Dhananjay Munde : पंकजाताईंच्या पराभवानंतर धनंजय मुंडेंची पहिलीच प्रतिक्रिया; म्हणाले, "क्या हार मे, क्या जीत में, किंचित नही..."

Dhananjay Munde On Pankaja Munde Defeat : लोकशाहीमध्ये जनतेचा कौल हा महत्त्वाचा असतो अन्...; असंही धनंजय मुंडेंनी म्हटलं आहे.
Dhananjay Munde
Dhananjay Mundesarkarnama

Beed News, 8 June : बीड जिल्ह्यात लोकसभा निवडणूक अत्यंत वेगळ्या वळणावर आणि अनेक मुद्द्यांनी गाजून पार पडली. अतिशय वेगळ्या वातावरणात झालेल्या या निवडणुकीत झालेला पराजय आम्ही मोकळ्या मनाने स्वीकारला; विजयी उमेदवाराचे अभिनंदन सुद्धा केले.

मात्र, अजूनही सोशल मीडियावर जातीवाचक व विविध नेत्यांची अवहेलना करणाऱ्या पोस्ट केल्या जात असून याद्वारे सामाजिक सलोखा बिघडून आपसातील द्वेष व तणाव वाढत आहे. त्यामुळे आपला सामाजिक सलोखा व सौहार्द जपण्याची जबाबदारी आता प्रत्येक बीड जिल्हावासीयांची आहे, असे आवाहन जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे ( Dhananjay Munde ) यांनी केलं आहे.

"'क्या हार मे, क्या जीत में, किंचित नही भयभीत मै..." स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांच्या या कवितेप्रमाणे मी व पंकजाताईंनी अत्यंत जिव्हारी लागणारा हा पराभव मान्य केला आहे. लोकशाहीमध्ये जनतेचा कौल हा महत्त्वाचा असतो आणि तो कौल आपण मान्य करून विजयी उमेदवारास शुभेच्छा देखील दिलेल्या आहेत," असं धनजंय मुंडेंनी म्हटलं.

"मात्र, सोशल मीडियावर अजूनही आमच्यासारख्या नेत्यांचे फोटो आणि बनावट व्हिडिओ पोस्ट करून वातावरण दूषित केले जात आहे. अत्यंत खालच्या भाषेत राजकीय नेत्यांवर टीका करणाऱ्या पोस्ट तसेच जाती-जातीत तेढ निर्माण करणाऱ्या पोस्ट व्हायरल केल्या जात आहेत. महायुती व महाविकास आघाडीच्या दोन्हीकडच्या कार्यकर्त्यांना माझी विनंती आहे, की हे आता थांबलं पाहिजे," असं धनंजय मुंडे म्हणाले आहेत.

"मी बीड जिल्ह्याचा पालकमंत्री असल्याने नियमानुसार मतमोजणी प्रक्रियेत किंवा मतमोजणी केंद्राच्या जवळपास सुद्धा उपस्थित नसताना मी बंदूक काढली किंवा कोणाला मारहाण केली अशा पद्धतीच्या खोट्या पोस्ट जाणीवपूर्वक पेरल्या जात आहेत. या गोष्टीत अजिबात तथ्य नसून या गोष्टी पूर्णपणे खोटारड्या व जाणीवपूर्वक बदनामी करणाऱ्या आहेत. अशा गोष्टी पेरल्याने काय साध्य होणार आहे," असा प्रश्नही धनंजय मुंडे यांनी उपस्थित केला आहे.

Dhananjay Munde
Pankaja Gopinath Munde : संघर्षकन्याच ती! लोकनेत्याच्या लेकीचा संघर्ष काही केल्या संपेना

"350 वर्षांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला 18 पगड जातींना एकत्र घेऊन गावगाडा चालवायची शिकवण दिली. आज त्या शिकवणीपासून परावृत्त न होता, आपला गावगाडा व आपली सामाजिक एकतेची परंपरा अबाधित ठेवणे हे सर्व जिल्हावासीयांचे आद्य कर्तव्य आहे," असंही धनंजय मुंडे यांनी सांगितलं.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com