Beed : भारतीय जनता पक्षाने आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राज्यात तयारीला सुरुवात केली आहे. सर्वाधिक जागा जिंकण्याचे टार्गेट ठेवलेल्या भाजपने बीडच्या जागेबाबत देखील चाचपणी आणि तयारी सुरू केली आहे. उमेदवारीसाठी विविध पर्याय हाती असलेल्या या पक्षाची पहिली पसंती ही मुंडे परिवारच आहे. मात्र, पंकजा मुंडे यांनी ही निवडणूक लढवावी, असा राज्यातल्या भाजप नेत्यांचा आग्रह आहे. बीडची जागा जिंकण्या इतकेच पंकजा मुंडे यांना राज्याच्या वर्तुळातून केंद्राच्या वर्तुळात पाठविण्याचे राज्य भाजप नेत्यांचे नियोजन आहे.
मागील काही लोकसभा निवडणुकांत बीड लोकसभा मतदार संघात भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सरळ लढत झाली आहे. दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत त्यांच्या कन्या डॉ. प्रीतम मुंडे यांनी निवडणूक लढवली आणि मोठ्या फरकाने विजय मिळवला. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत देखील डॉ. मुंडे यांनी राष्ट्रवादीचे बजरंग सोनवणे यांचा मोठ्या फरकाने पराभव केला.
मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र व आरक्षण मिळावे, यासाठीचे आंदोलन, मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण नको म्हणून आंदोलन, धनगर समाजाचे आरक्षणासाठी आंदोलने सुरु आहेत. त्यामुळे भाजपकडून विविधांगाने उमेदवारीबाबत पडताळणी सुरु आहे. दरम्यान, पंकजा मुंडे या भाजपच्या राज्यातील प्रमुख ओबीसी नेत्या आहेत.सहा महिन्यांपूर्वी राज्यात बदललेल्या राजकीय समीकरणानंतर परळी विधानसभेची उमेदवारी कोणाला हा कळीचा मुद्दा असणार आहे. परळीत 2019 साली कृषी मंत्री धनंजय मुंडे व भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांच्यात लढत होऊन ही जागा धनंजय मुंडे यांनी जिंकली होती.
आता नव्या समीकरणात धनंजय मुंडे यांचा पक्ष सत्तेत आल्याने आगामी निवडणुकीसाठी येथे उमेदवार राष्ट्रवादीचा की भाजपचा म्हणजेच धनंजय मुंडे की पंकजा मुंडे, असा मोठा पेच असणार आहे. ज्या पक्षाचा आमदार त्या पक्षाला जागा या साधारण समीकरणानुसार या जागेवर राष्ट्रवादीचा उमेदवार येऊ शकतो. पर्यायाने धनंजय मुंडे चा दावा अधिक प्रबळ मानला जातो.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
विधानसभेला ही जागा धनजंय मुंडे यांना गेल्याने पंकजा मुंडे यांचे काय, असा प्रश्न आहे. त्याचाच तोडगा या लोकसभा निवडणुकीच्या माध्यमातून काढायचा आणि या निमित्ताने पंकजा मुंडेंना राज्याच्या स्पर्धेतून केंद्राच्या वर्तुळात पाठवायचे नियोजन असल्याची भाजमधील राजकीय सुत्रांची माहिती आहे.
खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांच्या जागी आपण लोकसभा निवडणूक लढविणार नाही असे काही महिन्यापूर्वी पंकजा मुंडे यांनी जाहीर कार्यक्रमात सांगितले होते. मात्र, विधानसभेला परळी ऐवजी इतर ठिकाणी उमेदवारी दिली तरी चालेल असा पंकजा मुंडे यांचा प्रस्ताव भाजपचे राज्य नेते कदापी स्वीकारणार नाहीत, असे बोलले जाते. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांना उमेदवारी घेण्याबाबत राज्यस्तरावर आग्रह आहे.
पंकजा मुंडे यांना परळीतील पराभवानंतरच्या चार वर्षांत त्यांना भाजपने विधानपरिषद, राज्यसभा असे कुठलेच संधी दिली नाही. उलट अगदी त्यांचे कार्यकर्ते राहिलेले नेत्यांना संधी देणे पक्षाने पसंत केले. पंकजा यांना भाजपचे राष्ट्रीय सचिव आणि मध्य प्रदेशच्या सहप्रभारीपदी नेमणूक दिली. पण, ऐन निवडणुकीत प्रचारापासून त्या दूर होत्या. पक्षाच्या मुख्य कार्यक्रमांपासूनही त्यांना दूर ठेवले जात आहे. त्यामुळे पंकजा मुंडे यांना आगामी काळात देखील भाजपचा आग्रह मान्य करून लोकसभा निवडणुकीत लढविण्याचा पर्याय स्वीकारणार का? अशी चर्चा सुरू आहे.
(Edited By Roshan More)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.