Beed Nagarpalika : बीडमध्ये राष्ट्रवादीला झटका : 11 नगरसेवक बंडाच्या तयारीत; विजयसिंह पंडितांचे फोटो हटवले

Beed Nagarpalika : बीड नगरपालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या 11 नगरसेवकांनी विजयसिंह पंडित यांचे फोटो सोशल मीडिया पेजवरून हटवले.
11 Beed municipal councillors remove Vijay Singh Pandit’s photos
11 Beed municipal councillors remove Vijay Singh Pandit’s photosSarkarnama
Published on
Updated on

बीड नगरपालिकेतील सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत नाराजी आता उघडपणे समोर येऊ लागली आहे. सुरुवातीला नगरपालिकेपुरता सुरु असलेला हा वाद आता रस्त्यावरही दिसू लागला आहे. पालकमंत्री सुनेत्रा पवार यांच्या दौऱ्यात या गटबाजीचे दर्शन झाल्यानंतर पक्षाचे 19 पैकी 11 नगरसेवक बंडाच्या तयारीत असल्याचे चित्र आहे. या बंडाचा पहिला टप्पा म्हणून या 11 जणांनी सोशल मीडिया पेजवरून गेवराईचे आमदार विजयसिंह पंडित यांचे फोटो हटवल्याचे समोर आले आहे.

बीड नगरपालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने विजयसिंह पंडित यांच्या नेतृत्वाखाली मोठी राजकीय मुसंडी मारली होती. तब्बल 35 वर्षे क्षीरसागर कुटुंबाचे वर्चस्व असलेल्या पालिकेत सत्तांतर घडवून आणण्यात पंडित यांची भूमिका महत्त्वाची ठरली होती. मात्र, सत्ता स्थापन होऊन सात महिनेही पूर्ण होत नाहीत तोच पक्षातील अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर आले आहेत.

नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष यांच्यातील वादाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीतील गटबाजी यापूर्वीच समोर आली होती. नाराज नगरसेवकांच्या गटासोबत पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी आपल्या बीड दौऱ्यात चर्चा केली. निधी बाबतची त्यांची नाराजी दूर केली जाईल, असे आश्वासनही दिले. पण हे नगरसेवक काही ऐकायला तयार नाहीत. या नगरसेवकांची नाराजी थेट आमदार विजयसिंह पंडित यांच्याबाबतच दिसते.

या नाराजीचे पडसाद थेट सोशल मीडियावर उमटले आहेत. राष्ट्रवादीच्या 19 नगरसेवकांपैकी 11 नगरसेवकांनी एकाचवेळी विजयसिंह पंडित यांचे फोटो आपल्या सोशल मीडिया पेजवरून हटवल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. हा केवळ सोशल मीडिया बदल आहे की पंडित यांच्या नेतृत्वाविरोधातील नाराजीचे संकेत आहेत, याबाबत तर्कवितर्क सुरू झाले आहेत.

11 Beed municipal councillors remove Vijay Singh Pandit’s photos
Beed News : बीडच्या तरुणाचा पुण्यात धक्कादायक कांड : एअर फोर्सची वर्दी घालण्यापूर्वीच पोलिसांनी उचललं, हवेत जाण्याऐवजी थेट गजाआड

पंडितांच्या भूमिकेवर नगरसेवक नाराज?

पंडित यांच्या नेतृत्वाखालील गट आणि नाराज नगरसेवकांचा गट असे दोन प्रवाह पालिकेत निर्माण झाल्याचे चित्र आहे. पालिकेतील अंतर्गत संघर्षावर विजयसिंह पंडित यांनी ठोस भूमिका घेतली नसल्याची नाराजी नगरसेवकांमध्ये असल्याची चर्चा आहे. 'हाताची घडी, तोंडावर बोट' अशी पंडित यांची भूमिका असल्यानेच नगरसेवक नाराज आहेत का, असा सवालही उपस्थित होत आहे.

'अदृश्य हात' कोणाचा?

दरम्यान, राष्ट्रवादीतील या 11 नगरसेवकांच्या गटाला परळीचे आमदार धनंजय मुंडे यांचे पाठबळ असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. सुनेत्रा पवार यांच्या बीड दौऱ्यातही हा गट पंडित यांच्याऐवजी धनंजय मुंडे यांच्या जवळ दिसून आला होता. या पार्श्वभूमीवर 11 नगरसेवकांनी पंडितांचे फोटो हटवल्याने बीड पालिकेतील बदलत्या राजकीय समीकरणांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

11 Beed municipal councillors remove Vijay Singh Pandit’s photos
Beed News : ठाकरेंच्या नेत्यांचा सुनेत्रा पवारांना सल्ला : बीडबाबत निर्णय घेताना सुनील तटकरेंना बाजूला ठेवा; कारण ते ‘कटकरें’च्या भूमिकेत...

सत्तेसाठी नवीन समीकरणांची जुळवाजुळव?

​राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार संदीप क्षीरसागर आणि भाजपचे डॉ. योगेश क्षीरसागर हे दोन्ही बंधू पालिकेतील बदलत्या समीकरणांवर बारीक लक्ष ठेवून आहेत. ही उघड गटबाजी कायम राहिल्यास पालिका स्तरावर सत्ता स्थापनेसाठी दोन्ही क्षीरसागर बंधू एकत्र येण्याची किंवा या नाराज नगरसेवकांना सोबत घेऊन नवीन फॉर्म्युला तयार करत असल्याची कुजबुज बीडमध्ये सुरू आहे.

गेल्याच आठवड्यात भाजपाचे स्थानिक नेते योगेश क्षीरसागर यांनी मुंबईत मंत्री पंकजा मुंडे यांची भेट घेतली होती. यामध्ये बीड शहरातील विकास कामांवर चर्चा झाल्याचे सांगितले जात असले तरी यावेळी संभाव्य नगरपालिकेतील सत्तांतराचा प्लॅन ठरल्याचीही चर्चा जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. राष्ट्रवादीतील अंतर्गत संघर्ष आणखी तीव्र झाल्यास बीड नगरपालिकेतील सत्तेची समीकरणे बदलण्याची शक्यता नाकारता येत नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com