

BJP politics news : महाराष्ट्रात राजकारण आणि क्रिकेट याचा फार जवळचा संबंध आहे. केवळ क्रिकेटच नाही तर कबड्डी व इतर खेळांच्या मैदानातही राज्यातील अनेक दिग्गज नेते आपले कर्तृत्व गाजवताना दिसत आहेत. क्रिकेटच्या मैदानात राजकारण्यांची फटकेबाजी नवीन आहे. क्रिकेटमधील दिग्गज खेळाडूंनाही राजकारणाचे मैदान अनेकदा खुणावते. आज अनेक माजी क्रिकेटपटू दिल्लीच्या संसदेत दिसतात.
त्यामुळे राजकारणी आणि क्रिकेटपटू खेळाडू यांचा एकमेकांच्या क्षेत्रातील शिरकाव हा काही राज्याला आणि देशाला नवीन नाही. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभेचे खासदार शरद पवार यांनी अनेक वर्ष कुस्ती संघटनेचे अध्यक्षपद भूषवलेले आहे. याशिवाय मुंबई क्रिकेट असोसिएशन मध्येही त्यांनी आपल्या राजकीय अनुभवाचा फायदा क्रिकेट खेळाला करून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.
भाजपचे आशिष शेलार यांच्यासह शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, काँग्रेस अशा सगळ्याच राजकीय पक्षांनी मुंबई क्रिकेट असोसिएशनमध्ये पदे भूषवली आहेत. मराठवाड्याची राजधानी असलेल्या छत्रपती संभाजीनगर जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी राज्याचे ओबीसी कल्याण मंत्री अतुल सावे यांची बिनविरोध निवड झाल्याने आणखी एका राजकीय नेत्याचे नाव क्रिकेट क्षेत्राशी जोडले गेले आहे.
यापूर्वी भाजपचेच माजी शहर जिल्हाध्यक्ष शिरीष बोराळकर यांनीही संभाजीनगर जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्षपद भूषवलेले आहे. त्यामुळे राजकारणाचे मैदान गाजवणाऱ्या भाजपच्या स्थानिक नेत्यांनी क्रिकेटचे मैदानही गाजवल्याचे हे पहिले उदाहरण नाही. छत्रपती संभाजीनगरच्या पूर्व विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेल्या अतुल सावे यांच्यावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विशेष मर्जी राहिली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील युती सरकारमध्ये अगदी शेवटच्या सहा महिने अतुल सावे यांना राज्यमंत्रीपद देण्यात आले होते. त्यानंतर 2024 मध्ये अतुल सावे यांची कॅबिनेट पदी बढती करण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विश्वासू सहकाऱ्यांपैकी एक असलेल्या सावे यांच्यावर त्यांनी नुकत्याच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत मोठी जबाबदारी दिली होती. छत्रपती संभाजीनगर महापालिका आणि जिल्हा परिषदेत भाजपची एकहाती सत्ता आणत जिल्ह्याच्या राजकारणात आपणच धुरंधर असल्याचे सावे यांनी दाखवून दिले होते.
राज्यातील 17 विधान परिषदेच्या निवडणुकीमध्येही अतुल सावे यांच्यावर जालना-छत्रपती संभाजीनगर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. शिवसेनेला मागे टाकत अतुल सावे यांनी भाजपला छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात नंबर एकचा पक्ष आणि मोठ्या भावाच्या भूमिकेत नेऊन बसवल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सावे यांचे वजन अधिकच वाढले आहे.
या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी सावे यांची झालेली बिनविरोध निवड जिल्ह्यात क्रिकेट या खेळाला आणि मराठवाड्यातील प्रतिभाशाली खेळाडूंना राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर पोहोचवण्यासाठी निश्चितच महत्त्वाची ठरणार आहे. राजकारणाप्रमाणेच या अध्यक्षपदाच्या माध्यमातून अतुल सावे क्रिकेटचे मैदानही गाजवतील असा विश्वास त्यांच्या समर्थकांना आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.