राजकारण हे असे क्षेत्र आहे जिथे दिलेल्या शब्दाला मोठी किंमत असते, महत्त्व असते. विश्वास आणि दिलेल्या शब्दावर गल्ली ते दिल्लीपर्यंतच्या राजकारणात आतापर्यंत मोठे निर्णय झाले आहेत. पण एखादा माजी मुख्यमंत्री आपल्या जिल्ह्यात नगरसेवकांना दिलेला शब्द फिरवतो, तेव्हा मात्र राजकारणात दिलेल्या शब्दावरचा विश्वास उडाल्याशिवाय राहत नाही. नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर नगरपंचायतीमध्ये असा प्रकार घडला आहे.
माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी अर्धापूर (Ardhapur) नगराध्यक्षपदासाठी सव्वा-सव्वा वर्षाचा दिलेला शब्द फिरवल्याने नगरसेवक चांगलेच संतप्त झाले आहेत. शब्द पाळायचा नव्हता, तर दिलाच कशाला? असा सवाल नगराध्यक्षपदासाठी इच्छूक असलेल्या नगरसेवकांनी केला आहे.
अर्धापूर नगरपंचायतीचा नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष ठरवताना सव्वा सव्वा वर्षांचा कालावधी नक्की केला होता. त्याप्रमाणे सव्वा वर्षाचा कालावधी संपल्यानंतर नवीन नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षाची निवड करण्यात येणार होती, पण ती झालीच नाही.
आठ महिन्यांपासून नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष बदलण्याची जोरदार चर्चा सुरू होती. काँग्रेसच्या (Congress) नगरसेवकांनी सतत पाठपुरावा केला होता. आता हा विषय बासनात गेला आहे. निवडणूक (Election) जवळ आली आहे आणि नगराध्यक्ष-उपनगराध्यक्षांचा कार्यकाल संपायला सहा महिने उरले आहेत. त्यामुळे बदल करण्यात येणार नाहीत, असे पक्षनिरीक्षक किशोर स्वामी यांनी नगरसेवकांच्या बैठकीत स्पष्ट केले केल्याची विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे.
अशोक चव्हाण यांनी नगराध्यक्षपदासाठी सव्वा-सव्वा वर्षाचा शब्द दिला होता. हा शब्द फिरवल्याने नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षपदासाठी उत्सुक असलेल्या नगरसेवकांमधून नाराजीचा सूर निघत आहे. नगरपंचायत स्थापनेपासून इथे काँग्रेसची सत्ता आहे. काँग्रेसच्या नगरसेवकांत व पदाधिकाऱ्यांमधील बेबनाव, जनतेच्या कामांकडे दुर्लक्ष या कारणांमुळे नगरसेवकांची संख्या घटत चालली आहे. गेल्या निवडणुकीत काँग्रेसला बहुमत मिळाले होते.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
नगरध्यक्ष -उपनगराध्यक्षपदासाठी इच्छूकांची संख्या जास्त असल्याने या दोन्ही पदाचा कार्यकाळ सव्वा सव्वा वर्षाचा ठरवण्यात आला होता. नगराध्यक्ष छत्रपती कानोडे व उपनगराध्यक्ष यास्मिन सुलतान मुसबीर खतीब यांची 14 फेब्रुवारी 2022 मध्ये निवड झाली होती. या दोन्ही पदाधिकाऱ्यांचा कालावधी मे 2023 मध्ये संपला होता. त्यावेळी ही पदे बदलण्यासाठी नगरसेवकांनी अशोक चव्हाणांना पत्र दिले होते आणि पाठपुरावाही केला होता.
दरम्यान, पक्षाचे प्रभारी किशोर स्वामी यांनी नगरसेवकांची बैठक घेऊन त्यांची बाजू ऐकून अहवाल पाठवला. पण आठ महिने केवळ चालढकल करण्यात आली. शहरातील काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात दोन दिवसांपूर्वी नगरसेवकांची बैठक पक्षाचे प्रभारी स्वामी यांच्या उपस्थितीत घेण्यात आली.
या बैठकीत नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष बदलण्यात येणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले. त्यामुळे नगरसेवकांमध्ये नाराजी आहे. बदल करायचा नव्हता तर आठ महिन्यापूर्वीच सांगायला पाहिजे होते, शब्द पाळायचा नव्हता तर दिला कशाला ? असा संताप आता नगरसेक विचारत आहेत. तर काही नगरसेवकांनी अशोक चव्हाणांच्या उपस्थितीत बैठक घेण्याची मागणी केली आहे.
(Edited by Avinash Chandane)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.