Sillod Assembly Election 2024 : मतदानाचा वाढलेला टक्का कोणाच्या पथ्यावर? सत्तार की बनकर

Abdul Sattar Vs Suresh Bankar: ग्रामपंचायतची निवडणूक लढवावी त्या पद्धतीने सत्तार यांनी संपुर्ण यंत्रणा राबवल्याचे बोलले जाते. साम-दाम-दंड भेद अशा राजकारणासाठी ओळखल्या जाणाऱ्या सत्तार यांच्या या रणनीतीला महाविकास आघाडीकडून हिंदू विरुद्ध मुसलमान असा रंग देण्यात आला.
Abdul Sattar, Suresh Bankar
Abdul Sattar, Suresh BankarSarkarnama
Published on
Updated on

Chhatrapati Sambhajinagar : सिल्लोड-सोयगाव विधानसभा मतदारसंघात 80 टक्के एवढे रेकॉर्ड ब्रेक मतदान झाले. 2019 च्या तुलनेत हे प्रमाण पाच टक्क्यांनी वाढलेली दिसते. आता मतदानाचा वाढलेला हा टक्का कोणाच्या पथ्यावर पडतो? यावर मतदारसंघात चर्चा झडू लागल्या आहेत. शिवसेनेचे मंत्री व गेल्या तीन टर्म पासून सिल्लोडचे प्रतिनिधित्व करणाऱ्या अब्दुल सत्तार विरुद्ध शिवसेना महाविकास आघाडीचे सुरेश बनकर यांच्यामध्ये इथे जोरदार टक्कर झाल्याचे दिसते.

निवडणुकीच्या सुरुवातीपासून अब्दुल सत्तार यांच्या विरोधात मतदारसंघामध्ये वातावरण तयार व्हायला सुरुवात झाली होती. लाडकी बहीण योजना सुरू झाल्यानंतर सत्तार यांच्या वतीने गावोगावी महिलांना साड्या वाटप करण्यात आले होते. मात्र काही गावांमध्ये या साड्यांची होळी करण्यात आली तेव्हापासून सिल्लोड- सोयगाव मतदारसंघांमध्ये परिवर्तनाचे वारे वाहत असल्याच्या चर्चांना उधाण आले होते.

पंधरा दिवसाच्या प्रचारामध्ये अब्दुल सत्तार आणि सुरेश बनकर यांनी एकमेकांवर टोकाची टीका केली. आता प्रत्यक्ष निकालाच्या दिवशी काय घडणार? याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष आहे. सकाळी मतदानाला सुरुवात झाल्यापासूनच सिल्लोड मध्ये उत्साहाचे वातावरण होते. सकाळी पहिल्या टप्प्यात नऊ वाजेपर्यंतच 10.28% मतदानाची नोंद झाली होती. हा आकडा पुढे प्रत्येक टप्प्यात दुपटीने वाढत गेला.

Abdul Sattar, Suresh Bankar
Right to Vote : घरात पत्नीचा मृतदेह, पतीने बजावला मतदानाचा हक्क, मुलीनं केले आईच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार

अकरापर्यंत 26.28, एक वाजेपर्यंत 43.85 दुपारी तीन पर्यंत 57.63% टक्के तर सायंकाळी पाच वाजता ही आकडेवारी 70.46 टक्क्यांवर पोहोचली. पाच वाजेपर्यंतच मतदानाचा आकडा 71% पर्यंत पोहोचल्यामुळे गेल्या विधानसभा निवडणुकीतील 75 टक्के मतदानाचा रेकॉर्ड यावेळी मोडणार याची कल्पना आली होती. सहा पर्यंतची आकडेवारी जेव्हा समोर आली तेव्हा 80 टक्के इतक्या रेकॉर्ड ब्रेक मतदानाची नोंद झाली होती.

गेल्या निवडणुकीच्या तुलनेत वाढलेले पाच टक्के मतदान नेमके कोणाच्या बाजूने आहे? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. सिल्लोड मतदारसंघात काल दिवसभर मतदान शांततेत पार पडले मात्र शेवटच्या टप्प्यात पाच ते सहाच्या दरम्यान महाविकास आघाडीचे उमेदवार सुरेश बनकर यांना सिल्लोड मधील दोन मतदान केंद्रावर धक्काबुक्की करत मारहाण झाल्याचा प्रकार घडला. मात्र याचा परिणाम मतदानावर होण्याची शक्यता नव्हती. कारण मतदान संपण्यासाठी अवघे काही मिनिटं शिल्लक राहिले होते.

Abdul Sattar, Suresh Bankar
Gautam Adani News: गौतम अदानींवर अमेरिकेत गुन्हा दाखल होताच अदानी कंपन्यांचे शेअर्स गडगडले...

सिल्लोड विधानसभा मतदारसंघांमध्ये यावेळी अनेक राजकीय घडामोडी घडल्या. जालना लोकसभा मतदारसंघात महायुती असताना अब्दुल सत्तार यांनी भाजपच्या रावसाहेब दानवे यांचे विरोधात काम करत काँग्रेस महाविकास आघाडीच्या कल्याण काळे यांना केलेली मदत त्यांच्यासाठी विधानसभा निवडणुकीत डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी सिल्लोड मध्ये बनकर यांच्या प्रचारासाठी घेतलेल्या सभांमधून अब्दुल सत्तार यांच्या दडपशाही आणि गद्दारीच्या मुद्द्याला हवा देत वातावरण निर्मिती केली होती. उद्धव ठाकरे यांच्या सभेला झालेल्या गर्दीतून मतदार संघात सत्तारांच्या विरोधात असलेल्या सुप्त लाटेची चाहूल लागली आहे. परंतु कुठलीही निवडणूक सहजपणे न घेणाऱ्या अब्दुल सत्तार यांनी दोन दिवसात मतदारसंघातील चित्र आपल्या बाजूने वळवल्याचा दावा केला जात आहे.

ग्रामपंचायतची निवडणूक लढवावी त्या पद्धतीने सत्तार यांनी संपुर्ण यंत्रणा राबवल्याचे बोलले जाते. साम-दाम-दंड भेद अशा राजकारणासाठी ओळखल्या जाणाऱ्या सत्तार यांच्या या रणनीतीला महाविकास आघाडीकडून हिंदू विरुद्ध मुसलमान असा रंग देण्यात आला. हा रंग मतदारांवर किती प्रभाव करणारा ठरला? हे 23 तारखेच्या मतमोजणीनंतर स्पष्ट होणार आहे.

एकूणच काल झालेल्या सर्वाधिक 80 टक्के मतदानानंतर दोन्ही उमेदवारांची धाकधूक नक्कीच वाढली आहे. निवडणुकीआधी अमुक उमेदवार विजयी होणार यावर पैसा लावणारे कार्यकर्तेही काल झालेल्या मतदानानंतर चक्रावून गेले आहेत. सिल्लोड सोयगाव विधानसभा मतदारसंघातून कोण विजयी होईल? हे ठामपणे आजही कोणी सांगू शकत नाही यावरून सिल्लोड मतदारसंघातील लढत किती अटीतटीची झाली याची कल्पना येते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com