Yogesh Kshirsagar : बीड नगरपालिकेच्या सत्तांतरासाठी क्षीरसागर लागेल कामाला, मुंबईत मंत्री पंकजा मुंडे यांच्याशी बंददाराआड चर्चा!

Beed Municipality News : निधी वाटपावरून बीड नगरपालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात दोन गट पडले असून नाराजांचा एक गट बंडाच्या तयारी असल्याची जोरदार चर्चा जिल्ह्यात सुरू आहे.
yogesh Kshrisagar, pankja munde
yogesh Kshrisagar, pankja munde Sarkarnama
Published on
Updated on

नितीन चव्हाण

Beed BJP Politics : बीड नगरपालिकेतील सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नगरसेवकांमध्ये निधी वाटपावरून प्रचंड नाराजी आहे. यातून पक्षात दोन गट पडले असून नाराजांचा एक गट बंडाच्या तयारी असल्याची जोरदार चर्चा जिल्ह्यात सुरू आहे. पालकमंत्री सुनेत्रा पवार यांच्या समोरच नगरसेवकांमधील दोन गटांमधील वाद चव्हाट्यावर आला होता. स्वतः पालकमंत्र्यांनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला.

दरम्यान, या संधीचा लाभ उठवण्यासाठी भाजपाचे स्थानिक नेते योगेश क्षीरसागर आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार संदीप क्षीरसागर सरसावले आहेत. बीड नगरपालिकेतील सत्तांतरासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष म्हणजेच आमदार संदीप क्षीरसागर यांच्यासह सत्ताधारी राष्ट्रवादीतील नाराज नगरसेवकांना सोबत घ्यायचे का? या संदर्भात मुंबईत मंत्री पंकजा मुंडे यांच्याशी योगेश क्षीरसागर यांची चर्चा झाल्याचे बोलले जाते.

बीड नगरपालिकेतील सत्ताधारी गटात पेटलेली वादाची ठिणगी, अंतर्गत कलह आणि नुकत्याच पार पडलेल्या सर्वसाधारण सभेतील तुफान राड्यानंतर बीडचे राजकारण वेगळ्याच वळणावर आले आहे. या राजकीय उलथापालथीचा फायदा उठवत भाजपचे डॉ. योगेश क्षीरसागर आता अ‍ॅक्शन मोडमध्ये आले आहेत. थेट मुंबई गाठत पक्षातील आणि महायुतीतील वरिष्ठ नेत्यांच्या भेटीगाठी त्यांनी सुरू केल्या आहेत.

येत्या काही दिवसात बीडच्या राजकारणात कोणता मोठा ट्विस्ट येतो? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. नगरपालिकेतील सत्तेची विस्कटलेली घडी आणि नगरसेवकांमधील वाढती गटबाजी पाहता, डॉ. योगेश क्षीरसागर यांनी आपल्या निकटवर्तीयांसह मंत्रालयात जाऊन राज्याच्या मंत्री पंकजा मुंडे यांची भेट घेतली.

yogesh Kshrisagar, pankja munde
Beed News : बीड नगरपालिकेत 6 महिन्यातच सत्ताबदलाची चाहूल : क्षीरसागरांच्या 'कमबॅकची' स्क्रिप्ट तयार होतेय

या भेटीत बीड मतदारसंघातील विकासाच्या मुद्द्यांसोबतच नगरपालिकेतील संभाव्य खांदेपालट आणि नव्या राजकीय समीकरणांवर खलबते झाल्याचे समजते. वरिष्ठांचे पाठबळ मिळवूनच बीड पालिकेत 'ऑपरेशन सक्सेस' घडवून आणण्याचा क्षीरसागर यांचा प्रयत्न आहे. सर्वसाधारण सभेत सभापती आणि सत्ताधारी नगरसेवकांमध्ये झालेल्या वादानंतर अनेक असंतुष्ट नगरसेवक आता पर्यायांच्या शोधात आहेत.

हीच योग्य संधी साधून क्षीरसागर यांनी आपल्या राजकीय जाळ्यात असंतुष्ट नगरसेवकांना ओढण्यासाठी चक्र फिरवले आहे. क्षीरसागर बंधूंच्या संभाव्य एकत्र येण्याच्या चर्चांनी या मोहिमेला अधिकच बळ मिळाल्याचे दिसते. योगेश क्षीरसागर यांच्या या राजकीय खेळीला आमदार संदीप क्षीरसागर यांची साथ मिळणार का? हे पाहणेही महत्त्वाचे ठरणार आहे.

yogesh Kshrisagar, pankja munde
Beed News : बीड नगरपालिकेत 6 महिन्यातच सत्ताबदलाची चाहूल : क्षीरसागरांच्या 'कमबॅकची' स्क्रिप्ट तयार होतेय

विजयसिंह पंडितांचे मौन कायम

बीड नगरपालिकेतील सत्तांतराच्या आणि डॉ. योगेश क्षीरसागर यांच्या मुंबई भेटीच्या जोरदार चर्चा सुरू असतानाच, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार विजयसिंह पंडित यांनी मात्र या घडामोडींवर पूर्णपणे मौन बाळगले आहे. पालिकेतील सत्ताधारी गटाची झालेली दुरवस्था आणि संभाव्य बदलांच्या समीकरणांवर आमदार पंडित काय भूमिका घेतात? यावर अनेक घडामोडी अवलंबून आहेत. त्यांची ही शांतता वादळापुर्वीची आहे, की मग ते सत्ता टिकवण्यात यशस्वी ठरतात? याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com