NCP news : बीडकरांचा भ्रमनिरास, पालकमंत्री सुनेत्रा पवार नगरपालिकेतील सत्ताधाऱ्यांना कामाला लावणार का?

Political News : अजित पवारांच्या शब्दावर विश्वास ठेवत बीडच्या जनतेने नगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सत्ता दिली. परंतु या सत्ताधाऱ्यांना अजित पवारांचे सुंदर स्वच्छ बीड शहराचे स्वप्न काही पूर्ण करता आले नाही.
Sunetra Pawar
Sunetra PawarSarkarnama
Published on
Updated on

नितीन चव्हाण

Beed politics : राज्यभरात बदनाम झालेल्या बीड जिल्ह्याला विकासाच्या ट्रॅकवर आणण्यासाठी तत्कालीन पालकमंत्री दिवंगत अजित पवार यांनी अनेक धाडसी निर्णय घेतले. नगरपालिकेची सत्ता एकदा माझ्या हातात द्या बारामती पिंपरी चिंचवड सारखा विकास करून दाखवतो, असा वादा अजित पवारांनी बीडकरांना केला होता. अजित पवारांच्या शब्दावर विश्वास ठेवत बीडच्या जनतेने नगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सत्ता दिली. परंतु या सत्ताधाऱ्यांना अजित पवारांचे सुंदर स्वच्छ बीड शहराचे स्वप्न काही पूर्ण करता आले नाही.

विमान अपघातातील दुर्दैवी निधनानंतर जिल्ह्याचे पालकत्व राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी स्वीकारले. अजित पवार यांनी बघितलेले बीड जिल्ह्याच्या विकासाचे अपूर्ण राहिलेले स्वप्न पूर्ण करण्याचा निर्धार त्यांनी केला आहे. बीड जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीनिमित्ताने आज त्या बीडमध्ये येत आहेत. नगरपालिकेत सत्ता मिळाली असली तरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि त्यांचे स्थानिक नेते हे सर्वसामान्य जनतेचे मूलभूत प्रश्न सोडवण्यात सहा महिन्यापासून अपयशी ठरत असल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवला जात आहे. पंधरा दिवसांनी अवेळी होणारा शहराचा पाणीपुरवठा, जागोजागी साठलेला कचरा, रस्त्यांवर पडलेले खड्डे अशा बकाल अवस्थेत बीडच्या पालकमंत्र्यांचे स्वागत नेमके कसे करावे? असा प्रश्न सामान्य बीडकरांना पडला आहे.

पालकमंत्री म्हणून केवळ बीड शहरच नाही तर संपूर्ण जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था, वाढलेली गुन्हेगारी, महिला व मुलींवरील अत्याचाराची प्रकरण, दिवसाढवळ्या होणारे खून आणि त्याला दिला जाणारा जातीय रंग या सगळ्या बाबींवर अंकुश मिळून जिल्ह्याचा सार्वत्रिक विकास करण्याचे मोठे आव्हान सुनेत्रा पवार यांच्यासमोर असणार आहे. विशेषता ज्या विश्वासाने आणि अजित पवार यांच्या बारामती व पिंपरी चिंचवड पॅटर्न राबवण्याच्या निर्धाराने बीड नगरपालिकेची सत्ता राष्ट्रवादीच्या ताब्यात देण्यात आली, त्या सत्ताधाऱ्यांना जोमाने कामाला लावण्याचे काम पालकमंत्र्यांना करावे लागणार आहे. सत्तांतराला आज सहा महिने उलटून गेले तरी बीडकरांचे मूलभूत प्रश्न सुटण्याऐवजी अधिकच जटील बनले आहेत.

Sunetra Pawar
Maharashtra News Live Update : पुणे ग्रामीण जिल्ह्यात 13 ते 26 जूनपर्यंत जमावबंदी आदेश

पंधरा दिवसांनी मिळणारे पाणी, खड्ड्यात गेलेले अंतर्गत रस्ते अन् वाहतूक कोंडीच्या चक्रव्यूहात बीडकर रोज भरडले जात आहेत. सत्ताधाऱ्यांमधील गटबाजी आणि निधी असूनही रखडलेली कामे, या पार्श्वभूमीवर जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांचे जिल्ह्यात आगमन होत आहे. बीड नगरपालिकेचा कारभार पूर्णपणे विस्कळीत झाल्याचे चित्र आहे.

शहरात 15 ते 18 दिवसांनंतर होणारा पाणीपुरवठा हा बीडकरांच्या पाचवीलाच पुजलेला आहे. पाणी कधी येईल याची कोणतीही वेळ निश्चित नसल्याने महिला-नागरिकांना मनस्ताप सोसावा लागतो. शहरातील अंतर्गत रस्त्यांची अवस्था अतिशय बिकट झाली आहे. 22 कोटी रुपयांचा निधी मंजूर होऊनही शहरातील अंतर्गत रस्त्यांची कामे संथ गतीने सुरु आहेत किंवा पूर्णपणे रखडली आहेत.

गल्लीबोळांतील रस्त्यांवर पडलेल्या महाकाय खड्ड्यांमुळे दररोज लहान-मोठे अपघात होत आहेत. शहरात ठिकठिकाणी लागणारी वाहतूक कोंडी आणि प्रशासनाचा ढिसाळ कारभार यामुळे बीडकर अक्षरशः हैराण झाले आहेत. दादांच्या बारामतीची आस लावणाऱ्या बीडकरांच्या नशिबी अखेर पाण्यासाठीची पायपीट अन् खड्ड्यांची साथच उरली की काय? असा उद्विग्न सवाल आता सामान्य नागरिक विचारू लागले आहेत.

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यानंतर जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची धुरा सुनेत्रा पवार यांच्याकडे आली. प्रथमच त्या दोन दिवसांच्या मुक्कामी बीड दौऱ्यावर येत असून, त्यांच्या उपस्थितीत पहिलीच प्रत्यक्ष नियोजन बैठक पार पडत आहे. पवार यांच्या या दौऱ्यामुळे शहरातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. पालिकेतील पक्षांतर्गत गटबाजी मोडून काढणे, 22 कोटींच्या निधीतून रखडलेल्या रस्त्यांची कामे वेगाने पूर्ण करणे, पाणीपुरवठ्याची विस्कळीत झालेली घडी बसवणे आणि प्रशासनावर पुन्हा एकदा वचक निर्माण करणे, असे अनेक आव्हाने त्यांच्यासमोर आहेत.

Sunetra Pawar
Maharashtra News Live Update : "विद्यार्थ्यांच्या आडून राजकारण सुरू" : जे पी नड्डांचा हल्लाबोल

पक्षाची घडी बसवावी लागेल..

​नगरपालिकेत सत्तांतर झाले, नगरसेवक निवडून आले, मात्र विकासाचे व्हिजन बाजूला राहून सत्ताधारी नगरसेवकांमध्येच पक्षांतर्गत मतभेद आणि गटबाजी उफाळून आली आहे. अजितदादांच्या छत्रछायेखाली एकत्र असणारे नेते दादांच्या निधनानंतर मात्र आपापल्या गटांचे वर्चस्व सिद्ध करण्यात व्यस्त आहेत. ​

नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभांमध्ये जनतेच्या प्रश्नांवर चर्चा होण्याऐवजी सत्ताधारी पक्षाचेच नगरसेवक एकमेकांवर चिखलफेक करताना दिसतात. एकमेकांविरुद्ध थेट जाहीर भाष्य करणे, वैयक्तिक पातळीवर जाऊन आरोप-प्रत्यारोप करण्याचे प्रकार घडत आहेत. सत्ताधारी नगरसेवकांच्या या राड्याचे आणि शाब्दिक चकमकींचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून, बीड पालिकेतील या तमाशामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आणि पालिकेच्या कारभाराची पुरती नाचक्की होत आहे. नगरसेवकांच्या या आपापसातील कुस्तीमुळे प्रशासनावरील पकड ढिली झाली असून अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कोणाचाही धाक उरलेला नाही. यावरही पालकमंत्री सुनेत्रा पवार यांना अंकुश ठेवून पक्षाची विस्कटलेली घडी नीट करावी लागणार आहे.

Sunetra Pawar
Beed Municipal Council : बीडसाठी अजित पवारांनी पाहिलेले स्वप्न धुळीस मिळवू नका, त्यांचे नाव खराब करू नका; भाजपच्या गटनेत्या राष्ट्रवादीच्या सत्ताधाऱ्यांवर संतापल्या!

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com