

Pune Crime News : एअर फोर्समध्ये जवान असल्याचे सांगत वर्दी शिवण्यासाठी टेलरकडे गेलेल्या एका तरुणाचा बनाव पुण्यात उघडकीस आला आहे. टेलरच्या सतर्कतेमुळे बोगस एअर फोर्स जवानाचा पर्दाफाश झाला. धक्कादायक म्हणजे, या तरुणाने २०२२ मध्ये रेल्वे अपघातात मृत्यू झालेल्या एअर फोर्स जवानाचे ओळखपत्र वापरल्याचे पोलिसांच्या चौकशीत समोर आले आहे.
शुभम विलास अंबुरे (वय २६) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तो मूळचा बीड जिल्ह्यातील असून पुण्यात शिक्रापूर तालुक्यातील एका सलूनमध्ये काम करत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुभम अंबुरे लोहगाव परिसरातील गुरुद्वारा कॉलनी येथील बालाजी टेलर या दुकानात गेला होता. आपण भारतीय हवाई दलात जवान असल्याचे सांगत त्याने एअर फोर्सचा गणवेश शिवून देण्यास टेलरला सांगितले.
टेलरने त्याच्याकडे ओळखपत्राची मागणी केली. त्यानंतर अंबुरेने खिशातून एअर फोर्सचे आयकार्ड काढून दाखवले. मात्र, एअर फोर्सच्या जवानांची ओळखपत्रे नियमित पाहत असल्याने टेलरला त्या कार्डबाबत संशय आला. त्याने वेळ न दवडता लोहगाव पोलिसांना याची माहिती दिली.
माहिती मिळताच लोहगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत अंबुरेला ताब्यात घेतले. त्यानंतर लोहगाव येथील एअर फोर्स कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही याबाबत माहिती देण्यात आली. पोलीस आणि हवाई दलाच्या अधिकाऱ्यांनी त्याची कसून चौकशी सुरू केली.
गावाकडे जवान असल्याचा केला होता बनाव
चौकशीदरम्यान अंबुरेने आपण एअर फोर्समध्ये कार्यरत नसल्याची कबुली दिली. गावाकडे आपण जवान असल्याचे सांगितले होते. हा बनाव पुढे नेण्यासाठी त्याने हवाई दलाच्या गणवेशाचीही तयारी सुरू केली होती. त्यासाठीच तो टेलरकडे वर्दी शिवून घेण्यासाठी पोहोचला. पण टेलरच्या सतर्कतेमुळे हा प्रकार वेळीच उघडकीस आला.
न्यायालयाने आरोपी शुभम अंबुरे याला सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणात त्याने मृत जवानाचे ओळखपत्र नेमके कसे मिळवले, त्याचा यापूर्वी आणखी कुठे, कसा वापर केलाय का? आणि या बनावामागे अन्य कोणी सहभागी आहे का, याचा लोहगाव पोलीस अधिक तपास करत आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.