खोतकर (Jalna) आपल्या पत्नीसह नुकतेच तिरुपती बालाजीच्या दर्शनासाठी गेले होते. 2024 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत अर्जून खोतकर यांना विजय मिळावा आणि ते आमदार व्हावेत यासाठी त्यांच्या पत्नी सीमा यांनी बालाजीला नवस बोलला होता. 2019 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत अर्जून खोतकर यांना पराभव पत्करावा लागला होता. त्यानंतरची पाच वर्ष खोतकर यांच्यासाठी संघर्ष आणि संकटाची होती.
ईडीचा ससेमिरा, विरोधकांकडून आरोप आणि राजकीय कोंडीचे प्रयत्न या सगळ्या परिस्थितीतून अर्जुन खोतकर आणि त्यांचे कुटुंबिय जात होते. राज्यात शिवसेना (Shivsena) पक्ष फुटला आणि खोतकर यांना एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करावा लागला. उद्धव ठाकरे यांची शिवसेना सोडताना खोतकर यांच्या डोळ्यात अश्रू होते. ओढावलेल्या राजकीय संकटातून बाहेर पडण्यासाठी मनावर दगड ठेवत आपण हा निर्णय घेत असल्याचे खोतकर यांनी तेव्हा म्हटले होते.
खोतकर यांचा हा निर्णय त्यांच्या राजकीय भवितव्यासाठी योग्य ठरला. इकडे खोतकर विरोधकांचे डाव हाणून पाडण्यासाठी झटत होते, तर दुसरीकडे पत्नी सीमा या विधानसभा निवडणुकीतील त्यांच्या विजयासह सगळ्या संकटातून सुखरूप बाहेर पडता यावे, यासाठी धार्मिक अनुष्ठाने आणि तिरुपती बालाजीला नवस बोलत होत्या. 2024 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत पक्षाने खोतकर यांना उमेदवारी दिली आणि ते निवडूनही आले.
बालाजीला बोललेला नवस फळाला आला, सगळं सुरळीत झालं. तिरुपती बालाजाली बोललेला नवसं फेडण्यासाठी अर्जुन खोतकर पत्नी सीमा यांच्यासह तिरुपतीला गेले. नेमका नवसं काय आणि तो फेडायचा कसा? याची बहुदा त्यांना कल्पनाही नव्हती. सीमा खोतकर यांनी 'केशदान' केले आणि हे पाहून खोतकर भारावून गेले.
ईश्वराच्या आदेशाशिवाय झाडाचं पानही हलत नाही असं म्हणतात! विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म असं तुकोबा म्हणतात! भगवान विष्णूंचा अवतार! तिरुपतीचे बालाजी साक्षात इच्छापूर्ती करणारे दैवत! हे विशेष छायाचित्र म्हणजे अनुभूतीचाच साक्षात्कार !! गोविंदा गोविंदा, अशा शब्दात अर्जून खोतकर यांनी पत्नीसोबतचे छायाचित्र पोस्ट करत आपल्या भावना व्यक्त केल्या.
नदीचं समुद्राला मिळणं म्हणजे समर्पण! सर्वस्वाचा त्याग म्हणजे समर्पण! पत्नीधर्माचं खरंखुरं पालन म्हणजेही समर्पण... आणि माझ्या दृष्टीने समर्पणाचं दुसरं नाव म्हणजे 'सीमा' निशब्द, धन्यवाद सीमा असे म्हणत खोतकर यांनी पत्नीच्या त्यागाचा सन्मान केला. पत्नी सोबतच खोतकर यांच्या भाच्यानेही मामाच्या विजयासाठी नवस बोलला होता. त्यानेही केशदान करुन तो फेडला.
मामा आणि भाचा हे नातं तसं रक्ताचच... पण ऐन तारुण्यात एक देखणा युवक मामाचा विजय व्हावा म्हणून सौंदर्याचा त्याग करत तब्बल पाच वर्ष दाढी मिशासह डोक्यावरील केस वाढवितो... प्रेमच ते! स्वप्नपूर्ती होताच योगेश नेही केसदान केले..... त्याचे कौतुक करावे तेवढे कमीच, अशा शब्दात खोतकर यांनी भाचाबद्दलच्या भावना व्यक्त केल्या. सध्या खोतकर कुटुंबाच्या या नवस फेडण्याची राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.