Beed News : वाल्मिक कराड असलेल्या बीड कारागृहात सगळं एकदम ओक्के : तिन्ही उच्चस्तरीय पथकांकडून क्लीन चीट; कोणतीही अनियमितता नाही!

Beed Jail inquiry: बीड जिल्हा कारागृहातील कथित गैरप्रकारांच्या आरोपांनंतर तीन उच्चस्तरीय पथकांनी तपासणी केली. सूत्रांच्या माहितीनुसार, अनियमितता आढळली नाही. दरम्यान, कारागृहातील फोन कॉल बंद करून प्रत्यक्ष भेटी आणि व्हिडिओ संवादाचे पर्याय ठेवले आहेत.
Beed Jail Walmik Karad .jpg
Beed Jail Walmik Karad .jpgSarkarnama
Published on: 
Updated on: 

नितीन चव्हाण

Marathwada Politics News: बीड येथील मध्यवर्ती कारागृह सध्या चांगलेच चर्चेत आहे. विलास घुले मृत्यू प्रकरणात बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांचा मुलगा सौरव यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी वाल्मीक कराड याने जेलमधून बाहेर फोन केले होते, असा खळबळजनक दावा सोनवणे यांनी केला होता. वाल्मीक कराड आणि इतर दोघांमध्ये यासाठी झालेल्या संभाषणाची ऑडिओ क्लीपच खासदार बजरंग सोनवणे यांनी व्हायरल केली होती.

वाल्मीक कराड आणि त्याच्या जेलमधील साथीदारांना पोलीसांकडून व्हिआयपी ट्रीटमेंट दिली जाते, असा आरोप धनंजय देशमुख, बजरंग सोनवणे यांनी वारंवार केला होता. या संदर्भात बजरंग सोनवणे यांनी थेट देशाचे गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे पत्र पाठवून या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली होती. तुरुंग प्रशासनाने हे सगळे आरोप फेटाळून लावले होते. दरम्यान विलास घुले यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणात खासदार बजरंग सोनवणे यांच्या मुलाला अडकवण्यासाठी वाल्मीक कराड याची ऑडिओ क्लीप बाहेर आल्यानंतर प्रशासनाकडून तीन वेगवेगळ्या उच्चस्तरीय पथकांद्वारे बीड जिल्हा कारागृहाची सखोल पाहणी व चौकशी करण्यात आली.

मात्र, या तिन्ही पथकांनी केलेल्या कसून तपासात कारागृहात कोणताही कट रचल्याचे किंवा कोणतीही अनियमितता अथवा तांत्रिक दोष आढळला नसल्याचा अहवाल दिला असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. काही दिवसांपूर्वी विलास घुले यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणावरून बीड जिल्ह्यात वातावरण चांगलेच तापले होते. या प्रकरणात खासदार बजरंग सोनवणे यांनी पत्रकार परिषद घेत संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड याने कारागृहातून मोबाईलचा वापर करून कट रचल्याचा आणि सोनवणे यांच्या मुलाला गोवण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप केला होता.

या प्रकरणी खासदार बजरंग सोनवणे तसेच धनंजय देशमुख यांनी थेट कारागृह महानिरीक्षकांकडे लेखी पत्र देऊन दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली होती. या तक्रारीनंतर वरिष्ठ पातळीवरून तातडीने सूत्रे हलली. या प्रकरणाची सत्यता पडताळण्यासाठी छत्रपती संभाजीनगर कारागृह अधीक्षक यांच्या दक्षता पथकाने, पुणे येथील विशेष दक्षता पथकाने आणि खुद्द महानिरीक्षक कार्यालयाच्या पथकाने बीड जिल्हा कारागृहात प्रत्यक्ष धडक देत सखोल पाहणी केली. कारागृहाची सुरक्षा व्यवस्था, सीसीटीव्ही कॅमेरे, ॲलन कॉल प्रणाली, कैद्यांच्या भेटी आणि इतर तांत्रिक बाबींची या पथकांनी अत्यंत सूक्ष्मपणे पडताळणी केली.

Beed Jail Walmik Karad .jpg
Supreme Court News: मोठी बातमी: ज्ञानेश कुमारांविरोधात राहुल गांधींची याचिका, सर्वोच्च न्यायालयानं सुनावणी 17 नोव्हेंबरपर्यंत पुढे ढकलली...

विशेषतः वाल्मिक कराडच्या कोठडीवरील १२ हाय-टेक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज आणि इतर दस्तऐवजांची कसून चौकशी करण्यात आली. या तिन्ही स्वतंत्र पथकांनी बीड कारागृहात जाऊन केलेल्या सखोल चौकशीचा अहवाल तयार केला आहे. परंतु, सूत्रांच्या माहितीनुसार, या तिन्ही पथकांच्या तपासात कारागृहातून कोणताही मोबाईलचा गैरवापर झाल्याचे किंवा कोणताही कट रचल्याचे पुरावे किंवा दोष आढळलेला नाही. प्रशासनाकडून यापूर्वीच सर्व आरोप फेटाळण्यात आले होते, आणि आता या उच्चस्तरीय तिन्ही पथकांच्या पाहणीतही कोणतीही त्रुटी निष्पन्न न झाल्याने या प्रकरणाला एक नवीन वळण मिळाले आहे.

​आयजींचा दौरा लांबणीवर?

दरम्यान, या संपूर्ण प्रकरणाची स्वतः पाहणी करण्यासाठी आणि प्रत्यक्ष झाडाझडती घेण्यासाठी राज्याचे विशेष पोलीस महानिरीक्षक (कारागृह) योगेश देसाई हे मागील आठवड्यात बीड जिल्हा कारागृहात भेट देणार होते. मात्र, काही तातडीच्या शासकीय बैठका आणि अपरिहार्य कामानिमित्त झालेल्या व्यस्ततेमुळे त्यांचा हा दौरा होऊ शकला नाही, अशी माहिती खुद्द कारागृह महानिरीक्षक योगेश देसाई यांनी दिली आहे. तिन्ही समिती कडून अहवाल तयार करण्यात आलेला असून सद्यस्थितीला कुठेच दोष नसल्याचे सांगितले आहे. मात्र लवकरच बीड जिल्हा कारागृहाला भेट देऊन पाहणी करणार असल्याची माहिती कारागृह महानिरीक्षक योगेश देसाई यांनी सांगितले आहे.

बीड कारागृहातील सर्व फोन कॉल बंद

​बीड जिल्हा कारागृहातून फोन कॉलच्या माध्यमातून संपर्क साधला जात असल्याच्या चर्चा आणि वादानंतर कारागृह प्रशासनाने सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत कडक पाऊल उचलले आहे. प्रशासनाने कारागृहातील सर्व फोन कॉल पूर्णपणे बंद केले आहेत. ​मागील एक महिन्यापासून कैद्यांच्या नातेवाईकांना किंवा कुटुंबीयांना कैद्यांची भेट घेण्यासाठी केवळ दोनच पर्याय उपलब्ध करण्यात आले आहेत. नियमानुसार यापुढे केवळ प्रत्यक्ष भेटी (मुलाखत) किंवा व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारेच नातेवाईकांना कैद्यांशी संवाद साधता येणार आहे.

Beed Jail Walmik Karad .jpg
Karnataka SIR : काँग्रेसशासित राज्यातच SIR प्रक्रियेदरम्यान 1 कोटी मतदारांना वगळलं : अंतिम मतदार यादी जाहीर

कारागृहाची सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी आणि कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती करागृह अधीक्षक रामराजे चांदणे यांनी दिली. बीड जिल्हा कारागृहाबाबत देण्यात आलेल्या विविध तक्रारींच्या अनुषंगाने तीन समित्यांकडून कारागृहाची चौकशी करण्यात आलेली आहे. या सर्व तपासणीचा अहवाल वरिष्ठांना सादर केला जाईल. मात्र, या चौकशीबाबत किंवा त्याच्या निष्कर्षांबाबत आम्हाला सध्यातरी काहीच सांगण्यात आलेले नाही, असेही चांदणे यांनी स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com