Pankaja Gopinath Munde : संघर्षकन्याच ती! लोकनेत्याच्या लेकीचा संघर्ष काही केल्या संपेना

Gopinath Munde Daughter Pankaja Munde struggle In Politics : गोपीनाथ मुंडे यांच्या निधनाला या महिन्यात दहा वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यानंतर सत्तेत असो किंवा नसो त्यांच्या कन्या पंकजा मुंडे यांच्या वाट्याला संघर्षच आला.
Pankaja Munde
Pankaja MundeSarkarnama

वडिलांचे छत्र हरवलेली ती गेल्या दहा वर्षांपासून लढते आहे. संघर्ष तिची पाठ सोडायचे नाव काहीकेल्या घेत नाही. कधी पक्षांतर्गत विरोधक तर कधी विरोधक दत्त म्हणून तिच्या समोर उभे राहतात. मी लोकांच्या मनातील मुख्यमंत्री आहे, असे एकदा ती बोलून काय गेली, संकटे तिच्या पाठीमागेच लागली. सर्वांच्या लक्षात आलेच असेल कोण ही संघर्षकन्या? होय, पंकजा मुंडे...!

लोकनेते दिवंगत गोपीनाथ मुंडे(Pankaja Munde) हे अनंताच्या प्रवासाला जाऊन 10 वर्षे झाली आहेत. महाराष्ट्रातील बहुजन समाजात भाजपला रुजवण्यासाठी सर्वाधिक परिश्रम घेतलेल्या मुंडे यांंच्या कन्या पंकजा मुंडे यांना त्यांच्या पाठीमागे संघर्षच करावा लागला आहे. 3 जून रोजी गोपीनाथ मुंडे यांची पुण्यतिथी होती. त्याच्या दुसऱ्याच दिवशी लोकसभा निवडणुकीचा निकाल लागला आणि पंकजा मुंडे यांना निसटता पराभव स्वीकारावा लागला.

Pankaja Munde
Pankaja Munde : कोण म्हणतं पंकजाताई खचल्या? त्या तर पुन्हा स्वारीवर निघाल्या..!

पंकजा मुंडे 2009 मध्ये पहिल्यांदा परळी वैजनाथ मतदारसंघातून विधानसभेत पोहोचल्या. त्यानंतर दोन-तीन वर्षांनी त्यांचे चुलतबंधू धनंजय मुंडे यांनी काका गोपीनाथ मुंडे यांच्या विरोधात बंड केले. धनंजय मुंडे हे गोपीनाथ मुंडे यांचे बोट धरूनच राजकारणात आले होते. वैयक्तिक महत्वाकांक्षा, गोपीनाथ मुंडे यांंच्या विरोधकांकडून मिळालेली फूस, यामुळे त्यांनी काकांच्या विरोधातच दंड थोपटले.

2014 च्या निवडणुकीत पंकजा मुंडे विरुद्ध धनंजय मुंडे(Dhananjay Munde) अशी लढत झाली. पंकजा मुंडे यांनी बाजी मारली. निवडणुकीपूर्वी पंकजा मुंडे यांनी राज्यातील तत्कालीन काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या सरकारविरोधात रान पेटवले होते. त्यांच्या संघर्षयात्रेला मोठा प्रतिसाद मिळाला होता. 2014 मध्ये राज्यात युतीचे सरकार आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये पंकजा मुंडे कॅबिनेट मंत्री झाल्या.

Pankaja Munde
Udayanraje & Pankaja Munde : पंकजाताईंना दिलेला शब्द उदयनराजे पाळणार; राजीनामा देणार का?

गट-तट हे सर्वच पक्षांत असतात. त्याला भाजपही अपवाद नाही. मुंडेंना शेवटी शेवटी पक्षात वेगळे पाडण्याचा प्रयत्न झाला होता. त्यामुळे त्यांनी पक्ष सोडण्याचाही विचार केला होता. सुषमा स्वराज यांनी मध्यस्थी करून मुंडेंचे मन वळवले होते. तत्पूर्वी, 2006 मध्ये भाजपचे दिग्गज नेते प्रमोद महाजन यांचे निधन झाले. खरेतर त्यावेळेसपासूनच गोपीनाथ मुंडे(Gopinath Munde) पक्षात एकाकी झाले होते. 2014 मध्ये मुंडेंनी केंद्रात मंत्रिपदाची शपथ घेतली. त्याच्या काही दिवसांनंतर म्हणजे 3 जून 2014 रोजी त्यांचे दिल्लीत वाहन अपघातात निधन झाले आणि पंकजा मुंडेंचे छत्र हरवले, त्या एकट्या पडल्या.

2014 मध्ये पंकजा मुंडे कॅबिनेट मंत्री तर होत्या, मात्र त्यांना पक्षांतर्गत विरोधकांनी स्थिर राहू दिले नाही. मी जनतेच्या मनातील मुख्यमंत्री आहे, असे त्या एकेठिकाणी बोलून गेल्या. त्यांच्या त्या बोलण्याने त्यांची मोठी अडचण झाली. त्यांच्यावर घोटाळ्यांचे आरोप झाले. त्यावेळी विरोधी पक्षात असलेले त्यांचे चुलतबंधू धनंजय मुंडे यांनी ते आरोप लावून धरले. धनंजय मुंडे यांना ही रसद कुणी पुरवली, हे सर्वांना माहीत आहे. अशा आरोपांद्वारे पंकजा मुंडेंना कोंडीत पकडण्याची रणनीती होती. पक्षांतर्गत विरोधकांनी विरोधी पक्षातील नेत्याला हाताशी धरून हे सगळे घडवून आणले होते, असे आजही सांगितले जाते.

पुढे 2019 च्या निवडणुकीत पंकजा मुंडे यांचा परळी विधानसभा मतदारसंघातून पराभव झाला. हा पराभव त्यांचे चुलतबंधू धनंजय मुंडे यांनीच केला. त्यानंतर पंकजा मुंडे राजकीय विजनवासात गेल्या. भाजपने त्यांचे पुनर्वसन केले नाही. भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या अन्य पक्षांतील नेत्यांना भाजपमध्ये घेऊन महत्वाची पदे देण्यात आली, मात्र पंकजा मुंडे यांच्याकडे दुर्लक्ष करण्यात आले.

पुनर्वसन तर दूरच राहिले, त्यांचा साखर कारखाना कसा अडचणीत आणला जाईल, याचा प्रयत्न अलीकडच्या काळात, म्हणजे महायुतीची सत्ता असताना झाला. लोकसभेची निवडणूक लढवण्यासाठी पंकजा मुंडे इच्छुक नव्हत्या, कारण बीडच्या खासदार त्यांच्या भगिनी प्रीतम मुंडे या होत्या. मात्र सलग दोनवेळा विजयी झालेल्या प्रीतम मुंडे यांना बाजूला सारून भाजपने पंकजा मुंडे यांना बीड लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली.

दरम्यानच्या काळात धनंजय मुंडे हे अजित पवार यांच्यासोबत सरकारमध्ये सहभागी झाले. ते सध्या कॅबिनेटमंत्री आहेत. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांचा पराभव करणारे धनंजय मुंडे लोकसभा निवडणुकीत त्यांच्यासोबत होते. त्यामुळे पंकजा मुंडे यांना विजय निश्चित वाटत होता. त्यांच्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर सभाही घेतली होती. तरीही पंकजा मुंडे यांचा पराभव झाला.

2019 च्या विधानसभा निवडणुकीत धनंजय मुंडे विरोधात होते, 2024 च्या लोकसभा निवडणुकीत ते सोबत होते, या दोन्हीवेळी त्यांचा पराभव झाला. पंकजा मुंडे यांची आता मोठी राजकीय अडचण झाली आहे. सलग दोनवेळा पराभव झाल्यामुळे पक्षाकडून त्यांचे राजकीय पुनर्वसन केले जाण्याची शक्यता कमीच आहे. त्यामुळे लोकनेत्याच्या या कन्येला आणखी किती काळ संघर्ष करावा लागेल, असा प्रश्न त्यांच्या समर्थकांना पडला आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com