Beed, 20 November : राज्यात हाय व्होल्टेज लढत असलेल्या परळी विधानसभा मतदारसंघात सकाळपासून वेगवान घडामोडी घडत आहेत. बोगस मतदानासाह, मारहाणीचे प्रकार मतदारसंघात घडले आहेत. दरम्यान, परळी वैजनाथ शहरातील सरस्वती विद्यालयातील केंद्राध्यक्ष जालिंदर जाधव यांना सकाळी दहाच्या सुमारास हृदयविकाराचा झटका आला आहे. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. या केंद्रावर राखीव असलेल्या केंद्राध्यक्षांना ती जबाबदारी देण्यात आली आहे.
परळी विधानसभा मतदारसंघात (Parli Assembly Constituency) महायुतीचे उमेदवार धनंजय मुंडे आणि महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार राजेसाहेब देशमुख यांच्यात हाय व्होल्टेज लढत होत आहे. मतदारसंघात आज (ता. 20 नोव्हेंबर) सकाळी सातपासून मतदानाला सुरुवात झाली आहे.
परळीत मतदानाला सुरुवात झाल्यानंतर काही वेळातच शहरातील सरस्वती विद्यालयातील मतदान केंद्रावर असलेले केंद्राध्यक्ष जालिंदर जाधव यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यांना ताबडतोब उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. राखीव असलेल्या कर्मचाऱ्यांना याठिकाणी तत्काळ केंद्राध्यक्ष म्हणून नियुक्ती देण्यात आली आहे. त्यानंतर पुढील निवडणूक (Election) प्रक्रिया सुरू झाली आहे.
बोगस मतदानाचा आरोप
परळी विधानसभा मतदारसंघातील धर्मापुरी आणि शहरातील जलालपूर येथे बोगस मतदान होत असल्याचा आरोप महाविकास आघाडीचे उमेदवार राजेसाहेब देशमुख यांनी केला आहे.
उमेदवार देशमुख म्हणाले, परळी विधानसभेच्या निवडणुकीत प्रशासनाच्या सहकार्याने अनेक ठिकाणी बोगस मतदान होत आहे. तालुक्यातील धर्मापुरी मतदान केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेरे बंद करून, तर परळी शहरातील जलालपूर येथे महिलांना मतदान करू दिले जात नाही. जे मतदान करत आहेत, त्या़ंचे मतदान बघितले जात आहे, असा आरोप मविआचे उमेदवार राजेसाहेब देशमुख यांनी केला.
महायुतीचे उमेदवार धनंजय मुंडे यांच्या कार्यकर्त्यांकडून प्रशासनाच्या सहकार्याने संपूर्ण मतदारसंघात बोगस मतदान प्रक्रिया होत आहे. त्याला तातडीने पायबंद घालावा, याची तक्रार निवडणूक आयोगाकडे करणार असल्याचेही देशमुख यांनी सांगितले.
परळी शहरातील केंद्र क्रमांक १४१, १६८ आणि १७० येथील वेबकास्टचे प्रक्षेपण सकाळी ७ ते १० बंद असल्याची तक्रार निवडणूक आयोगाकडे करण्यात आली आहे. एका बूथवर २०-२० प्रतिनिधी समोरील उमेदवाराचे आहेत, आमचा एक प्रतिनिधी काय करणार, यासाठी आम्ही तक्रार दाखल करत आहोत, असे काँग्रेसचे परळी शहराध्यक्ष बहादूर भाई यांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.