

Bhokardan Local Body News : भोकरदन नगरपालिकेतील काँग्रेस पक्षाची सत्ता गेली. नवे, सुशिक्षित चेहेरे दिल्यानंतरही काँग्रेसच्या पाठीशी असलेला मुस्लिम मतदार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या बाजूने पूर्णपणे गेला. परिणामी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख यांची पकड ढिली पडली. माजी आमदार चंद्रकांत दानवे यांनी मुस्लिम उमेदवार देत काँग्रेसची अडचण वाढवली.
दुसरीकडे भाजपने सत्ता नाही पण किमान नगरपालिकेतील प्रतिनिधित्व तरी वाढले पाहिजे या दृष्टीने रणनिती आखली. आमदार संतोष दानवे यांनी सगळी सुत्रं हाती घेतली आणि भाजपचा आकडा अपेक्षेपेक्षा अधिक वाढला. आठ नगरसेवक निवडून आणत भाजपने पुढच्या पाच वर्षाच्या तयारीची सुरूवात आताच केल्याचे दिसून आले. चंद्रकांत दानवे यांनी काँग्रेसच्या वोट बँकेला धक्का देण्याची खेळी दुसऱ्यांदा मुस्लिम उमेदवार देत केली. गेल्यावेळी त्यांचा प्रयोग फसला होता, यावेळी मात्र काँग्रेसच्या विरोधात अॅन्टी इनकमबन्सी प्रकर्षाने जाणवली.
शेजारच्या सिल्लोड नगरपालिकेची सत्ता आमदार अब्दुल सत्तार यांनी सलग पाचव्यांदा राखली. नगराध्यक्ष आणि 25 नगरसेवक निवडून आल्यानंतर भोकरदनमध्ये भाजपचा खेळ आपण बिघडवला असा दावा ते करू लागले आहेत. त्यांच्या या दाव्याची खिल्ली रावसाहेब दानवे यांनी उडवली आहे. भोकरदनमध्ये सामाजिक समीकरणामुळे हा निकाल आल्याचे स्पष्ट करत सत्तार यांचा दावा फेटाळला.
भोकरदन नगर परिषद निवडणुकीचा निकाल हा केवळ सत्तांतरापुरता मर्यादित न राहता संपूर्ण तालुका आणि जिल्ह्यातील राजकारणाची दिशा बदलणारा ठरला . अनेक वर्षे काँग्रेसच्या ताब्यात असलेली भोकरदन नगर परिषद अखेर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या हाती गेली असून सत्ताधारी काँग्रेस पक्षाची अवस्था अत्यंत दयनीय होत फक्त 2 जागांवर त्यांची गाडी अडखळली.
आमदार संतोष दानवे यांनी पहिल्यांदाच नगर परिषद निवडणुकीची सूत्रे पूर्णतः स्वतःच्या हाती घेतली. बूथस्तरावरील बैठका, दररोजचा जनसंपर्क, प्रत्येक प्रभागासाठी ठरवलेले मतदानाचे लक्ष्य, यामुळे भाजपची मोहीम अत्यंत काटेकोर व सुसंघटित दिसून आली. आशा माळी यांचा अनुभव आणि पक्षाची संघटनशक्ती ही भाजपची प्रमुख ताकद ठरली. समाजातील प्रत्येक घटकाशी आमदार दानवे यांनी वैयक्तिक संपर्क ठेवत कार्यकर्त्यांना बळ दिले. या निवडणुकीत भाजपने नगरसेवकांची संख्या चारवरून आठपर्यंत नेली शहरातील भाजपचे वाढलेले मतदान हे आमदार संतोष दानवे यांच्या नेतृत्वाचे यश मानले जात आहे.
काँग्रेसचा पारंपरिक आधार ढासळला
या निवडणुकीत काँग्रेसचा प्रमुख आधार असलेला अल्पसंख्यांक मतदार मोठ्या प्रमाणात निसटल्याचे स्पष्ट झाले. राजाभाऊ देशमुख यांनी नगराध्यक्ष पदासाठी घरातील उमेदवार दिला, तर राष्ट्रवादीने अल्पसंख्यांक चेहरा दिला, ही बाब राष्ट्रवादीच्या पथ्यावर पडली. काँग्रेसने नगरसेवक पदासाठी 10 मुस्लिम उमेदवार आणि अनेक नवीन चेहरे दिले तरीही ते मतदारांना आकर्षित करण्यात अपयशी ठरले. केंद्र व राज्यात सत्तेचा अभाव, पालिकेतील दीर्घकालीन सत्तेमुळे निर्माण झालेली नाराजी, तसेच आजी-माजी नगरसेवकांमधील असंतोष हे काँग्रेसच्या पराभवाला कारणीभूत ठरले.
'भावनिक'मोहीम निर्णायक
भोकरदन नगर परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा विजय हा अचानक घडलेला राजकीय चमत्कार नसून, मागील पराभवातून घेतलेले धडे, अचूक सामाजिक गणित आणि काँग्रेसच्या घराणेशाहीविरोधात उभे केलेले प्रभावी कथानक यांचा परिणाम आहे. मागील नगर परिषद निवडणुकीत राष्ट्रवादीकडून दिलेल्या अल्पसंख्यांक चेहऱ्याचा पराभव हा यावेळी कमकुवतपणा न ठरता भावनिक मुद्दा बनवण्यात आला.
मागील पराभव विस्मरणात न टाकता, तोच अन्यायाची भावना म्हणून मांडत राष्ट्रवादीने मतदारांमध्ये भावनिक एकजूट निर्माण केली.यावेळी राष्ट्रवादीने कोणत्याही एका घटकावर अवलंबून न राहता बहुस्तरीय सामाजिक समीकरणे आखली.मराठा,ओबीसी आणि दलित घटकांना नगरसेवक उमेदवारीत प्रभागनिहाय संतुलित रचनेमुळे 'एका समाजाचा पक्ष' ही प्रतिमा दूर करून विजय सुकर केला.
या निवडणुकीत राष्ट्रवादीने थेट काँग्रेसच्या घराणेशाहीवर केवळ आरोप म्हणून न ठेवता, 'पर्याय हवा' अशी जनभावना निर्माण करण्यात यशस्वी झाले.राष्ट्रवादीने अल्पसंख्यांक चेहऱ्याला थेट नगराध्यक्ष पदासाठी उभे करून, 'प्रतिनिधित्व केवळ उमेदवारीपुरते नाही, तर सत्तेपर्यंत' हा स्पष्ट संदेश दिला. यामुळे काँग्रेसचा पारंपरिक आधार मोठ्या प्रमाणावर राष्ट्रवादीकडे वळला. राष्ट्रवादीची मोहीम गोंगाटी नव्हती, पण विरोधकांवर थेट हल्ल्याऐवजी, मतदारांच्या असंतोषाला योग्य दिशा देण्यात आली.
धार्मिक ध्रुवीकरण, तरुणांचे मतदान, स्थानिक नेत्यांची वैयक्तिक प्रतिष्ठा आणि बदलती राजकीय समीकरणे यांचा एकत्रित परिणाम या निकालात स्पष्टपणे दिसून आला. या निकालाने भोकरदनच्या राजकारणात नव्या पर्वाची सुरुवात झाल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.