Parbhani Political News : लोकसभा निवडणुकीचे तयारी सुरु असताना राजकीय क्षेत्रातील भेटीगाठी वाढल्या आहेत. पडद्यामागील हालचालींना वेग आला आहे. महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये मित्रपक्षांची संख्या वाढली असली तरी अजूनही मनोमिलन झालेले दिसून येत नाही. वरवर शांतता असली तरी आतून मात्र परस्परांमधील हेवेदावे आणि कुरबुरी आहेत. परिणामी अंतर्गत हालचालींना वेग आला आहे.
अशातच महायुतीतील घटक पक्ष रासपचे आमदार रत्नाकर गुट्टेंनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते माजी आमदार विजय भांबळेंची भेट घेतली. त्यामुळे राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे.
महायुतीपासून गुट्टे दूरच
भारतीय जनता पक्ष, शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी अजित पवार गट हे प्रमुख पक्ष असलेल्या महायुतीमध्ये राष्ट्रीय समाज पक्ष हा घटक पक्ष आहे. महायुतीमधील जागावाटप अद्याप बाकी असताना रासपचे अध्यक्ष महादेव जानकर (Mahadev Jankar) यांनी परभणी लोकसभा लढवणार असल्याचे जाहीर केले. यामुळे महायुतीच्या नेत्यांपुढील अडचणी वाढल्याचे बोलले जात आहे.
गंगाखेड विधानसभा मतदारसंघातील रासपचे आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे (Ratnakar Gutte) हे जिल्ह्यातील महायुतीच्या सर्व कार्यक्रमांपासून दूर राहिले आहेत. भाजपचे जिल्हाध्यक्ष संतोष मुरकुटे यांच्याशी असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर गुट्टे महायुतीपासून दोन हात लांबच असल्याचे दिसते. मुरकुटे आणि गुट्टे यांनी जाहीर कार्यक्रमामधून परस्परांवर आरोप केलेत. तसेच गंगाखेड विधानसभा मतदारसंघाची निवडणूक लढवण्याचे दोघांनीही जाहीर केले आहे.
परभणी लोकसभा मतदारसंघ आपल्या पारड्यात पाडून घेण्यासाठी भाजप आणि अजित पवार गटात रस्सीखेच चालू आहे. जिंतूरच्या आमदार मेघना बोर्डीकर (Meghana Bordikar) या भाजपच्या प्रमुख दावेदार आहेत.माजी आमदार विजय भांबळे हे बोर्डीकर यांचे राजकीय प्रतिस्पर्धी आहेत. जिंतूर येथे नुकत्याच झालेल्या रस्ता उद्घाटन कार्यक्रमात ठाकरे गटाचे खासदार संजय जाधव व भांबळेंनी शक्तीप्रदर्शन केले होते. आमदार बोर्डीकर यांनीसुद्धा शक्तीप्रदर्शन करत प्रत्युत्तर दिले होते.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
आता महायुतीपासून लांब असलेले आमदार गुट्टेंनी संभाव्य भाजप उमेदवाराचे राजकीय विरोधक असलेल्या भांबळेंची भेट घेणे अतिशय सूचक आहे. यातच मागील काही काळापासून गुट्टे व संजय जाधव यांच्यातही राजकीय वैमनस्य निर्माण झाले आहे. खासदार जाधव यांनी गंगाखेड येथे काढलेला मोर्चा व जाहीर कार्यक्रमामधून झालेली टोलेबाजी यामधून खासदार जाधव व आमदार गुट्टे यांच्यातील नाराजी उघडपणे समोर आली.
महायुतीच्या जागावाटपात परभणी लोकसभा मतदारसंघ भाजपला मिळाला आणि महादेव जानकर यांनी वेगळी भूमिका घेत निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला, तर जानकरांसाठी अनुकूल वातावरण तयार करण्याचा प्रयत्न या भेटीगाठीच्या माध्यमातून होत असल्याची शक्यता नाकारता येत नाही.
(Edited by Sunil Dhumal)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.