Beed News : बीड नगरपालिकेत 6 महिन्यातच सत्ताबदलाची चाहूल : क्षीरसागरांच्या 'कमबॅकची' स्क्रिप्ट तयार होतेय

Beed Municipality News : सर्वाधिक काळ नगराध्यक्ष म्हणून काम पाहणारे भारतभूषण क्षीरसागर यांच्यानंतरही सुत्रे त्यांच्या कुटुंबाच्याच हाती राहिली. अर्थात त्यांच्याही कारभारावर बीडकर पूर्णपणे समाधानी कधीच नव्हते. परंतु सक्षम पर्याय नसल्याने मतदार त्यांच्याच हाती सत्ता सोपवायचे.
Sandip kshirsagar, Yogesh kshirsagar
Sandip kshirsagar, Yogesh kshirsagarSarkarnama
Published on
Updated on

Beed Municipal Council : बीड नगरपालिकेच्या सत्तेचा लोलक आतापर्यंत क्षीरसागर घराण्याभोवतीच फिरत राहिलेला आहे. पण जिल्ह्यातील बदलती राजकीय समीकरण, नेतृत्वातील बदल, घडणाऱ्या घडामोडी याचा परिणाम शहरातही दिसून आला. सर्वाधिक काळ नगराध्यक्ष म्हणून काम पाहणारे भारतभूषण क्षीरसागर यांच्यानंतरही सुत्रे त्यांच्या कुटुंबाच्याच हाती राहिली. अर्थात त्यांच्याही कारभारावर बीडकर पूर्णपणे समाधानी कधीच नव्हते. परंतु सक्षम पर्याय नसल्याने मतदार त्यांच्याच हाती सत्ता सोपवायचे.

2024-25 ची नगरपालिका निवडणूक त्याला अपवाद ठरली. अजित पवारांच्या बारामती पॅटर्नवर विश्वास ठेवत बीडकरांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सत्ता दिली. पण गेल्या ६ महिन्यातील पक्षाचा कारभार, अंतर्गत गटबाजी पाहता नशिबाने दिलेली सत्ता राष्ट्रवादी आपल्या कर्माने घालवणार? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. एकाच कुटुंबातील पण एकमेकांचे राजकीय विरोधक असलेले आमदार संदीप क्षीरसागर आणि डाॅ. योगेश क्षीरसागर अशा परिस्थितीत डाव टाकण्याची शक्यता नाकारता येत नाही, असेही बोलले जाते.

बीड नगरपालिका ही मराठवाड्यातील सर्वात मोठी नगरपालिका आहे. येथील राजकारण गेल्या 30 वर्षे एकाच म्हणजे क्षीरसागर घराण्याभोवती फिरत होते, पण 2024-2025 च्या निवडणुकीत मोठा बदल झाला आणि 30 वर्षांपासून नगरपालिकेवर वर्चस्व राखून असलेल्या क्षीरसागरांचे संस्थान खालसा झाले.

दिवंगत नेते अजित पवार यांनी सुरुवातीला त्याच घराण्यातील योगेश क्षीरसागर यांना सोबत घेत निवडणूक लढण्याचे ठरवले. पण सर्व उमेदवार मीच ठरवणार, या क्षीरसागर यांच्या भूमिकेला त्यांनी विरोध केला आणि ऐनवेळी योगेश क्षीरसागर भाजपमध्ये गेले. पंकजा मुंडे यांनी ही संधी दवडली नाही. मग अजितदादांनी आमदार विजयसिंह पंडित यांना सोबत घेतले. त्यांच्याकडे सूत्र दिली.

अजित पवार यांनी एकदा नगरपालिका ताब्यात द्या, बीडचा विकास बारामती आणि पिंपरी चिंचवडसारखा करून दाखवतो, असा शब्द दिला. शिवाय बीडचे पालकत्व घेताच त्यांनी अनेक मोठ्या संस्था, विमानतळ, रेल्वे, पाणीपुरवठ्यासाठी निधी, योजना, क्रिडा संकुलाच्या विकासासाठी निधी असा कामाचा झपाटा सुरू केला होता.

हे सगळं बीडकर पाहत, अनुभवत होते. शहराचा चेहरा बदलायचा असेल तर अजित पवारांच्या नेतृत्वाखाली नगरपालिकेची सत्ता त्यांच्या पक्षाला दिली पाहिजे हे ठरवूनच मतदान झाले. निकाल लागला अन् नगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सत्ता आली. दोन्ही क्षीरसागरांना विरोधात बसावे लागले.

सत्तेतील हा बदल सर्वसामान्याच्या दैनंदिन जीवनातही बदल घडवेल हा भ्रम मात्र 6 महिन्यातच तुटला. अजित पवारांच्या दुर्दैवी अपघाती निधनानंतर पक्षाची घडी विस्कटली. सत्ता संघर्ष आणि सर्वसामान्यांच्या हितापेक्षा स्वहिताला महत्व देणाऱ्या सत्ताधारी पक्षातील नगराध्यक्ष आणि नगरसेवकांमध्येच वादावादी, कुरघोडीसारखे प्रकार सुरू झाले.

परिणामी सहा महिने उलटून गेले तरी बीडकरांचे मुलभूत प्रश्न जैसे थेच आहेत. पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी पक्षाची विस्कटलेली घडी बसवण्याचे प्रयत्न सुरू केले आहे. पालकमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या म्हणून त्यांनी जिल्ह्यासाठी भरपूर वेळ द्यावा लागणार आहे. तरच हे शक्य होणार आहे.

राष्ट्रवादीत फूट, क्षीरसागर संधी साधणार?

नगरपालिकेतील सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील गटबाजीवर विरोधकांचे बारकाईने लक्ष आहे. नगराध्यक्ष प्रेमलता पारवे यांच्यावर त्यांच्याच पक्षाच्या नगरसेवकांची नाराजी असल्याने या नाराजीचा स्फोट कधीही होऊ शकतो? अशी भिती काही पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

Sandip kshirsagar, Yogesh kshirsagar
Maharashtra Politics Live Update : रायगड जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालये उद्या बंद

क्षीरसागर यांची 30 वर्षांची सत्ता उलथवून बीडकरांनी राष्ट्रवादीच्या नव्या कारभाऱ्यांच्या हाती सुत्रे दिली. पण काहीच फरक पडणार नसेल, प्रश्न सुटणार नसतील तर मग आधीचे सत्ताधारी काय वाईट होते? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

यातूनच सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील नाराज नगरसेवकांचा एक गट भाजपाचे डाॅ. योगेश क्षीरसागर किंवा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार संदीप क्षीरसागर यांच्याकडे जाऊन सत्तांतर घडवू शकतो, अशी शक्यताही व्यक्त केली जात आहे.

दोन भाऊ एकाच व्यासपीठावर

भाजपच्या गटनेत्या सारीका क्षीरसागर यांना निवडणूक निकालानंतर जेव्हा माध्यमांनी तुमचे विरोधक बीडची नगरपालिका क्षीरसागर मुक्त झाल्याचा दावा करत आहे, यासंदर्भात विचारले होते तेव्हा आमदार संदीप क्षीरसागर यांच्या पक्षाचे निवडून आलेले नगरसेवक गृहित धरून त्यांनी नगरपालिका कुठे क्षीरगारमुक्त झाली आहे? असा प्रतिप्रश्न केला होता.

समोरासमोर किंवा एका व्यासपीठावर सोबत येणे टाळणारे आमदार संदीप क्षीरसागर, योगेश क्षीरसागर हे दोन भाऊ देखील आता एका व्यासपीठावर दिसू लागले आहेत. हे चित्र पाहता सत्ताधारी राष्ट्रवादीला अधिक सावध राहावे लागणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com