Banjara Community : बीडमध्ये बंजारा समाज एकवटला; मोर्चातून शक्ती प्रदर्शन, लोकप्रतिनिधीही मैदानात!
बीडमध्ये बंजारा समाज एकवटून मोठ्या मोर्चातून शक्ती प्रदर्शन केले.
या मेळाव्यात लोकप्रतिनिधीही सहभागी झाले आणि राजकीय वातावरण तापले.
समाजाच्या या एकजुटीमुळे बीड जिल्ह्यातील राजकारण ढवळून निघाले आहे.
March For ST Reservation News : Banjara Community : मराठा समाजाला हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा निर्णय घेत ओबीसीतून आरक्षणाचा मार्ग मोकळा केल्यानंतर राज्य सरकार समोर आता आणखी एक नवे संकट उभे ठाकले आहे. हैदराबाद गॅझेट मधील नोंदीचा आधार घेत बंजारा समाजालाही आदिवासींना मिळणारे एसटी प्रवर्गाचे आरक्षण लागू करा, या मागणीसाठी बीडमध्ये हजारो बंजारा बांधव रस्त्यावर उतरले आहेत.
बीड जिल्ह्यामध्ये बंजारा समाजाची लक्षणीय संख्या लक्षात घेता जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी मोर्चात सहभागी होत बंजारा समाजाच्या मागण्यांना पाठिंबा दर्शवला आहे. आमदार धनंजय मुंडे, (Dhananjay Munde) विजयसिंह पंडित, संदीप क्षीरसागर यांनी मोर्चात हजेरी लावली. विशेष म्हणजे ज्या संदीप क्षीरसागर, विजयसिंह पंडित या आमदारांनी मराठा आरक्षणाच्या मागणीला पाठिंबा जाहीर करत प्रत्यक्ष आंदोलनात आणि मुंबईच्या आझाद मैदानात हजेरी लावली ते लोकप्रतिनिधीही बंजारा समाजाच्या पाठीशी उभे असल्याचे सांगत आहेत.
मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईच्या आझाद मैदानात पाच दिवसांचे बेमुदत उपोषण करून सरकारला हैदराबाद गॅझेट लागू करण्यास भाग पाडले. या गॅजेट मधील नोंदीच्या आधारावर मराठवाड्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा समाज आरक्षणात जाणार असल्याचा दावा जरांगे पाटील यांच्याकडून केला जात आहे. मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) लढा आपण जिंकल्याचे जरांगे पाटील एकीकडे सांगत असले तरी शासनाने काढलेला हैदराबाद गॅझेट संदर्भातला जीआर फसवणूक करणारा असल्याचा आरोप काही मराठा आरक्षणाचे अभ्यासक आणि समन्वयकांकडून केला जात आहे.
तर दुसरीकडे हैदराबाद गॅझेटच्या निर्णयाने ओबीसी आरक्षणाला धक्का पोहोचत असल्याचा आरोप करत नेत्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. रस्त्यावर आणि न्यायालयात लढा देण्याची तयारी सुरू असताना ज्या हैदराबाद गॅझेटचा संदर्भ देत मराठा समाजाला नोंदी नुसार प्रमाणपत्रांचे वाटप आणि ओबीसी मधून सवलती दिल्या जाणार आहेत, तोच नियम बंजारा समाजाला लागू करावा, अशी मागणी गेल्या काही दिवसांपासून जोर धरू लागली आहे.
याच मागणीसाठी काही आंदोलकांनी टोकाचे पाऊल उचलत आपले जीवन संपवल्याचे प्रकारही घडले. त्यातून हा प्रश्न अधिकच चिघळला आहे. राज्याचे प्रमुख मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे वारंवार मराठा समाजाला आरक्षण देताना कुठल्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का बसणार नाही, हे वारंवार स्पष्ट करत असले तरी त्यावर आता कोणी विश्वास ठेवायला तयार नाही. एकीकडे ओबीसी तर दुसरीकडे हैदराबाद गॅजेटच्या आधारावरच एसटीचे आरक्षण मिळावे यासाठी बंजारा आणि इतर समाज आंदोलन करत आहेत.
हैदराबाद गॅझेटनुसार बंजारा समाजाची नोंद आदिवासी म्हणून करण्यात आली आहे. त्यामुळे आदिवासींना मिळणारे एसटी प्रवर्गाचे आरक्षण लागू करा या मागणीसाठी समाजाचे मराठवाड्यात आंदोलन सुरू आहे. आज बीडमध्ये या मागणीसाठी मोठा मोर्चा काढण्यात आला. मराठा आरक्षणासाठी हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा निर्णय सरकारने घेतला तेव्हापासूनच राज्यात ओबीसी आणि त्यानंतर बंजारा, महादेव कोळी व इतर समाजाने आदिवासी आरक्षणासाठी आक्रमक पावित्र घेतला होता.
मराठा आरक्षणाच्या लढ्याचे केंद्रबिंदू ठरलेल्या बीड जिल्ह्यात बंजारा समाजाच्या मोर्चाला मिळालेला प्रचंड प्रतिसाद पाहता हा लढा पुढे व्यापक स्वरूप घेऊ शकतो, असे दिसते. बंजारा समाजाची बीड जिल्ह्यातील लोकसंख्या आणि मतदार संख्या पाहता कुठलाच राजकीय पक्ष या आंदोलनापासून स्वत:ला दूर ठेवू इच्छित नाही. त्यामुळे जिल्ह्यातील ज्या खासदार, आमदारांनी मराठा आरक्षणाला जाहीर पाठिंबा दिला तेच नेते आज बंजारा समाजाच्या मागण्यांसाठी त्यांच्यासोबत असल्याची ग्वाही प्रत्यक्ष मोर्चात सहभागी होऊन देत आहेत.
१. बीडमध्ये बंजारा समाजाने मोर्चा का काढला?
- समाजाच्या हक्कांसाठी आणि एकजुटीचे प्रदर्शन करण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला.
२. या मोर्चात काय विशेष झाले?
- मोठ्या संख्येने समाजबांधव सहभागी झाले आणि शक्ती प्रदर्शन झाले.
३. लोकप्रतिनिधींचा सहभाग होता का?
- होय, अनेक लोकप्रतिनिधी या मोर्चात सहभागी झाले.
४. या मोर्चामुळे काय परिणाम झाले?
- बीडमधील राजकीय वातावरण तापले आणि खळबळ उडाली.
५. समाजाच्या या मेळाव्याचा भविष्यातील राजकारणावर काय परिणाम होऊ शकतो?
- समाजाची एकजूट आणि ताकद आगामी निवडणुकांमध्ये प्रभाव पाडू शकते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.