
Beed News : 1962 पासून आतापर्यंत झालेल्या विधानसभेच्या 13 सार्वत्रिक निवडणुकीत जिल्ह्यातून 89 आमदार विधीमंडळात पोहोचले. यात दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे व दिवंगत लोकनेत्या डॉ. विमल मुंदडा यांनी पाच वेळा आमदार म्हणून विधानसभेला विजय मिळविला. सलग पाच वेळा विजयाचा विक्रम डॉ. मुंदडा यांनाच करता आला.
विधानसभेच्या 14 व्या सार्वत्रिक निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. आतापर्यंत 13 विधानसभा निवडणुकींतून जिल्ह्यातून 89 आमदार विधीमंडळात पोचले. पुर्वी रेणापूर, बीड, आष्टी, केज, चौसाळा, माजलगाव आणि गेवराई असे सात विधानसभा मतदारसंघ होते. 2009 साली विधानसभा मतदारसंघांच्या (Vidhan Sabha Election) पुनर्रचनेत रेणापूर विधानसभा मतदार संघ रद्द होऊन परळी विधानसभा मतदारसंघाची निर्मिती झाली. तर, चौसाळा विधानसभा मतदारसंघातील काही भाग केज मतदारसंघात सामाविष्ट होऊन चौसाळा विधानसभा मतदारसंघही रद्द झाला. त्यामुळे जिल्ह्यात आता परळी, केज, माजलगाव, गेवराई, बीड व आष्टी हे सहा विधानसभा मतदारसंघ आहेत.
दरम्यान, दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे (Gopinath Munde) यांनी रेणापूर विधानसभा मतदारसंघातून पाच वेळा विधानसभेत पाऊल ठेवले. मात्र, 1978 साली जनता पक्षाकडून रेणापूर मतदारसंघातून त्यावेळी निवडणूक लढविलेल्या दिवंगत मुंडेंना काँग्रेसच्या रघुनाथ मुंडेंकडून पराभव पत्करावा लागला. तर 1985 साली भाजपाकडून रिंगणात असताना ते काँग्रेसच्याच पंडितराव दौंड यांच्याकडून पराभूत झाले. मात्र, 1980, 1990, 1995, 1999, आणि 2004 असे पाच वेळा ते विधानसभा निवडणुकींत विजयी झाले. विधीमंडळात विरोधी पक्षनेते, राज्याचे उपमुख्यंत्री म्हणून त्यांनी काम केले. 2009 साली त्यांनी केंद्रीय राजकारणात प्रवेश केला. त्यांनी 2009 व 2014 या दोन लोकसभा निवडणुकांत विजय मिळविला. संसदेत लोकलेखा समितीतही त्यांनी काम केले. 2014 साली केंद्रीय ग्रामविकास मंत्री म्हणून शपथ घेतलेल्या दिवंगत गोपीनाथ मुंडेंचा दुर्दैवी मृत्यू झाला.
तर, सलग पाच वेळा विधानसभा निवडणूक जिंकण्याचा विक्रम दिंवगत लोकनेत्या डॉ. विमल मुंदडा यांनाच करता आला. 1990 साली प्रथम त्या दिवंगत मुंडे यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या उमेदवारीवर केज (अनुसुचित जाती) मतदार संघातून विजयी झाल्या. 1995 सालीही त्या भाजपकडूनच विधीमंडळात पोचल्या. 1998 साली त्यांनी सुरुवातीला काँग्रेसमध्ये प्रवेश केला. तर, 1999 साली राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाल्यानंतर त्यांनी शरद पवारांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यानंतर 1999, 2004 व 2009 असे सलग तीन वेळा राष्ट्रवादी काँग्रेसकडून विधानसभेला विजयी होत विधीमंडळात पोचल्या. सलग पाच वेळा विजयी होण्याचा विक्रम करणाऱ्या दिवंगत डॉ. मुंदडांना आरोग्य, महिला व बालविकास, सार्वजनिक बांधकाम (उपक्रम) अशी मंत्रीमंडळातील महत्त्वाची खाती मिळाली. 2012 साली त्यांचेही अकाली निधन झाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.