Marathwada : शिंदे सरकारमधील रोहयो तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संदीपान भुमरे (Sandipan Bhumre) आणि शिवसेनेचे प्रवक्ते आमदार संजय शिरसाट या दोघांमध्ये आधी मंत्रीपदासाठी स्पर्धा होती. त्यात भुमरेंनी बाजी मारली आणि शिरसाटांना वेटिंगवर राहावे लागले. आता वर्षभरावर आलेल्या लोकसभा निवडणुकीसाठी छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघातून लढण्यासाठी पुन्हा हे दोघे समोर आले आहेत.
संदीपान भुमरे हे स्वतःलाच लोकसभेचा उमेदवार सांगत आहेत, तर मी देखील लोकसभा लढायला तयार असल्याचे शिरसाट यांनी देखील स्पष्ट केले आहे. मंत्रीपद हा माझा हक्क आहे, मी मंत्री होणारच असा दावा करणाऱ्या शिरसाट (Sanjay Shirsat) यांना अचनाक लोकसभा लढवावी असे का वाटत आहे? असा प्रश्न देखील या निमित्ताने उपस्थितीत केला जात आहे. (Shivsena) संदीपान भुमरे यांचा पैठण विधानसभा मतदारसंघ हा लोकसभेला जालन्यात येतो, त्यामुळे त्यांचे मतदान हे जालन्याच्या खासदाराला जाते.
जालना लोकसभा ही ३५ वर्षांपासून भाजपकडे आहे. विद्यमान खासदार केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची ही पाचवी टर्म आहे. (Aurangabad) त्यामुळे लोकसभेला त्यांच्यासाठी काम करण्यापेक्षा छत्रपती संभाजीनगर लोकसभा लढवण्याची तयारी भुमरे यांनी चालवली आहे. स्वतः लोकसभा आणि मुलासाठी पैठण विधानसभेची जागा असे गणित भुमरे यांनी आखले आहे. आता पक्षश्रेष्ठीकडून त्याला कसा प्रतिसाद मिळतो यावर सगळे अंवलबून असणार आहे.
छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. परंतु २०१९ मध्ये मंतामध्ये मोठ्या प्रमाणात फूट झाल्याचा फटका शिवसेनेला बसला आणि एमआयएमचा खासदार इथून निवडून आला. त्यामुळे लोकसभेला मराठा उमेदवार दिला जावा, असा सूर शिंदेच्या शिवसेनेकडून निघतोय. कदाचित त्यामुळेच भुमरे लोकसभेवर दावा सांगत असावेत. दुसरीकडे मंत्रीपद न मिळाल्यामुळे नाराज असलेले शिवसेनेचे प्रवक्ते संजय शिरसाट हे देखील इच्छूक असल्याने भुमरे आणि त्यांच्यात पुन्हा रस्सीखेच पहायला मिळणार आहे.
शिरसाट हे पश्चिम या राखीव मतदारसंघातून सलग तिसऱ्यांदा निवडून आले आहेत. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत त्यांच्यापुढे विरोधकांचे आव्हान असणार आहे. गेल्या निवडणुकीत भाजपच्या राजू शिंदे यांनी बंडखोरी करत शिरसाट यांची डोकेदुखी वाढवली होती. तर काॅंग्रेसने उमेदवारी दिलेल्या रमेश गायकवाड यांचा उमेदवारी अर्ज बाद झाल्याचा फायदा शिरसाट यांना झाला होता. २०२४ मध्ये मात्र पुन्हा राजू शिंदे यांनी पश्चिममधून तयारी सुरू केली आहे.
तर जिल्हा परिषद सदस्य रमेश गायकवाड यांनी देखील `अभी नही तो कभी नही`, चे धोरण स्वीकारत तयारी सुरू केली आहे. त्यामुळे शिरसाट यांना विधानसभा सोपी नाही. कदाचित त्यामुळेच त्यांनी लोकसभा लढवण्याची मानसिक तयारी केल्याचे बोलले जाते. परंतु मराठा उमेदवार देण्याचा निर्णय झाला तर मात्र शिरसाट यांना माघार घ्यावी लागेल. अर्थात ही जागा भाजप लढवणार? की शिंदे गट हे अद्याप ठरलेले नाही. दोन्ही पक्षांनी आपापल्या परीने तयारी सुरू केली आहे. अंतिम निर्णय मात्र शिंदे-फडणवीस हेच घेणार आहेत. त्यामुळे तुर्तास दोन्ही बाजूंनी दावे-प्रतिदावे सुरू आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.