

Shivsena UBT News : छत्रपती संभाजीनगर-जालना स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात मोठा ट्विस्ट आला आहे. ज्या महायुतीच्या सुहास शिरसाठ यांच्या विरोधात महाविकास आघाडीच्या देवयानी डोणगांवकर लढत देणार होत्या, त्यांनीच ऐनवेळी माघार घेतली. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या क्षणी देवयानी डोणगावकर यांनी आपले पती गंगापूर साखर कारखान्याचे चेअरमन कृष्णा पाटील डोणगावकर यांच्यासोबत जाऊन अर्ज मागे घेतला.
शिवसेना (Shivsena) उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि महाविकास आघाडी पक्षासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. देवयानी डोणगांवकर यांच्या माघारी मागे एक मोठे कारण असल्याचे समोर आले आहे. गंगापूर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन असलेल्या कृष्णा पाटील डोणगांवकर यांना 1 जून 2026 रोजी सहकार विभागाकडून संचालक मंडळ बरखास्त का करण्यात येऊ नये, अशी विचारणा करणारी नोटीस बजावण्यात आली आहे. निवडणुकीतून माघारीसाठी सत्ताधाऱ्यांकडून सहकार विभागाला हाताशी धरून दबावतंत्राचा वापर करण्यात आल्याची चर्चा यानंतर सुरू झाली आहे.
कारखान्याचे चेअरमन कृष्णा पाटील डोणगावकर यांनी स्वतः अशा प्रकारची नोटीस सहकार विभागाकडून आपल्याला प्राप्त झाल्याची कबुली दिली आहे. गंगापूर सहकारी साखर कारखान्याचे संचालक असलेल्या दिलीप बनकर यांच्या 8 एप्रिल 2025 रोजी म्हणजेच एक वर्षापुर्वी दिलेल्या तक्रारीची दखल घेत सहकार निबंधक प्रादेशिक सहसंचालक कार्यालय छत्रपती संभाजीनगर यांच्याकडून चेअरमन कृष्णा पाटील डोणगावंकर यांना शेतकरी, सभासद यांच्या पैशाचा गैरवापर केल्या प्रकरणी संचालक मंडळ बरखास्तीची कारवाई का करण्यात येऊ नये? अशी विचारणा करणारी नोटीस पाठवली आहे.
देवयानी डोणगावकर यांच्या विधान परिषदेतील निवडणुकीतून माघार घेण्यामागे सहकार विभागाने पाठवलेली ही नोटीसच कारणीभूत असल्याचे बोलले जात आहे. पंधरा दिवसात या नोटीसीबाबत खुलासा करण्यास गंगापूर साखर कारखान्याचे चेअरमन कृष्णा पाटील डोणगावकर यांना सांगण्यात आले आहे.
काय आहे प्रकरण?
गंगापूर सहकारी साखर कारखान्याचे संचालक असलेल्या दिलीप बनकर पाटील यांनी केलेल्या तक्रार अर्जानुसार 2024 मध्ये झालेल्या संचालक मंडळाच्या निवडणुकीनंतर कृष्णा साहेबराव पाटील डोणगावकर हे अध्यक्ष झाले. नवीन संचालक मंडळाने 24 फेब्रुवारी 2023 रोजी पदभार स्वीकारला. कारखान्याच्या संचालक मंडळाला दैनंदिन व्यवहारात कुठल्याही प्रकारचा हस्तक्षेप करण्याचा अधिकार नाही, असे स्पष्ट असताना कृष्णा पाटील डोणगावकर यांनी अनेक दैनंदिन व्यवहारांमध्ये आर्थिक गैरव्यवहार, भ्रष्टाचार तसेच कारखान्याचे पोट नियम धाब्यावर बसून व्यवहार केल्याचे बनकर पाटील यांनी आपल्या तक्रारीत नमूद केले.
संचालक मंडळ आणि कारखान्याच्या सर्वसाधारण सभेत उपस्थित केलेल्या मुद्द्यांची नोंद न घेता चर्चा न करता त्यांच्या सोयीनुसार उशिरा सभा वृत्तांत लिहला जातो, अशा प्रकारचा आरोप या तक्रारीत करण्यात आला. या तक्रारींची चौकशी करून त्यासंबंधीचा अहवाल सहकार विभागाला सादर करण्यात आला. यात गंगापूर सहकारी साखर कारखान्याकडे ज्या सभासद, शेतकरी यांनी रक्कम जमा करून डीआरएटी न्यायालयात जमा केली, त्याच मुद्दल रकमेवरील व्याजाच्या प्रित्यर्थ आयकर कपात करण्यात आला होता.
त्या रकमेच्या अनुषंगाने कारखान्याकडून आयकर विवरणपत्र दाखल करून 1 कोटी 47 लाख 50 हजार 101 इतक्या रकमेचा परतावा मिळवण्यात आला होता. ही रक्कम ज्या सभासद, शेतकरी यांनी जमा केलेल्या मुद्दल रकमेवरील व्याजाच्या रकमेपोटी कपात करून देण्यात आली होती ती कारखान्याच्या मालकीची नसते. दरम्यान, कृष्णा पाटील डोणगावकर यांनी गंगापूर पोलीस स्टेशनमध्ये दाखल केलेल्या गुन्ह्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने विवाहित रकमेच्या अनुषंगाने दिवाणी व फौजदारी न्यायालय गंगापूर यांच्या अंतिम आदेशानंतर निर्णय घ्यावा, असे आदेश दिले होते.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार एसबीआय बँक गंगापूर शाखेत खाते उघडून विवादित रक्कम जमा करण्यात आली. सभासद, शेतकरी यांनी जमा केलेल्या मुद्दल रकमेवरील व्याज अदा करताना कपात करण्यात आलेली रक्कम दिवाणी व फौजदारी न्यायालय गंगापूर येथे जमा असलेल्या रकमेचाच भाग आहे हे स्पष्ट होते. सदर रक्कम मदत करणाऱ्या शेतकरी, सभासद यांच्याशी संबंधित असताना कारखान्याने सदर रकमेपैकी 1 कोटी 18 लाख 95 हजार 182 इतकी रक्कम शेतकरी, सभासद यांची परवानगी न घेता परस्पर खर्च केली.
कारखान्याचे स्वत:चे उत्पन्नाचे कोणतेही स्त्रोत नसल्यामुळे संबंधितांना रक्कम परत करता येऊ शकत नाही, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे कारखान्याच्या शेतकरी सभासदांचे मोठे नुकसान झाले आहे. सद्यस्थितीत कारखान्याकडे जमा असलेल्या 28 लाख 54 हजार 918 ही रक्कम देखील कारखान्याकडून खर्च केली जाण्याची शक्यता या अहवालातून वर्तवण्यात आली होती.
उच्च न्यायालयाने विवादित संपूर्ण रक्कम एसबीआय बँकेच्या गंगापूर शाखेत नवे खाते उघडून जमा केली आहे. त्याच रकमेचा भाग असलेल्या रकमेपैकी एक कोटी 18 लाख 95 हजार 182 इतकी रक्कम परस्पर खर्च करत सर्वोच्च न्यायालयाचा आदेश साखर कारखान्याची चेअरमन कृष्णा पाटील यांनी धाब्यावर बसवल्याचा ठपका यात ठेवण्यात आला आहे.
या गैरव्यवहाराची चौकशी करून कारखान्याचे चेअरमन व संचालक मंडळावर कार्यवाही करावी, अशी मागणी तक्रारदाराकडून करण्यात आली आहे. या नोटीसी संदर्भात पंधरा दिवसात खुलासा करून किंवा 24 जून 2026 रोजी सकाळी साडेअकरा वाजता समक्ष सुनावणीसाठी उपस्थित राहावे, असे कारखान्याचे चेअरमन कृष्णा पाटील डोणगावकर यांना नोटीसीद्वारे कळविण्यात आले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.