Chhatrapati Sambhajinagar: विधानसभा निवडणुकीसाठी काल राज्यात सरासरी 65 टक्के मतदानाची नोंद झाली. वाढलेले मतदान भाजपच्या फायद्याचे ठरते, असा दावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना केला. त्यांचा हा दावा किती खरा किती खोटा? हे 23 तारखेच्या निकालानंतर स्पष्ट होणार आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील औरंगाबाद पूर्व या विद्यमान मंत्री अतुल सावे यांच्या मतदारसंघात 60.63% मतदानाची नोंद झाली आहे. अतुल सावे हे गेल्या दोन टर्म पासून पूर्व मतदार संघाचे प्रतिनिधित्व करत आहेत. शिवसेना- भाजप युतीच्या सरकारमध्ये राज्यमंत्री आणि महायुतीच्या सरकारमध्ये कॅबिनेटपदी बढती मिळालेल्या अतुल सावे यांना यावेळी विजयाची हॅट्रीक साधायची आहे. त्यांना एमआयएमचे उमेदवार इम्तियाज जलील यांनी कडवी झुंज दिल्याचे दिसते.
महायुतीविरुद्ध एमआयएम अशी थेट टक्कर असलेल्या पूर्व मतदारसंघांमध्ये वंचित बहुजन आघाडीने ऐनवेळी उमेदवार बदलत मुस्लिम मतांमध्ये फूट पाडण्याच्या उद्देशाने अफसर खान यांना उमेदवारी दिली. याशिवाय एमआयएम मधून बाहेर पडलेले डॉ. गफार कादरी यांनी समाजवादी पक्षाची उमेदवारी मिळवत एमआयएम ला आव्हान दिले. तीन प्रमुख मुस्लिम उमेदवार आणि याशिवाय छोटे-मोठे आणखी 12 मुस्लिम अपक्ष मैदानात असल्याने मतांचे विभाजन मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता आहे.
महायुतीचे अतुल सावे यांच्यासाठी ही जमेची बाजू असली तरी मतदारसंघातील मराठा मतदार निर्णायक भूमिकेत असणार आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा समाजाची महायुतीच्या विरोधात असलेली नाराजी लोकसभा निवडणुकीनंतर कायम आहे.
काँग्रेस महाविकास आघाडीने आधी एम. के. देशमुख यांच्या रूपाने मराठा उमेदवार देत पूर्व मध्ये चुरस निर्माण केली होती. मात्र त्यानंतर अचानक देशमुख यांनी माघार घेतली आणि लहू शेवाळे यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडली. काँग्रेसने तडकाफडकी हा बदल का केला? याबद्दल अजूनही मतदारसंघांमध्ये चर्चा होताना दिसते.
इम्तियाज जलील यांनी निवडणुकीपूर्वी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची अंतरवाली सराटीत जाऊन भेट घेतली होती. याशिवाय मराठा आरक्षणाच्या त्यांच्या मागणीला एमआयएम चा पूर्ण पाठिंबा असल्याचे जाहीर केले होते.
निवडणूक प्रचारा दरम्यान मनोज जरांगे पाटील यांच्या पाठिंब्याच्या अटीनुसार शपथपत्र लिहून देत निवडून आल्यानंतर मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आवाज उठवण्याची हमी इम्तियाज जलील यांनी जाहीर सभेतून देत मराठा मतदारांना साथ घातली होती. त्यांच्या या सादेला मनोज जरांगे पाटील आणि मराठा समाजाची साथ मिळाली का? हे निवडणूक निकालानंतर स्पष्ट होईल.
इम्तियाज यांना एकूण मुस्लिम मतांच्या 60 ते 70 टक्के मतदान झाल्याचा दावा केला जात आहे. तो जरी खरा मानला तरी इम्तियाज जलील यांच्या विजयाचे गणित जुळून येणे कठीण दिसते. त्यांना मराठा, ओबीसी मतदारांची काही प्रमाणात का होईना साथ मिळाल्याशिवाय पूर्व मध्ये पतंगाला हवा मिळणे अवघड आहे. दुसरीकडे अतुल सावे यांची मदार भाजपचा बेस असलेला ओबीसी मतदारांवर आहे. मात्र सावे यांनाही विजयासाठी मराठा मतदान काही प्रमाणात होणे आवश्यक आहे.
एकूणच पूर्व विधानसभा मतदारसंघामध्ये मराठा मतदार किंगमेकर च्या भूमिकेत असणार आहे. महाविकास आघाडीचे लहू शेवाळे यांनी ही निवडणूक किती गांभीर्याने घेतली? याबद्दल शंका उपस्थित केल्या जात आहेत. ऐनवेळी एम.के. देशमुख यांची उमेदवारी रद्द करून त्यांच्या गळ्यात माळ पडल्यामुळे आपल्याला पक्षाकडून मिळालेले हे सरप्राईज गिफ्ट असल्याचे शेवाळे सांगतात.
महायुतीच्या विरोधात राज्यभरात महाविकास आघाडी हा प्रमुख पक्ष असताना पूर्व मध्ये मात्र महाविकास आघाडीचे अस्तित्व फारसे जाणवली नाही. याउलट एमआयएम विरुद्ध महायुती अशी थेट लढत इथे झाल्याचे पाहायला मिळते.
मतदानाच्या टक्का उत्साहवर्धक नसला तरी पूर्व मध्ये अटीतटीचा सामना निश्चित मानला जात आहे. काल सायंकाळी मतदान संपल्यानंतर अतुल सावे आणि इम्तियाज जलील या दोन्ही उमेदवारांची देहबोली आणि त्यांच्या चेहऱ्यावरील हावभाव हे निवडणूक निकालाची अस्पष्टता दर्शवणारे होते.
पूर्व मतदारसंघांमध्ये मतदाना दरम्यान शिवाजीनगर भागात इम्तियाज जलील आणि भाजपच्या जालिंदर शेंडगे व इतर पदाधिकारी कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला. हा प्रकार वगळता पूर्व मध्ये मतदान शांततेत पार पडले. भाजप आणि एमआयएम या दोन्ही पक्षांनी आपापल्या वोट बँक राखल्या असल्या तरी आमदार होण्यासाठी त्यांना मराठा मतदारांची साथ मिळणे गरजेचे आहे.
मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी अनेक मतदारसंघामध्ये पाडापाडी तर काही ठिकाणी पाठिंब्याची भूमिका जाहीर केली होती. पूर्व विधान मतदार संघामध्ये त्यांनी नेमकी काय भूमिका घेतली? हे निवडणूक निकालानंतरच स्पष्ट होईल.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.